काही चित्रपट डोक्यातून जाता जात नाहीत. एकदा बघा, दहादा बघा, प्रत्येकवेळा त्यातल्या काही ना काही विषयाची चर्चा होत राहते, काळ बदलतो, संदर्भ बदलता आणि बदललेल्या संदर्भानंसुद्धा हे चित्रपट पुन्हा एकदा बघितले जाता आणि वर्षानुवर्ष त्यांचा ताजेपणा कायम राहतो. सामना हा असाच एक चित्रपट आहे.

१९७५ मधला हा चित्रपट पटकथा आणि संवाद लेखक म्हणून तेंडुलकरांचा आणि दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांचा पहिलाच चित्रपट. ’शांतता! कोर्ट चालू आहे’ हा चित्रपट त्यापूर्वीचा म्हणजे १९७२ मधला, पण तेंडुलकरांच्याच नाटकावर तो बेतलेला होता. खास चित्रपटासाठी म्हणून स्वतंत्र कथा लिहिण्याची ही तेंडुलकरांची पहिलीच वेळ. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या वेळी ’सामना’ची जाहिरात ’विजय तेंडुलकरांनी लिहिलेला चित्रपट’ अशी करण्यात आली होती.

चित्रपटासाठी तेंडुलकर आणि जब्बारना एकत्र आणण्याचं श्रेय निर्माते रामदास फुटाणे यांना. त्यांनी तेंडुलकरांना सांगितलं की मला चित्रपट करायचाय आणि तो तुम्ही लिहा. त्यावेळच्या निळू फुले आणि श्रीराम लागू या दोन मोठ्या नटांना समोरासमोर आणावं या हेतूनं तेंडुलकरांनी कथेचा विचार सुरू केला. मग हिंदुराव आणि मास्तर या दोन भूमिका त्यांनी उभ्या केल्या आणि तेंडुलकरांच्याच शब्दात सांगायचं तर ’नटांसाठी भूमिका आणि भूमिकांसाठी कथानक अशा चुकीच्या पद्धतीनं हा सिनेमा लिहिला!’

त्याचवेळी तेंडुकरांचं जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेलं ’घाशीराम कोतवाल’ नाटक रंगभूमीवर गाजत होतं. फुटाणेंनी ते बघून त्यांना ‘सामना’च्या दिग्दर्शनासाठी विचारलं. चित्रपटाचा अनुभव नसल्यामुळे मागेपुढे बघत असलेल्या जब्बार पटेल यांच्यावर फुटाणेंनी विश्वास दाखवला. (त्यावेळी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या समर नखाते यांनी त्यांना दिग्दर्शन सहाय्यक म्हणून मदत केली!) ’सामना’ तयार झाला आणि व्हेनिस चित्रपट महोत्सवापर्यंत त्याची दखल घेतली गेली.

जब्बार यांचा ‘सामना’ हा पहिला चित्रपट. पहिलेपणाची लक्षणं त्यात जाणवत नाहीत. कदाचित आजच्या दृष्टीकोनातून बघताना आणि जगभरातले सिनेमांचा अ‍ॅक्सेस असणा-या तरूणांना त्याच्या ट्रीटमेंट मध्ये कदाचित नाविन्या जाणवणार नाही, पण पस्तीस वर्षांपूर्वीच्या मराठी सिनेमांचा ट्रेंड बघितला तर त्या दृष्टीनं सामना हा ’मॉडर्न’ वाटतो. दिग्दर्शक म्हणून जब्बारना याचं श्रेय दिलं पाहिजे.

सामनाची कथा तेंडुलकरांची. निळू फुले आणि श्रीराम लागू या दोन अभिनेत्यांना आमनेसामने उभं करायचं या हेतूनेच मुळात त्यांनी ही कथा लिहिली. सहकार क्षेत्राची पार्श्वभूमी या कथेला आहे. एका वैराण माळावर हिंदूराव धोंडेपाटलांनी सहकाराच्या माध्यमातून एक साम्राज्य उभं केलंय. अर्थात हे त्यांनीच उभं केलेलं साम्राज्य असल्यामुळे त्याचे तेच स्वयंघोषित सम्राट आहेत. सर्जेराव हा त्यांचा आडदांड भाऊ. त्याच्या मनगटाचा जोर आणि हिंदूरावांचं राजकारण या दोन गोष्टींच्या माध्यामातून सम्राट हिंदूराव आपल्या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडताहेत. मात्र हा विकास त्यांना त्यांच्याच पद्धतीनं करायचाय. त्यामुळे लष्करातून पराक्रम गाजवून परत आलेला मारूती कांबळेचा राजकीय विरोध त्यांनी मारूती कांबळेसकट नष्ट केलाय.

