लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून, तसंच सिनेमा पाहावा काढून असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि कदाचित म्हणूनच आतापर्यंत मराठी चित्रपटात मध्यमवयीन दिग्दर्शक जास्त बघायला मिळाले. हे चित्र आता मात्र बदललंय. दहाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तर दिग्दर्शकांची एक नवी पिढीच बघायला मिळाली. यातलंच एक नाव म्हणजे ‘सुजय डहाके.’ त्यानं मिलिंद बोकिलांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर चित्रपट काढायचं ठरवलं आणि कादंबरीच्या मूळ आत्म्याला जरासाही धक्का न लावता आपण एक सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो असं वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सिद्धही करून दाखवलं.

‘शाळा’ चित्रपटाला पिफमध्ये मिळालेला उदंड प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर सुजयशी मारलेल्या गप्पा -

सर्वप्रथम ‘शाळा’ चित्रपटाबद्दल तुझं अभिनंदन. तू चित्रपट क्षेत्रात ठरवून आलास की शाळा कादंबरीवर चित्रपट काढायचा म्हणून पदार्पण केलं?
मी ‘चित्रपट’ माध्यमाचाच विद्यार्थी आहे. माझी पदवी आणि दोन मास्टर्स या सिनेमाशी संबंधीत विषयामध्येच आहेत. त्यामुळे चित्रपट बनवणं हे मला होमवर्क केल्यासारखंच होतं. पण ‘शाळा’ कादंबरीवर चित्रपट काढायचा, हे मी कादंबरी वाचत असतानाच ठरवलं होतं.

‘शाळा’ वाचत असताना नेमकं कशामुळे तुला चित्रपट काढावासा वाटला?
खरं सांगू का, ‘शाळा’ ही मला माझीच स्टोरी वाटते. कादंबरी वाचतानाच मी वेडा झालो होतो. ही कादंबरी वाचताना माझी स्वतःची शाळा, माझी शिरोडकर असं मी सगळं रिलेट करू शकत होतो. आणि मला खात्री आहे, की ही थीम प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याची आहे. म्हणून खरं तर चित्रपट काढायचं ठरवलं.

कादंबरी खरोखरच भन्नाट आहे. पण ते एक तुलनेनं विस्तृत माध्यम आहे. त्यामुळे कादंबरीचा आधार घेऊन चित्रपट बनवणं म्हणजे फॉर्म बदलणंच. त्यात नेमकी कुठली आव्हानं होती?
कादंबरीत निश्‍चितपणानं अनेक घटना, प्रसंग, पात्रं विस्तृतपणे रंगवली आहेत. त्यामुळे चित्रपट करताना पटकथा लिहिणं हे पहिलं मोठं आव्हान होतं. मी सुरुवातीला प्रयत्न करून पाहिला पण नीट नाही जमलं. मग मात्र मी माझे सर अविनाश देशपांडे यांना सांगितलं पटकथा लिहायला. मग आम्ही शालेय जीवनातली लव्हस्टोरी ही मुख्य थीम ठेवून कादंबरीतले या थीमशी सुसंगत प्रसंग चित्रपटात मांडले, आणि बाकीचा भाग वगळला. आणि म्हणूनच पटकथा खूप इनटॅक्ट झालीय.

या कादंबरीचा एक मोठा वाचकवर्ग आहे. ज्यांना कथा, पात्रं सगळं माहिती आहे. अशा वाचकांसमोर चित्रपट सादर करताना तुला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या?
प्रत्येकानं कादंबरी वाचताना ती शाळा, पात्रं इमॅजिन केलेले असतात. त्यामुळे ‘कलाकार निवड’ हा या सगळ्या प्रोसेसमधला कळीचा भाग होता. लहान मुलांचा चित्रपट असल्यानं आम्ही शेकडो बालकलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि त्यातून १६ बालकलाकार प्रमुख रोल्ससाठी निवडले. या चित्रपटात १०४ पात्रं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट या माध्यमाचा ती कथा आणि तो काळ जिवंत करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. रंगाचा आणि कॅमेर्‍याचा खूप काळजीपूर्वक वापर केला.

