शाहीर दादा कोंडके वसंत सबनीसांच्या ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले आणि त्यांना सिनेमा काढायची बुद्धी झाली. झाली म्हणजे काय, त्यांचे या क्षेत्रातले गुरू भालजी पेंढारकर यांनीच ही कल्पना त्यांच्या डोक्यात घुसवली. वर चार ओळीत एक कथा सांगून सबनीसांना पटकथा संवाद लिहायलाही भरीस घातलं! सबनीसांची चित्रपट लिहिण्याची पहिलीच वेळ. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पटकथेला भालजींनीच एका साच्यात बसवून दिलं आणि उषा चव्हाण या नव्या मुलीचं नाव नायिकेसाठी सुचवलं. मराठी चित्रपटसृष्टीसाठीला भालजींनी काय दिलं या यादीमध्ये त्यांच्या स्वत:च्या चित्रपटनिर्मितीच्या बरोबरीनं दादा कोंडके आणि वसंत सबनीस ही नावंही अग्रक्रमानं घ्यावी लागतील. या दुक्कलीचा हा पहिलाच सिनेमा होता आणि भालजींनीच सुचवलेलं त्याचं नाव होतं – सोंगाड्या.

’विच्छा’च्या पैशातून दादांनी सोंगाड्यासाठी पैसे जमवले आणि १९७१ साली एक लाख पाच हजार रूपयांमध्ये तो पूर्ण केला. वितरणासाठी त्यांना सत्तर हजारांची ऑफर आली आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांनाच तो वितरीत करावा लागला. सिनेमा दोन आठवडे मुंबईच्या कोहिनूरमध्ये चालला पण पुढे चालवायला त्यांनी नकार दिला. परिणामी दादांना बाळासाहेबांकडे मदत मागावी लागली आणि शिवसेनेच्या कोहिनूरवरच्या निदर्शनांमुळे त्यांना तो लावावा लागला आणि नंतर सलग ३६ आठवडे कोहिनूरमध्ये सोंगाड्या झळकत होता.

नाम्या हा सोंगाड्याचा नायक. पण नायकाचे असे गुण काही त्याचा अंगात नाहीत. साधाभोळा, अर्ध्या चड्डीतला, अगदी शेजारच्या शेवंताचं मन ओळखू न शकणारा. पण त्याचं सहज बोलणं आपल्याला पटू लागतं. त्याचं पहिलं दर्शन होतं तेच तो बैलांशी बोलत असताना. निवडणूकीचा माहौल आहे आणि नाम्या बैलांना देशाची मोट आपण ओढली पाहिजे वगैरे सांगतो आणि शेवटी ’चला काम करू या, बसून खायला आपण काय पुढारी आहोत का?’ हा अप्रतिम प्रश्न विचारतो.

तिथेच दोन पुढारी त्याला मत मागायला येतात. त्याला ’नामदेवराव’ म्हणतात त्यावर नाम्या ’एकदम नामदेवराव? मत मागायला आलेला दिसता’ असं म्हणतो. दोघा पुढा-यांची नाम्याचं मत कुणाला यावर बाचाबाची होते. त्यावर एक काँग्रेसवाला ’देशाचं स्वातंत्र्य कुणी आणलं’ असा ठेवणीतला प्रश्न करतो त्यावर नाम्या घाबरून-’आईशप्पथ मी नाई आणलं. उगाच माझ्यावर आळ घेऊ नका’ असं सांगतो. नाम्याचा बावळट चेहरा जेव्हा चटपटीत संवाद बोलतो तेव्हा आपल्याला फक्त नायकाचं यश दिसतं. लेखकालाही त्याचं श्रेय आपण द्यायला हवं.

