• कथा
  • अभिनय
  • दिग्दर्शन
  • संगीत

मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे कथा विषय हाताळण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला जातोय. नेहमीच्या चौकटी बाहेरील हे विषय प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढविणारे ठरतायेत. ही उत्कंठा वाढवण्यास थरारपटा सारखा पर्याय नाही. परंतू मराठीत थरारपटांची संख्या फार कमी आहे. म्हणूनच काय तर, मराठीतील त्याच त्या (विनोदी) विषयांवरचे चित्रपट काढून काढून बरेच दिग्दर्शक आता वेगळ्या विषयांकडे वळण्यास प्रवृत्त झाले आहेत, त्यातलंच एक उदाहरण म्हणजे गिरीश मोहिते.’ही पोरगी कुणाची’ मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर ‘प्रतिबिंब’ या थरारपटाद्वारे त्यांनी कम बॅक केलाय.

‘प्रतिबिंब’ ही कथा आहे जयसिंगराजे आणि गौरी या नवदाम्पत्याची. गौरी गृहप्रवेशावेळीच जयसिंगराजेंच्या घरात मृत वसुमतीचा फोटो बघून हादरून गेलेली असते. वसुमतीचा मृत्यू झाला नसून तीच गौरीच्या रुपात आपल्या आयुष्यात परत आली आहे असा जयसिंगराजेचा ठाम विश्वास असतो. नवऱ्याचे उत्कट प्रेम, कुटुंबियांचा स्नेह याचा आधार असताना गौरीच्या आयुष्यात अचानक चमत्कारिक आणि भयप्रद घटना घडू लागतात. एकामागोमाग एक घडणाऱ्या संशयास्पद मृत्यूंमुळे यामागचे गूढ आणखीनच वाढत जाते. कोण असते या मागे? गौरी या घटनांना कशी सामोरे जाते? जयसिंग राजेच्या वाड्यात घडणाऱ्या भयप्रद घटनांची उकल करण्यात गौरीला यश येते का? हे रेखाटत, खिळवून ठेवणारा थरारपट म्हणजे ‘प्रतिबिंब’.

सुरुवातीला थोडा धीमा वाटणारा चित्रपट मध्यंतरानंतर मात्र वेग घेतो. अनेक प्रसंगांमध्ये असणारा सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. एका घाबरलेल्या नववधूच्या आणि डबल रोलच्या अभिनयात सोनाली कुलकर्णी छाप सोडण्यात यशस्वी ठरते. अंकुश चौधरीने बऱ्याच कालावधीनंतर मस्त भूमिका निभावलीय. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत गणेश यादव नेही आपली छाप सोडलीय. संतोष जुवेकरचा (राकेश देसाई ) रोल तेवढा मात्र तेवढा कळत नाही…त्याला आणखी गूढ बनविण्याचा स्कोप होता असे वाटत रहाते. भारत गणेशपुरेनी हवालदाराच्या भूमिकेतून भन्नाट मनोरंजन केले आहे.

प्रशांत हिरे निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘प्रतिबिंब’ चित्रपटात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, रवींद्र मंकणी, गणेश यादव, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार, शमा निवावे, उज्ज्वला जोग, भारत गणेशपुरे, प्रदीप नवले, अंकिता सकरे या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद अनिरुद्ध पोतदार, अभय देखणे यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण संतोष शिंदे यांनी केले असून कला दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केले आहे. रंगभूषा अमोल दोषी, स्पेशल इफेक्ट जयंत हाडके, पार्श्वसंगीत अविनाश-विश्वजित यांचे आहे.

मानवी नातेसंबंधाची गूढता, त्याचा शोध घेताना वाढत जाणारी गुंतागुंत आणि व्यक्तिरेखांचा एकमेकांशी असणारा भावबंध यांचा अनोखा मेळ ‘प्रतिबिंब’ चित्रपट पाहताना प्रेक्षकांना येईल. रहस्यप्रधान कथेला अधिक गडद करणारे या चित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. ‘यमुनाजळी खेळू खेळ’ हे कॉम्बो म्युझिकच्या ठेक्यावर संगीतबद्ध झालेल्या गीतावर सोनाली आणि अंकुशची भन्नाट अदाकारी रसिकांना पाहता येईल.

या सिनेमात कथा आणि गाण्यांची टायमिंग दिग्दर्शकाला जर जमवता आली असती तर सिनेमा आणखीनच प्रभावी बनला असता. पण तरीही एक फुलटू मनोरंजन बघायचा असेल तर मराठीत बऱ्याच दिवसानंतर आलेल्या या थरारपटाला जायला काहीच हरकत नाही.