याच सुमारास एकेकाळचे गांधीवादी आणि गांधीवादानंतरच्या एकंदरीत सगळ्याच नैराश्यामुळे गांधीवादाऐवजी दारूवादी झालेले मास्तर गावात येऊन पडतात. पडतात म्हणजे काय तर दारूच्या नशेतल्या मास्तरांना एस्टीतून कंडक्टर धक्का मारूनच स्टँडवर फेकतात. त्यामुळे ते अक्षरश: पडतातच. गावात सर्वत्र नजर असलेले हिंदुराव बुद्धिजीवी वाटणा-या या मास्तरांना मात्र आपल्याकडे ठेऊन घेतात. हिंदुराव आणि मास्तरांची जवळीक वाढू लागते. मात्र हे मास्तरच हिंदूरावांचं साम्राज्य हळूहळू उध्वस्त करण्याला कारणीभूत ठरतात.

एका प्रसंगात एरवी दारू-सिगारेटपासून दूर असलेले हिंदूराव मास्तरांना घेऊन जिवाची मुंबई करायला जातात आणि त्यांच्या सहवासात मख्खासारखे बसून असलेल्या मास्तरांना ते म्हणतात- “मास्तर, तुम्ही आम्हाला घाबरत नाही, तेव्हा तुम्ही आमचे मित्र तरी व्हा किंवा शत्रू तरी व्हा” –ह्या प्रसंगातून मास्तरांबद्दल हिंदूरांवाना काय वाटतंय ते कळायला मदत होते.

मास्तर गावात पहिल्यांदा येऊन पडतात त्या दिवसापासूनच मारूती कांबळे या नावाविषयीची गावामध्ये चाललेली कुजबूज ते ऐकत असतात आणि जेव्हा ही टोकाला जाते तेव्हा मास्तरांचा चौकस स्वभाव जागृत होतो आणि लाज, लज्जा आणि भीती या गोष्टी गुंडाळून ठेवलेले मास्तर या प्रश्नावर थेट हिंदूरावांशीच टक्कर घेतात. हिंदूराव आणि मास्तरांचा सुरू झालेला हा ’सामना’ अवघड वळणं घेत हिंदूरावांच्या अटकेनंतर संपतो आणि ’कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ अशा अवस्थेत कुठूनतरी आलेले मास्तर कुठेतरी जायला निघतात!

सहकारी राजकारणाची ग्रामीण पार्श्वभूमी असलेली खणखणीत कथा; ’आम्ही अडाणी माणसं’ असं बेअरिंग घेतलेले हिंदूराव आणि लाचारीचं बेअरिंग घेतलेले मास्तर ही दोन अस्सल पात्रं; थेट, स्पष्ट आणि नेमके संवाद आणि या सगळ्यांचा तोल सांभाळलेलं दिग्दर्शन यामुळे ’सामना’ लक्षात राहतो.

चित्रपटातली काही दृष्यं जशी संवादासाठी लक्षात राहतात तशीच काही दिग्दर्शनासाठीही. हिंदूरावांचा वाड्याचं पहिलं दर्शन होतं तेच बंद दार आणि दाराशी बांधलेल्या कुत्र्यांसह. हिंदूरावांच्या दारातली ही कुत्री चित्रपटात पुन्हापुन्हा येतात. हिंदूरावांचा ’दरबार’ पहिल्यादा दिसतो तेव्हा त्यांच्याकडे मंदिरासाठीची परवानगी मागायला आलेलेल काही धनगर माणसं आलेली आहेत. याचवेळी कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येतं आणि पाठोपाठ धनगरांच्या चेह-यावरच्या अजीजीवर हिंदूरावांचा खणखणीत आवाज येतो- ’त्या कुत्र्यांना खायला घाला, खाऊन खाऊन माजलेत!’ आणि चित्रपटाच्या सुरूवातीला पूजाबिजा करणा-या हिंदूरावाचं खरं व्यक्तिमत्व हळूहळू उलगडत जातं. पुढे ह्यातल्याच एका कुत्र्याला मिठी मारून दारूच्या नशेत मास्तर ’आपली भारतीय संस्कृती उच्च आहे’ वगैरे सांगतात! हा मात्र खास तेंडुलकर टच.