असाच एक प्रसंग सबनीसांनी चांगला लिहिलाय. बत्ताशा या आपल्या मित्राच्या नादानं आयुष्यात पहिल्यांदाच तमाशा बघायला गेलेला नाम्या द्रौपदी वस्त्रहरणाचा वग बघतोय. इथले संवाद ’जानेभी दो यारों’ मधल्या वस्त्रहरणाचे संवाद विसरायला लावतील असे भन्नाट आहेत. दुर्योधन द्रौपदीला म्हणतो, ’तुझे पांडव माना खाली घालून बसलेत न्हाव्यामोरं बसल्यागत!’ आणि वर प्रेक्षकांकडे हात करून दु:शासनाला सांगतो- ’तू उगाच टाईमपास करू नकोस, लगेच वस्त्रहारण करून टाक म्हणजे समद्यांना घरला जायला मोकळीक!’ तिकडे कृष्णाचं काम करणारा पिऊन टाईट आहे त्याला लुगडीच सापडत नाहीत. इकडे वस्त्रहरण सुरू होतं. ते नाटक आहे हे विसरून नाम्या कासावीस होतो. सोंगाड्या ’टाईट’ झालेल्या कृष्णाला शोधून म्हणतो- ’अरे किस्न्या, काय कामाच्या वेळला दारू पितोस मर्दा, जा की. तिकडं बाई नागडी व्हायची पाळी आलीय!’ आणि हे ऐकून कृष्ण सोंगाड्याच्याच धोतराला हात घालतो! शेवटी नाम्या न रहावून स्टेजवर चढतो आणि भीमाच्या हातातली गदा ताब्यात घेऊन दे मार हाणामारी सुरू करतो. आणि नंतर खूप शिव्याही खातो. द्रौपदी झालेल्या कलावतीच्या मनात नाम्या जराशी जागा निर्माण करतो.

हा प्रसंग चित्रित झाला तेव्हा भालजी पेंढारकर सेटवर हजर होते. नाम्या स्टेजवर गोंधळ घालणार हे दृश्य त्यांच्या सल्ल्यानुसार दादा, कॅमेरामन सीताकांत लाड आणि दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांनाच माहिती होतं. ’अ‍ॅक्शन’ झाल्यावर कुणाला काही कळायच्या आत द्रौपदी वस्त्रहरण सुरू झाल्यावर दादा प्रेक्षकांना तुडवत स्टेजवर गेले आणि भीमाची गदा हातात घेऊन दिसेल त्याला बडवायला लागले. अगदी अनपेक्षित अशा हल्ल्यामुळे झालेली सगळ्यांची नैसर्गिक पळापळ कॅमेरामनना चित्रित करता आली. अर्थात पैसे घेऊन मार खाणा-या त्या कौरव-पांडवांकडे स्वत: गोविंदरावांना स्वतंत्र शिष्टाई करावी लागली!
पुढे बत्ताशा नाम्याला ’बाई तुझी चौकशी करत होती’ असं मुद्दाम सांगतो म्हणून तो कलावतीचा तमाशा बघायला त्याच्या ’आये’चा डोळा चुकवून पुन्हा तंबूकडे जातो. तिथे त्या दिवशी ’शीता रावणाचा विनोदी वग’ असतो. तो कलावतीला भेटतो. रिकाम्या हातानं कसं जायचं म्हणून घरच्या शेंगा आणि गुळ घेऊन जातो. कलावती गहिवरते. त्याला बसायला सांगते. तिकडे हनुमानाचा पार्टी ’लास’ होऊन पडलाय. आता आयत्या वेळी हनुमान कुठून आणायचा म्हणून चर्चा सुरू होते. नाम्या तिथेच आहे. त्यामुळे सगळे जण नाम्याला आधी हरभ-याच्या आणि मग हनुमान करून ख-या झाडावर चढवतात. आपणही पुढची धमाल अपेक्षेनं बघू लागतो.

अशोकवनात झाडावर बसलेल्या हनुमानाच्या हातातली अंगठी चुकून रावणाच्या डोक्यात अंगठी पडते, ती काढायच्या नादात त्याला प्रेक्षकात बसलेला आपला मामा दिसतो. मग झाडावरून उडी मारताना शेपूट तिथेच अडकते. मग हनुमान इतरांच्या शेपटीच्या जागा बघत स्टेजवरच शेपूट शोधत हिंडतो! शेवटी प्रेक्षकांना शेपूट दिसली का माझी असं विचारतो. त्यातला एक बहाद्दर ’झाडावर आहे’ असं उभं राहून सांगतो. पुढचे संवाद अर्थातच हनुमानाचा मुखवटा घातलेला नाम्या आणि स्टेजवरची इतर पात्र यांच्यात-

