एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध – पारतंत्र्यातला भारत ! या काळात बालविवाहांची प्रथा सर्रास सुरू होती. असाच एक बालविवाह पुण्यात झाला. लिहिता-वाचता न येणा-या अकरा वर्षांच्या, साता-यातल्या एका गावातल्या एका अल्लड मुलीचं लग्न तिच्याहून वयाने दुप्पटीपेक्षा मोठ्या असलेल्या, न्यायाधीशाचं काम करणा-या एका विद्वान, उच्चशिक्षित, सुधारक विचारांच्या तरुणाशी झालं. मुलाने स्वतःच्या बायकोला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला. त्याने स्वतः तिला शिकवायला सुरुवात केली इतकंच नाही तर मुलीने खूप शिकावं यासाठी मास्तरीण बाईंचीही नेमणूक केली. मात्र नवरा जरी सुधारक मतांचा असला तरी मुलीच्या शिकण्याला घरच्या स्त्रियांचा प्रचंड विरोध होता त्यामुळे नव-याची पाठ फिरली की घरातल्या स्त्रियांकडून सतत ऐकाव्या लागणा-या टोमण्यांनी ही मुलगी बेजार झाली. मात्र अडचणींवर मात करत ही मुलगी शिकली, मराठीबरोबरच ती इंग्रजी आणि बंगालीही शिकली आणि सत्तावीस वर्षं – नव-याच्या मृत्यूपर्यंत ती सावलीसारखी त्याची सोबत करीत राहिली. नव-याच्या मृत्यूनंतरही तिने मोठं सामाजिक कार्य केलं.

ही खरीखुरी कहाणी आहे, एका वटवृक्षाच्या सावलीची – न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नीची – रमाबाई रानडे यांची !
गेल्या शतकातील समाजसुधारक महिलांमध्ये रमाबाई रानडे यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या ‘सेवासदन’ या संस्थेचं कार्य अजूनही जोमाने सुरू आहे. मात्र अकरा वर्षांच्या अशिक्षित विवाहितेपासून ते सामाजिक कार्यासाठी जीवन वेचणा-या कर्तृत्वशालिनीपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत प्रेरणादायी ठरलेली अशी ही खरीखुरी कहाणी अद्याप दूरचित्रवाणीवर आलेली नाही. हे शिवधनुष्य आता झी मराठी पेलत आहे – ‘उंच माझा झोका’ या नव्या मालिकेच्या रूपाने ! रमाबाई रानडे यांचं चरित्र प्रथमच छोट्या पडद्यावर रेखाटून या कर्तृत्वशालिनीला आदरांजली वाहण्यासाठी झी मराठी सज्ज आहे !

पिकोलो फिल्म्स् निर्मित आणि विरेन दिग्दर्शित ‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. बालकलाकार तेजश्री वालावलकर छोट्या रमाबाईंच्या तर विक्रम गायकवाड न्यायमूर्ती रानडे यांच्या व्यक्तिरेखेत आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे ‘उंच माझा झोका’मध्ये एका विशेष भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

महिला सक्षमीकरणाचा मूर्तिमंत परिपाठ देणा-या रमाबाई रानडे यांच्या जीवित-कार्यावर आधारित ‘उंच माझा झोका’ प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे बघण्याची संधी देईल अशी आशा आहे…