मुलाला खूप शिकवावं, मोठं करावं असं स्वप्न बघून प्रत्येक बाप अतोनात कष्ट करत असतो; पण कधीकधी तोच मुलगा जेव्हा मोठा होऊन आपली कर्तव्य विसरतो तेंव्हा मात्र आई-बाबांना काय करावं हे सुचत नाही. साधारण दर दोन घरांमागे आढळणारं हे चित्र.

दोन पिढ्यांमधला हरवत चाललेला संवाद त्यांच्यात दरी निर्माण करतो. अशा वेळी आपल्या मुला-मुलींकडून पोटगी मागण्याचा अधिकार आई-वडिलांनाही आहे हेही आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं. कायद्यातल्या या कलमावर प्रकाश टाकत, वडील आणि मुलगा यांच्यातल्या नात्यावर भाष्य करणारा दिग्दर्शक आसित रेडीज यांचा  नवीन चित्रपट येतोय ‘या गोल गोल डब्यातला’.
‘रिद्धी एंटरटेन्मेंट’ निर्मित आणि आसित रेडीस दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवलकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे अशा दिग्गज तसेच तरुण कलाकारांचा यात सहभाग आहे. गावोगाव हिंडून लहान मुलांना डब्यातले चित्र दाखवणाऱ्या आणि त्याचं मनोरंजन करणाऱ्या  एका गरीब माणसाची ही कथा आहे.

मुलाला शिकवण्यासाठी अपार कष्ट करणारं हे जोडंपं आपल्यासारखं आयुष्य आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून धडपडत असतं. पण, शिकून मोठा झाल्यावर याच मुलाला आपल्या वडिलांच्या व्यवसायाचा त्रास होऊ लागतो आणि त्यांच्यात एक भावनिक दरी निर्माण होते. या सगळ्या प्रकारात आई, वडील आणि मुलगा या तिघांची होत असलेली घुसमट आणि त्यांच्या नात्यातले ताण-तणाव संवेदनशीलरित्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. या सगळ्या तणावात तरुण पिढीची आणि वार्धक्याकडे झुकलेल्या ज्येष्ठांची अशा दोन्ही बाजू मांडल्या आहेत.

स्मिता तळवलकर अशोक सराफ ही जोडी या निमित्ताने खूप दिवसांनी एकत्र दिसणार आहे. अशोक सराफ यांनी साकारलेला संवेदनशील बाप तर संतोष जुवेकरने साकारलेला वैचारिक गोंधळ उडालेला मुलगा आणि स्मिता तळवलकरने साकारलेली आई हे या चित्रपटचं मुख्य आकर्षण आहे. याशिवाय, या चित्रपटात अशोक मामा टायटल सॉंग सुद्धा गात आहेत. त्यामुळे खूप दिवसांनी आपल्याला त्यांचा आवाज ऐकता येईल.

गोल गोल डब्यातल्या चित्रांप्रमाणे त्या तिघांचं आयुष्य पुन्हा एकाच ठिकाणी येऊन थांबतं की त्यांच्यातली दरी वाढत जाते हे जाणून घ्यायला आपल्याला उद्यापर्यंत (20 जानेवारी) वाट बघावी लागेल…