Hold your breath, पंटर्स! तुमची वेबसाईट फिल्लमबाजी.कॉम आता आली आहे नवा लूक घेऊन! गेली दीड वर्षं मराठी चित्रपटसृष्टीतलं जे जे उत्तम ते ते तुमच्या पर्यंत पोचवण्याच्या उद्देशानं फिल्लमबाजी.कॉम टीमनं काम केलं. काल मीडियानेक्स्टच्या ऑफिसमध्ये रंगलेल्या गप्पांच्या एका मस्त मैफिलीमध्ये वळू, विहीर, देऊळ असे उत्तमोत्तम चित्रपट देणाऱ्या उमेश-गिरीश कुलकर्णींच्या हस्ते फिल्लमबाजी.कॉमच्या नव्या स्वरुपाचं अनावरण झालं. यावेळी श्रीकांत यादव, ऋग्वेद देशपांडे, ऋतुपर्ण देशपांडे इत्यादी उपस्थित होते. मीडियानेक्स्टचे कार्यकारी संचालक अभय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काळात मोठेच बदल झाले. कथानकं, कलाकार या सगळ्यांमध्ये नव्या चेहेऱ्यांचं आणि नवी दृष्टी असणाऱ्यांचं आगमन झालं. श्वास, टिंग्या, अनाहत, हरीशचंद्राची फॅक्टरी, गंध, गोजिरी, देवराई, डोंबीवली फास्ट, वळू, बालगंधर्व, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, रिटा, गाभ्रीचा पाऊस, नटरंग, सिंधूताई सपकाळ असे अनेक चांगले चित्रपट आपण या काळात पाहिले. या सगळ्या सुंदर चित्रपटांनी अवघ्या देशाला मराठीची दखल घ्यायला भाग पाडलं.

पण वेट! ऑल इज रिअली नॉट वेल. बऱ्याच गोष्टी अजूनही जमलेल्या नाहीत. पुण्या-मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र आहे याचा विसर निर्माते-वितरक यांना पडला आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे – आणि ही निव्वळ सोय पहाणारी कूपमंडूक वृत्ती आहे. अजून मराठी प्रेक्षकांची खरी ताकद यामुळे आजमावलीच गेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हौशी निर्माते. थोडा पैसा खळखळला की ‘पिक्चर पहावा काढून’ असं करणारे निर्माते मराठी सिनेमाचं प्रचंड नुकसान करत आहेत. प्रयोगशीलता, उत्तम दर्जासाठी आणि प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी द्यावा लागणार वेळ आणि करावे लागणारे प्रयत्न यांचा मागमूसही या हौशी लोकांच्या कामात दिसत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ‘प्रचंड बॉक्स ऑफिस सक्सेस मिळवणारा चित्रपट’ असं बिरूद यापैकी एकही चित्रपट मिरवू शकणार नाही. असं यश मिळवण्यासाठी लागणारी निर्माता-वितरक-कथा-दिग्दर्शक-कलाकार-मार्केटींग अशी कंप्लीट टिम मराठीत अजून तयारच झाली नाही. ही गोष्ट घडण्याची आपण ‘रसिक मायबाप’ डोळे शिणवून वाट बघत आहोत.

मात्र चांगली चिन्हं नक्कीच दिसत आहेत. असं वाटत आहे की एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत मराठी चित्रपटसृष्टी आता आहे. मल्टीप्लेक्सची जिल्ह्या-तालुक्यांपर्यंत वाढणारी संख्या, चित्रपटांची सुधारणारी निर्मितीमुल्ये, सिनेमाचे झालेले डिजीटायझेशन या सगळ्यांमुळे मराठी चित्रपटसृष्टी हळूहळू नक्कीच कात टाकत आहे. कसल्याही अनुदानाशिवाय आणि कसल्याही टेकूशिवाय आपल्याला एक ‘तुफान हीट, मास्टर प्रिंट, न्यु रिलीज’ लवकरच बघायला मिळेल अशी आशा आहे.

या सगळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ऑनलाईन नारद म्हणून फिल्लमबाजी.कॉम कायम प्रयत्नशील राहणार आहे. वेबसाईटचे नवे रूप कसे वाटले ते कॉमेंटस् टाकून नक्की कळवा…

आयपॅडवर फिल्लमबाजी.कॉम


फिल्लमबाजी.कॉम टीम