रावण: सीते, हाच का तो रामाचा दूत हनुमान?
हनुमान: शेपूट लावून येतो मग हनुमान म्हणा!
रावण: जारे ए माकडा -
हनुमान: ए हरामखोर, माकड कुनाला बोलतो? (सीतेकडे येऊन) बाई ही तुमची अंगठी घ्या (आता मुख्वटा काडून रावणाकडे बघून) याची दहाही तोंडं फोडून ठेवीन!

तेवढ्यात पिटातून मामा ’नाम्याSS’ असं ओरडतो. नाम्याला मामाच्या जागी दहा तोंडाचा रावण दिसतो. नाम्याची घरी गेल्यावर धुलाई होते. ’तमाशात नाचन्यापरी ल्हानपनीच मेला का नाहीस?’ या आयेच्या प्रश्नाला नाम्या ’आता आम्हाला लहानपनी काय कळत होतं कसं मरायचं ते?’ हे उत्तर देतो. परिणामी नाम्याची घरून हकालपट्टी होते.

नाम्या योगायोगाने कलावतीच्या ताफ्यात दाखल होतो आणि हळूहळू सोंगाड्या म्हणून काम करायला लागतो. प्रत्यक्ष वगात तो कृष्ण म्हणून येतो. एका सवाल-जवाबात तुझी मुरली कुठाय यावर नाम्याचं धमाल उत्तर- ’काळ लई झपाट्यानं बदलला. आम्ही याच गोकुळात रोपं लावली होती, त्या रोपांच्या राया झाल्या, कालवडीच्या गाया झाल्या, पोरींच्या बाया झाल्या तशा आमच्या मुरलीचा झालाय पावा!’

कलावती पैशांसाठी बैठकीची लावणी करते. तिथला दौलतजादा बघून नाम्या संतापतो. पण कंत्राटदार लाल्याशेटच्या आग्रहामुळे हे करावं लागतं आणि असं करायचं नसेल तर स्वत:चा फड उभा करावा लागेल हे कलावती सांगते. नाम्या आता त्याचा ध्यास घेतो. पैसे आणायला म्हणून बाहेर पडतो. लाल्याशेट त्याला रस्त्यात बेदम चोप देतो. पण नाम्या वाचतो. कसाबसा बत्ताशाकडे पोचतो. त्याला पैसे मागतो. बताशा म्हणतो कालच विहिरीसाठी तगाई काढली तीन हजाराची, दोन तुला देतो. नाम्या तगाईतले पैसे नको म्हणतो त्यावर बत्ताशा म्हणतो की ’आमच्याकडे अशीच पद्धत आहे, विहिरीसाठी तगाई काढायची-पोराचं लगीन उरकायचं, अवजारांसाठी पैसे काढायचे-घर बांधायचं. या तगाईमुळे खूप सुधारणा झालीय!’ विषय कुठलाही असला तरी समाजातल्या प्रवृत्तींवर मार्मिक टिप्पणी करण्याची एकही संधी लेखकानं सोडली नाहीये.

नाम्या पैसे घेऊन कलावतीकडे जातो. ती खूश होते. तुम्हाला बघून बरं वाटलं म्हणते. लाल्याशेट-नाम्याची मारामारी होते.. शेट मार खातो. आणि कलावतीबाई सांगलीकरीण यांचा नवा तमाशा उभा राहतो.

नाम्या परत येण्याची आशा त्याच्या आईनं सोडलीय. तिच्याच सल्ल्यानं शेवंताची आई बत्ताशाबरोबर तिचं लग्न करून देते. बत्ताशाला ती आवडत असतेच. लग्नानंतर ती दोघं आयेला नमस्कार करायला येतात. त्याचवेळी पोस्टानं नाम्याकडून चार हजार रूपये येतात, बत्ताशाचे घेतलेले दोन हजार परत आणि दोन हजार अहेर म्हणून. शेवंताला आशीर्वाद लिहायला नाम्या विसरत नाही.

