“महाराष्ट्राचा फेवरेट कोण” हा अल्पावधीतच रसिकमान्यता मिळवणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे पडघम सुरु झालेत. झळाळत्या तारांगणाने सजणारा आणि ग्लॅमरने उजळून निघणारा ”महाराष्ट्राचा फेवरेट कोण” या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे. मराठी तारकांना पोहोचवणाऱ्या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष! पण गेल्या दोन वर्षांपासून पसंतीस मान देऊन “महाराष्ट्राचा फेवरेट कोण” या सोहळ्याने आपले स्थान रसिकांच्या मनात पक्के केले आहे. “महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०११” ची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत.

 

यामध्ये फेवरेट नायक, फेवरेट नायिका, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट चित्रपट, फेवरेट विनोदी अभिनेता, सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री आणि पुरुष), फेवरेट विनोदी चित्रपट, फेवरेट गायक-गायिका, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत या सर्वांच्या बरोबरीनेच फेवरेट पॉप्युलर फेस आणि फेवरेट स्टाईल आयकॉन अशी नामांकने देखील यंदाच्या ‘फेवरेट’ यादीमध्ये सामील आहेत.

यावर्षी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करतील ज्यामध्ये मुख्यतः मी सिंधुताई सपकाळ, मुंबई पुणे मुंबई, बालगंधर्व आणिताऱ्यांचे बेट या चित्रपटांचा समावेश असेल. अभिनेत्रींमध्ये मुक्ता बर्वे (मुंबई पुणे मुंबई), तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ) आणि मधुरा वेलणकर (हापूस) यांच्यामध्ये चुरस असेल. त्याचप्रमाणे अनंत महादेवन (मी सिंधुताई सपकाळ); महेश मांजरेकर (लालबाग परळ); रवी जाधव (बालगंधर्व); किरण यज्ञोपवित (ताऱ्यांचे बेट) आणि संजय जाधव (फक्त लढ म्हणा) असे मातब्बर दिग्दर्शक एकमेकांसमोर फेवरेट दिग्दर्शकाच्या विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेत.

‘फेवरेट स्टाईल आयकॉन’ साठी संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव आणि जितेंद्र जोशी या तिघांना तर ‘फेवरेट पॉप्युलर फेस’ मध्ये तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर आणि उर्मिला कानिटकर या तिघींना नामांकने मिळाली आहेत. कोण होणार महाराष्ट्राचा फेवरेट? याबद्दल रसिकांनाच नव्हे तर लोकप्रियतेच्या स्पर्धेत असलेल्या नामांकित कलावंतांमध्येही उत्सुकता आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अवघी मराठी चित्रपंढरी आतुर झालीय. तुम्ही आपला आवडता चित्रपट किंवा नायक-नायिका यांना झी टॉकीजच्या वेबसाईटवरून आणि एसएमएसद्वारे मत देऊ शकता. तेव्हा सज्ज व्हा महाराष्ट्राच्या आवडत्या पुरस्कार सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’साठी..