डिसेंबर महिना सुरू झाला की आम्हाला हुडहुडी भरते. ग्लोबल वार्मिंगमुळे हल्ली थंडीसुद्धा वाढते आहे असं काही विद्वानांचं म्हणणं आहे. या काही विद्वानांचीपण कमाल आहे! वॉर्मिंगमुळे उबदार वाटायच्या ऐवजी थंडी कशी वाजते या प्रश्नाचं उत्तर काही ते द्यायला तयार नाहीत. पण आमची हुडहुडी ही थंडीच्या गारठ्यामुळे भरलेली नसून थंडीतल्या उत्साहामुळे आहे. कारण सध्या दिवस हे उत्साहाचे, उत्सवाचे आणि म्हणून हुडहुडीचेही आहेत कारण या उत्साहात कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही! आणि या अती उत्साही मंडळींच्या कल्पनेनंच आम्हाला हुडहुडी भरते! आणि हुडहुडी म्हणजे काय आम्ही चक्क गोधडी पांघरून बसतो. (आम्हाला गोधडीच लागते. फ्लॅनेलच्या ब्लँकेटमध्ये आम्हाला जास्त थंडी वाजते!)

तर थंडीमुळे सध्या गावोगावी उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी उठून मंडळी फिरायला बाहेर पडतात. सकाळचा कुठलासा ऑक्सिजन (फुकट्यात) आपल्या फुफ्फुसात भरून घेतात. आपल्या सकाळी उठण्यामुळे सा-या शहराचा उत्साह वाढला आहे असंही काहींना वाटतं. त्यामुळे हे प्रात:कालीन वीर सक्काळी सक्काळी इतरांना फोन करून झोपेतून उठवतात आणि ’सुप्रभातम्! काय झोपला होतास वाटतं?’ असा सवाल करून मी लवकर उठतो याची जाणीव करून देतात!

वास्तविक सकाळी सहाला फोन करून ’झोपला होतास वाटतं’ हे वाक्य आणि रात्री अकराला फोन करून ’काय झोपायची तयारी का?’ हा प्रश्न यासारखे चीड आणणारी दुसरी गोष्ट नसेल. यावेळी दुसरं काय करतात मग माणसं? त्यातल्या त्यात रात्रीच्या ’काय झोपायची तयारी का?’ या प्रश्नाला ’हो, जवळजवळ झोपायचीच तयारी’ असं वात्रट उत्तर देता तरी येतं. पण सकाळच्या फोनला काय कपाळ उत्तरं द्यायचं?
थंडीमध्ये या सकाळी उठण्याच्या उत्साहात भर म्हणून ठिकठिकाणी वेगवेगळे उत्सव, महोत्सव आणि फेस्टिव्हल्सही होतात. आता उत्सव म्हणजेच महोत्सव म्हणजेच फेस्टिव्हल असंही तुम्ही म्हणाल पण तसं नसतं. उत्सवाचं पब्लिक वेगळं, महोत्सवाचं वेगळं आणि फेस्टिव्हलचं वेगळं. ’परिवारा’चा होतो तो उत्सव, पुण्यात होतो तो (एकूण मिळून तीन लोकांचा असला तरी) महोत्सव आणि फिल्मचा होतो तो फेस्टिव्हल! उत्सवाला पणती पुरते, महोत्सवाला समईच लागते आणि फेस्टिव्हलला मात्र एलईडी डिस्प्ले लागतो असा तो फरक आहे.

सध्या संगीत महोत्सवांचे दिवस सुरू आहेत. हे महोत्सव बहुदा शास्त्रीय संगीताचे असतात. त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता आता यापुढे फक्त शास्त्रीय संगीतच टिकून रहाणार आणि सिनेसंगीत वगैरे पार हद्दपार होणार की काय अशी शंका येते. पण शहाणी माणसं संख्येवर हिशेब करत नाहीत म्हणून बरंय. आणि अशा महोत्सवांना जाणं ही हल्ली एक फॅशनच झाली आहे.