तिकडे लाल्याशेट कलावतीचा तमाशा उधळून लावताना पकडला जातो. लोक त्याला मारतात पण नाम्याच सोडवतो. आडवाटेनं गेला तरी आमचाच माणूस आहे, म्हणतो.

नाम्याचं प्रेमळ आणि सज्जन व्यक्तिमत्व हळूहळू उलगडत जातं. कलावतीकडे येणा-या एका संशयास्पद माणसाच्या मागे नाम्या जातो आणि तमासगीरांच्या मुलांसाठी ती मदत करत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. आपण खूप पैसे मिळवून या मुलांसाठी शाळा काढू असं तो तिला सांगतो. ते महाराष्ट्र गाजवतात. आणि आपला निर्णय प्रत्यक्षात आणतात. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बत्ताशा आयेला घेऊन येतो. तिथे आये कलावतीचं मन ओळखते आणि दोघांचंही लग्न जुळवते.

साधी सरळ कथा आणि सरळसोट दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं साधेपणा हेच वैशिष्ट्य आहे. साधाभोळा नाम्या हा शेवटपर्यंत तसाच राहतो. सिनेमात एरवी दिसणारी झिरो टू हिरो ट्रांझिशन बिंझिशनची भानगड नाही. ’माळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी’ सारख्या कल्पनागीतातही नाम्याचा ’हिरो’ होण्याचा अट्टाहास दिसत नाही. त्यामुळे हिरोगीरी सिद्ध करण्यासाठी एरवी माराव्या लागणा-या लॉजिकच्या कोलांटउड्या सिनेमात नाहीत. अपघातानं सोंगाड्या झालेल्या नाम्याची ही कथा फार वाकडीतिकडी वळणं न घेता समाजावर हलकीफुलकी टिप्पणी करत संपते.

सिनेमातली ’राया मला पावसात नेऊ नका’ आणि ’काय गं सखू’ ही चित्रपटातली गाणी शाहीर दादा कोंडकेंच्या कलापथकातून चित्रपटापूर्वीच लोकप्रिय झालेली होती. त्यात ’माळ्याच्या मळ्यामदी’ आणि ’बिबं घ्या बिबं’ या गाण्यांची भर पडली. ’बिबं घ्या’चा आज विशेष उल्लेख करायचा मोह होतोय. त्यातले साधे शब्द, नेमका आशय आणि गायिकेचा अतिशय सुंदर लागलेला आवाज दाद देण्याचं भानही विसरायला लावतो.

सोंगाड्या चालला. तुफान चालला. एवढंच नाही तर त्यापूर्वी चार-पाच वर्ष चित्रपटगृहापासून दूर गेलेला मराठी प्रेक्षक त्यानं पुन्हा खेचून आणला. १९६५ सालच्या ’इये मराठीचिये नगरी’ या रंगीत चित्रपटाच्या अपयशानं साक्षात व्ही. शांतारामांनीही धसका घेतला होता. सोंगाड्याच्या यशामुळे त्यांनाही पुन्हा एकदा मराठी सिनेमा करावासा वाटला आणि त्यानंही पुढे इतिहास घडवला, तो चित्रपट होता पिंजरा! दादांचं हे योगदान शांतारामबापूंनीही मान्य केलंय.

दादांच्या सलग नऊ सिल्व्हरज्युबिली सिनेमांच्या जागतिक विक्रमाची सुरूवात ’सोंगाड्या’नं झाली. मराठी चित्रपट गिनीज बुकात पोचला. पण त्याहीपूर्वी तो प्रेक्षकांच्या मतात पोचला होता. सोंगाड्याचं हेच वैशिष्ट्य आहे.

प्रसाद नामजोशी
prasadnamjoshi@gmail.com

सोंगाड्या(१९७१)
दिग्दर्शन: गोविंद कुळकर्णी
कथा, पटकथा, संवाद: वसंत सबनीस
सिनेमॅटोग्राफी: सीताकांत लाड
संगीत: राम कदम
कलाकार:
नाम्या- दादा कोंडके
कलावती- उषा चव्हाण
याशिवाय निळू फुले, रत्नमाला वगैरे.