हिंदुरावांना अडचणीचे प्रश्न विचारणारे मास्तर आडदांड सर्जेरावाला जो प्रश्न विचारतात तो लाजवाब आहे. ’आपल्या सुंदर बिनडोकपणाचं रहस्य काय?’ हा तो प्रश्न! आज सामना लिहून तब्बल सदतीस वर्षं झालीत पण असा प्रश्न विचारावासा वाटावा असे प्राणी आजूबाजूला सहज सापडतील. (कोण जाणे, कदाचित त्या काळापेक्षा आज ही संख्या वाढलेलीही असेल!) सर्जेरावा मास्तर हा प्रश्न विचारून चिडवतात आणि वर ’नका देऊ उत्तर. आम्ही शोधून काढू आपलं हे गुपित आणि ते प्रकाशात आणू आणि आपल्यासारखेच बिनडोक होऊन दाखवू’ असं सांगून स्वत:च्या व्यक्तिमत्वाविषयी प्रेक्षकांच्या मनात एक विक्षिप्त पण आदराची भावना निर्माण करून ठेवतात!

हिंदूरावांच्या सांगण्यावरून मास्तर आता पोल्ट्री फार्ममध्ये कारकूनी करताहेत आणि पुन्हा मारूती कांबळेविषयी कुजबुज ऐकतात. हे नाव कुठे बरं ऐकलंय, हे काही त्यांना आठवत नाही. डोक्यात विचारांचा कल्ला होतो. पोल्ट्रीतल्या कोंबड्यांचा कलकलाट वाढू लागतो. कॅमेरा मास्तरांवर रोखला जातो. बुद्धिजीवी मास्तरांच्या डोक्यातला बुद्धिभेद दिग्दर्शकीय सहजतेनं प्रेक्षकांपर्यंत पोचतो.

त्याच रात्री मास्तरांची ’काळजी घ्यायला’ हिंदूराव त्यांच्या घरी एक बाई पाठवतो. तिला परत जा म्हणताना तिच्या ढळत्या पदराकडे बघून मास्तर चळतात. तिला थांबवून घेतात. हिंदुरावांना दुस-या दिवशी मास्तरांची चिठ्ठी मिळते- ’दोन शंका: एक- इष्क करण्या रात्री जागे कसे रहावे? दोन- मारूती कांबळे कोण? –आभार, मास्तर’. एकमेकांशी संबंध नसणा-या या दोन प्रश्नांचा एकाच चिठ्ठीत समावेश करून लेखक इथं रसिकांची सूक्ष्म पण जाणती दाद घेतो. एखाद्या चित्रपटात लेखक ’दिसावा’ तो असा!

हिंदूराव मास्तरांना वाड्यावर बोलावतात. इथली प्रकाशयोजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदूरावांच्या चेह-याची एक बाजू प्रकाशमान आहे तर दुसरी पूर्ण अंधारात. आतापर्यंत आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्नरत असणा-या हिंदूरावांचे दोन चेहरे या दृष्यात अधिक स्पष्ट होत जातात.

“काय घेणार?” -हिंदूराव विचारतात.

“पाणी द्या, तहान फार लागते” –मास्तर उत्तरतात.

मास्तरांची ही तहान इष्काची की हिंदूरावांच्या साम्राज्याविषयी येणा-या शंकांची असा प्रश्न आपल्याला पडतो पुढच्याच शॉटमध्ये दिग्दर्शक आपल्याला लो अँगलनं हिंदूरावांचं दर्शन घडवतो. त्यामुळे या सम्राटाची जरब ऐकू येते तशीच ’दिसते’ही.

“निवडूंगात शहाण्या माणसानं पाय घालू नये, पस्तावाल” –हिंदूराव.

“जन्मभर निवडूंगच तुडवला आम्ही आणि शहाण्या माणसांत आमची गणना होत नाही. आम्ही गाढव. तेव्हा आमच्या पस्तावण्याची चिंता करू नका” –मास्तर.

पुढे त्या दोघांच्या बोलण्यात मारूती कांबळे हिंदूरावाला आठवत राहतो. कबड्डीचा खेळ. विरुद्ध बाजूच्या मजबूत हातांमधून मुसंडी मारून एक जण आपला हात मुख्य रेषेला स्पर्श करू बघतोय, पण विरुद्ध बाजू बळकट असल्यामुळे ते जमत नाही. जीवाच्या आकांतानं रेषेपर्यंत पोचू बघणारा हा हात मारूती कांबळेचा असल्याचं दिसतं आणि दिग्दर्शक आपल्याला मारूती कांबळेविषयी सुचवू बघतो.