पुण्यात ज्या अनेक फ्याशनी वेळोवेळी येत असतात त्यातली लेटेस्ट फॅशन म्हणजे अशा क्लासिकल महोत्सवांना हजेरी लावणे ही आहे. आपल्याला त्यातलं काही कळो किंवा न कळो, आपण तिथे गेलं पाहिजे असं अनेकांना वाटत असतं. मग रात्रभर जागरण झाल्यावर दुस-या दिवशी उशीरा उठणा-या लेकीचं ’सध्या ती सवाईला जाते ना’ असं कौतिक आईवडलांना इतरांपाशी करता येतं. त्यामुळे नुस्तं फॅशन म्हणून सवाई गंधर्व महोत्सवाला जाणं हे महत्वाचं नसून महोत्सवाच्या पंधरा दिवस आधी आणि त्यानंरही ’हल्ली मी सवाईला जातो’ हे वाक्य ’सध्या सगळीकडेच फार काँपिटिशन आहे बुवा’ किंवा ’आजकाल पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत’ अशा सहजतेनं उच्चारता आलं पाहिजे! त्यात जी गंमत आहे ती प्रत्यक्ष महोत्सवात गाणं ऐकण्यातही नाही!

अशा कार्यक्रमांना प्रत्यक्ष जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्यासाठी शास्त्रीय संगीत वगैरे कळण्याची गरज नाही. हे काम ज्यांचं त्यांनीच करावं हे योग्य. आपण मात्र चेह-यावर खरा आनंद ’क्लासिकल’मध्येच आहे असा भाव ठेवावा. आणि असा भाव ठेवणं जमत नसेल तर चेह-यावर ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा भाव किंवा संपूर्ण तुच्छता असा कुठलाही प्रकार चालेल. त्याशिवाय तुम्हाला तुम्ही खरे रसिक आहात अशी पावती मिळणं कठीण आहे.

दुसरं महत्वाचं म्हणजे ड्रेस कोड. अशा महोत्सवांना जर तुम्ही टीशर्ट किंवा साधा शर्ट किंवा सामान्य ड्रेस घालून गेलात की तुम्ही पहिल्यांदाच इकडे आला आहात हे कोप-यावरचा चहावालासुद्धा ओळखेल. (त्यानं तुमच्यापेक्षा जास्तवेळा असे महोत्सव ऐकलेले असतात!) त्यामुळे तुम्ही एक चांगलासा कुडता घालून गेलं पाहिजे. तोसुद्धा त्याच्या विशिष्ट स्टाईलमुळे ’फॅब’चा आहे हे बघणा-याला लगेच कळलं पाहिजे म्हणजे पुढच्याला किमतीचाही अंदाज येतो. फक्त गुलाबी किंवा पांढरट रंगाच्या कुडत्यावर गळ्याभवती खूप नक्षिकाम असणारा कुडता घालू नका नाहीतर तुम्हालाच लोक तबलजी समजायचे.

त्यालाही खरं तर हरकत नाही पण नेमकाच शेजारी चुकून एखादा जाणकार बसलेला असायचा आणि तुम्हाला ’बैरागी कानडाच ना हा?’ असं काहीतरी विचारायचा आणि तुम्हाला त्या प्रश्नातला ’ना हा?’ याव्यतिरिक्त कुठलाच भाग कळायचा नाही. त्यापेक्षा साधा कुडता बरा. तो घालून अशाच एखाद्या दुस-या कुडतेवाल्याच्या शेजारी जागा पकडून बसायचं. म्हणजे तो आपल्याला जाणकार समजतो आणि आपण त्याला. आणि मग कुणीच कुणाला काही विचारत नाही. त्यामुळे एकदा का गायकानं ’सा’ लावला की आपण ’क्या बात है’ असं म्हणून अशीच दाद देण्यासारखी आणखी काही वस्तू ऑडियन्समध्ये दिसते का ते निरखायला मोकळे. कारण तशी ती असतेच!