कादंबरीतली शिरोडकर कुठे भेटली?
ती एक गंमत आहे. मी फिलिपिन्समध्ये सिनेमा शिकत असताना मी शिकलेली प्रत्येक गोष्ट ‘शाळा’ कादंबरीला लाऊन बघायचो. तिथे टीव्हीवर एकदा ‘सारेगमप लिटल चॅम्प’ पाहत होतो. ‘शाळा’चाही विचार सुरूच होता. ‘लिटल चॅम्प’मध्ये केतकीला बघितल्यावर मला वाटलं, हीच शिरोडकर. मग पुण्यात आल्यावर शाळावर खरोखरीच चित्रपट करायचं ठरलं तेव्हा तिला भेटलो. खरंतर तिचं नावही मला आधी माहीत नव्हतं. मग पुढे तिला हा रोल दिला.

कादंबरीत असलेली सत्तरीच्या दशकातली आणीबाणीची पार्श्‍वभूमी आणि ग्रामीण शाळेतलं वातावरण तू चित्रपटात जसंच्या तसं ठेवलंस. त्यामागे नक्की काय विचार होता?
मला या चित्रपटाच्या रूपानं/माध्यमातून आजच्या पिढीला त्या काळात न्यायचं होतं. म्हणून आणीबाणीची पार्श्‍वभूमी मी कायम ठेवली आणि शालेय जीवनात वाटणारी ही म्युच्युअल रोमॅंटीक फीलिंगही पूर्वीइतकीच आजही आहे. कदाचित आज त्याच्या एक्स्प्रेशनचे प्रकार बदलले आहेत.

ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कादंबरीचे लेखक मिलिंद बोकिलांचा सहभाग कसा होता?
या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे ती शाळा त्यांनी कशी इमॅजिन केलीय इथपासून ते प्रत्येक पात्राची वैशिष्ट्यं अशा अनेक गोष्टींत त्यांनी खूप मदत केलीय. कारण काही पात्रं, उदा. ‘नरुमामा’, कादंबरी वाचून नक्की कशी आहत हे नीट कळलं नव्हतं. तेव्हा सरांनी खूप मदत केली. कदाचित त्यामुळे मूळ कथेच्या तुलनेत चित्रपटात त्या व्यक्तिरेखेला जास्त रंगवण्यात आम्हाला यश आलं.

‘शाळा’ चित्रपटाची बलस्थानं काय सांगशील?
माझ्या मते अचूक कलाकार निवड, तांत्रिकदृष्टच्या सक्षम, कॅमेर्‍याच्या स्थिर आणि ठळक फ्रेम्स, आणि मुख्य म्हणजे ‘१०४’ पात्रं असूनही डबिंग न करता हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटात ऐकू येणारे आवाज हे स्टुडिओतले, कलाकारांचेच आवाज आहेत, त्यामुळे एक लाईव्हलीनेसचा फील येतो. हीच बलस्थानं सांगता येतील.

शाळा चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम असल्याचं चित्रपट बघताना नेहमी जाणवतं. तर त्याबद्दल काय सांगशील?
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हा खूप महत्त्वाचा भाग माझा गुरु आणि मित्र दिगो रोमेरो याने सांभाळल्याने त्यात परिपूर्णता येऊ शकली. चित्रपटातल्या प्रत्येक पात्राचा आणि त्या काळाचा त्याने खूपच बारकाईनं अभ्यास केला होता. म्हणून प्रत्येक फ्रेम आणि चित्रपटात एकूणच वापरलेले सगळे रंग याबद्दल तो खूपच जागरूक होता. म्हणूनच तो काळ जसाच्या तसा आम्ही चित्रपटात दाखवू शकलो.

‘शाळा’ नंतरचे तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? पुन्हा कुठल्या कादंबरीवर चित्रपट काढण्याचा विचार आहे?
समकालीन घटनांवर तरुणांचं भाष्य मांडणारे चित्रपट मला बनवायचे आहेत. सध्या तरी फक्त डोक्यात आहे. कदाचित आधी काही लहान प्रोजेक्टस् पू्र्ण करायचा विचार आहे. आणि कादंबरीचं विचारशील तर मला ‘कोसला’वर चित्रपट काढायला नक्की आवडेल.