मारूती कांबळेविषयी चौकशी करू नका असं स्पष्टपणे हिंदूराव मास्तरांना सांगतात. पण एकेकाळचे गांधीवादी मास्तर प्रश्नाच्या शोधापासून दूर जाणार नाही हे ज्या संवादानं सुचवतात तो संवाद चांगला आहे. मास्तर म्हणतात-

“ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य कसा मावळत नाही या प्रश्नामागे लागलो आणि दोन तपांनंतर उत्तर मिळालं की मावळतो-”

पुढे मास्तरांचं मारूती कांबळेचं काय झालं याच्या चौकशीसाठी आमरण उपोषण सुरू होतं. त्याला राजकीय रंग प्राप्त होतो. हिंदूरावांना चोरासारखं लपावं लागतं. मास्तर त्यांना शोधून काढतात. आत्महत्या करणा-या हिंदूरावांना मास्तर सांगतात –“आपण मरण निवडू शकत नाही, जगणं निवडू शकतो, तेही काही वेळा”

त्या वेळेचे दिग्गज कलाकार ‘सामना’त होते आणि हा चित्रपट त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात मैलाचा दगड ठरला. निळू फुलेंचा ‘सखाराम बाईंडर’ मधला अभिनयातला तोचतोपणा ‘सामना’ मध्ये जाणवत नाही याचं श्रेय फुलेंबरोबर जब्बारला जातं असं २५ जानेवारी १९७५ ‘रसरंग’मधल्या ‘सामनाच्या’ परिक्षणात त्या काळी म्हटलं गेलं होतं. निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या ‘सामना’मधल्या अभिनयाच्या जुगलबंदीची चर्चा तर आजही होते.

चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात रूढार्थानं ‘व्हिलन’ नाही. किंबहुना प्रत्येक पात्राला चांगली वाईट अशा दोन्ही शेड्स आहेत. ‘चांगलं-वाईट, बरोबर-चूक असली लेबलं आपण लावलीत तर आपण सत्य कधीही पूर्णत्वानं बघू शकणार नाही’, हे तेंडुलकरांचं मत या चित्रपटांचे लेखक म्हणूनही या निमित्तानं लक्षात घ्यायला हवं. सामनातल्या हिंदूरावांचं पात्र निगेटिव्ह असलं तरी ते दुष्ट नाही. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ह्या ध्येयानं हिंदूराव पछाडलेले आहेत फक्त हा विकास आपणच करावा आणि आपल्याच पद्धतीनं तो व्हावा असा त्याचा आग्रह आहे इतकंच. तुमच्या भागाला तुमची गरज आहे असं आव्हान मास्तर करतात आणि परागंदा हिंदूराव पोलिसांच्या स्वाधीन होतात हे दृष्यही या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.

‘सामना’च्या ट्रीटमेंटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य पात्राला चित्रपटभर एका गीताचा आधार आहे. आणि ही गीत कथेतल्या परिस्थितीमधून पार्श्वभूमीला येतं, कुणाच्या तोंडी नाही. एकप्रकारचं चित्रपटाचं सार सांगावं अशी ताकद या गाण्याच्या शब्दांमध्ये आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ वागवत हिंडणारे सामनातले मास्तर आजही कालबाह्य वाटत नाहीत. शब्दांची ताकद मोठी विलक्षण असते याची जाणीव या निमित्तानं होते.

सामना हा बहुरंगी आणि बहुढंगी आहे. हिंदूराव आणि मास्तर या पात्रांचा तर तो आहेच पण निळू फुले आणि श्रीराम लागू या कलाकारांचाही आहे आणि विजय तेंडूलकर आणि जब्बार पटेल यांचाही तो आहे.

प्रसाद नामजोशी

prasadnamjoshi@gmail.com

सामना(१९७५)

दिग्दर्शन: जब्बार पटेल

कथा, पटकथा, संवाद: विजय तेंडुलकर

सिनेमॅटोग्राफी: सूर्यकांत लवंदे

संगीत: भास्कर चंदावरकर

कलाकार:

मास्तर- श्रीराम लागू

हिंदूराव धोंडेपाटील- निळू फुले

याशिवाय मोहन आगाशे, स्मिता पाटील वगैरे.

 

प्रसाद नामजोशी यांच्या या लेखाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याच्याच मागोमाग आता वाचा ‘सामना’चे निर्माते रामदास फुटाणे यांनी मेनका प्रकाशनच्या ‘गंधर्व’ या सिनेसाप्ताहिकासाठी 1985 मध्ये घेतलेली खुद्द विजय तेंडूलकरांची मुलाखत…इथे क्लिक करा