’व्यक्ती तितक्या वल्ली’ या वाक्यप्रचाराचा प्रत्यय जेवढा शहरांमधून येतो, त्याहूनही अधिक गावपातळीवर पहायला मिळतो. गावातले अस्सल गावरान जीवन, तेथील भाषा – लहेजा, त्यांच्या जगण्यातल्या छोटया-छोटया गोष्टी, इरसालपणाचे किस्से आणि त्यातून घडणा-या गमतीजमतींची रंगत काही औरच असते. शहरी सुविधांपासून वंचित असलेल्या अशा एका छोटयाशा गावात एक सरकारी ग्रामयोजना आल्यावर तेथील गावकरी त्या योजनेचा कशाप्रकारे स्वीकार करतात याचे मजेशीर चित्रण म्हणजे ’येडयांची जत्रा’ हा मराठी चित्रपट. विनोदातून समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा चित्रपट उद्या (3 फेब्रुवारी) चित्रपटगृहात दाखल होतोय.

निर्माते विश्‍वजीत गायकवाड आणि दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे यांनी ’येडयांची जत्रा’ या यांचा हा पहिलाच चित्रपट. यात त्यांनी ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या प्रश्‍नाला हात घातला आहे. चित्रपटाची कथा घडते मराठवाडयातील गाढवेवाडी या छोटयाशा खेडेगावात. गाढवेवाडी हे गाव वरची वाडी आणि खालची वाडी असे विभागले गेलं आहे. दोन्ही भागातल्या गावक-यांचा एकमेकांशी छत्तीसचा आकडा असल्यामुळे गावातल्या मंदिराचेही दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. बाकी सगळे वाद संपुष्टात आले आहेत असं वाटतांनाच दोन वाडयांच्या मध्यावर हरिश्‍चंद्र बेंडके उर्फ हार्‍याची (भरत जाधव) असलेली जमीन आता या दोन वाडयांमधील कलहाचा विषय बनते. या कलहातून हाऱ्याची जमीन गावाची हागणदरी बनते. त्यातच गावात आलेल्या निर्मल ग्राम योजनेमुळे गावक-यांमध्ये कुतुहल आणि अनेक मजेशीर घटनाक्रमांची साखळी तयार होते. हार्‍याचं शेत त्याला परत मिळतं का? दोन पाटलांच्या राजकारणात, गावात योजना सफल होते का? या प्रश्‍नांचे विनोदी ढंगात केलेले चित्रण म्हणजे… ’येडयांची जत्रा’ हा चित्रपट.

या धमाल चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी लिहिली असून संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. गुरु ठाकुर लिखित चित्रपटातील गीतांना क्षितीज वाघ यांनी संगीत दिले असून पार्श्‍वसंगीत पंकज पुष्कर यांचे आहे. यात उत्सुकता आहे ती श्रेया घोषालच्या आवाजातील ’काटा रुतला गं बाई रुतला…काटा इश्काचा जिव्हारी रुतला..’ या मराठमोळ्या लावणीची. याशिवाय प्रसिध्द नृत्य दिग्दर्शिका सरोज खान व संतोष पालवणकर यांनी यातील गीतांवर कोरिओग्राफी केली आहे. श्रेया घोषालच्या आवाजातील लावणी ‘बिग बॉस’ची विजेती श्‍वेता तिवारीच्या लाजवाब ठेक्यावर चित्रीत करण्यात आली आहे. या दोन्ही गीतांचे चित्रीकरण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे आहे.

’येडयांची जत्रा’चे सिनेमॅटोग्राफर समला भास्कर हे साऊथचे (हैदराबाद) नावाजलेले कॅमेरामन असून एका अत्याधुनिक कॅमे-यावर चित्रीत केलेला ’येडयांची जत्रा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट पाहतांना प्रेक्षकांना नक्कीच याचा प्रत्यय येईल. चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर यांनी केले असून कला दिग्दर्शन राजू सापते व राजन खाडे यांनी केले आहे

चित्रपटात हरिश्‍चंद्र उर्फ हार्‍या ही मध्यवर्ती भूमिका भरत जाधवने साकारली असून त्याच्या सोबतीला मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पंढरीनाथ कांबळी, निशा परुळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंदा कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सुहास भालेकर, प्रकाश भागवत, सतिश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर, मनोज टाकणे, अंजली उजवणे, वासु भागवत या कलाकारांसोबत स्नेहा कुलकर्णी ही नवोदित अभिनेत्री चित्रपटातून पदार्पण करते आहे.