तर एकदाचं गाणं किंवा वाजवणं (काही का असेना, आपल्याला काय फारक पडतो? कसं म्हणता?) सुरू झालं की अधून मधून दाद ही देता यायलाच पाहिजे. ही शक्यतो ऊर्दूत असावी. त्यासाठी आपली मातृभाषा ऊर्दू असण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्याची भाषा वेगवेगळी असते. जसं ’चुकलं’ किंवा ’धन्यवाद’ म्हणायची या देशातली भाषा इंग्रजी आहे तशीच दाद देण्याची भाषा ऊर्दूमिश्रित हिंदी आहे. शिव्या जशा मातृभाषेतच द्याव्यात तशी दाद ऊर्दूतच द्यावी. त्यामुळे ’क्या बात है’ ऐवजी जर ’छान’ असं म्हटलं तर तुम्ही खरे रसिक नव्हेतच अशा वटारलेल्या डोळ्यांनी इतर रसिक (हे तेवढे खरे रसिक!) श्रोते आपल्याकडे बघतात. तेव्हा मध्येच ’क्या बात है!’, ’बहुत बढिया!’ असं म्हणता आलं पाहिजे.

मात्र हे कधी म्हणायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची काळजीच करू नका. त्यासाठी तुम्हाला गाणं कळण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण दाद कुठे द्यायची ते बहुतेक वेळा तो गाणारा गायकच आपल्याला गाता गाता सुचवत असतो! त्यानं नाही सुचवलं तरी त्याच्या आजूबाजूच्या वादक साथिदार मंडळींकडे लक्ष ठेवलं तर कुणीतरी ते सुचवतंच.

आता दाद देण्याच्या वेळा आणि प्रकारही अनेक आहेत. एक दाद एकदा सुरूवातीलाच द्यायची असते. म्हणजे गायक तानपु-याच्या ताराबीरा लावून माईकमध्ये तोंड घालून ’आज हम पूरिया गायेंगे’ म्हटल्यावर तात्काळ ’क्या बात है’ म्हणता आलं पाहिजे. काही उत्साही मंडळी इथे टाळ्याही वाजवतात. आणि काही आळशी मंडळी इतरांच्या कानाला लागून ’काय म्हणाले? मारवा का?’ असाही प्रश्न विचारतात. त्यांना तात्काळ ’पूरिया’ असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यावर तोही भक्तिभावानं ’क्या बात है, पूरिया म्हणजे प्रश्नच नाही’ असं म्हणतो. या भानगडीत पूरिया आणि मारवा म्हणजे काय ते कळण्याची गरज नाही हे लक्षात घ्या. कारण दाद देणा-यांनाही ते कळतंच असं नाही!

त्यानंतर गायक ज्या गावात सध्या गातोय त्याचं नाव घेऊन तिथे गाण्याची मजा काही औरच आहे आणि तिथल्या रसिकांची दाद महत्वाची असते असं आवर्जून सांगतात. म्हणजे पुण्यात असताना ’पूनामें गानेका मजाही और है’, नागपूरला ’नागपूरकी बातही और है’ इंदोरला ’इंदोरके श्रोता मतलब क्या बात है’ वगैरे. तेवढंच प्रत्येकाला बरं वाटतं. इथे श्रोत्यांनी योग्य अशी दाद द्यायला पाहिजे. त्यानंतर मग फोटोग्राफर्सला पोझ देऊन गाण्याची सुरूवात होते.

गाणं सुरू झालं की दाद देण्यासाठी ’क्या बात है’ च्या बरोबरीनं मधून मधून हातवारेही करता आले पाहिजेत. मध्येच मानेला झटका देऊन उजवा हात ’ने त्याला तसंच तिकडे’ अशा अर्थानं हलवता आला पाहिजे.

तर असं दोनतीन वेळा महोत्सवांना हजेरी लावली की आपली उपस्थिती रसिक श्रोत्यांमध्ये मोडायला सुरूवात होते. आणि आपल्यालाही आपण खरोखरच रसिक आहोत असं वाटायला लागतं. तसं हे सगळं नीट जमणं अवघड आहे, त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. पण प्रत्यक्ष शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यापेक्षा हे तुलनेनं बरंच सोपं आहे.

तर साध्या श्रोत्यांनो थंडी वाढते आहे. महोत्सवांचं वातावरण आहे. तेव्हा रसिक श्रोते होण्याच्या तयारीला लागा.

प्रसाद नामजोशी
prasadnamjoshi@gmail.com