हल्ली मराठी चित्रपटांना खूपच चांगले दिवस आले आहेत. श्वास पासून सुरू झालेली नव्या दमाच्या, वेगळ्या विषयांच्या चित्रपटांची ही मालिका सध्या नटरंग, हरिश्चंद्राची फॅक्टरी, विहीर, झेंडा, रिंगा रिंगा हे चित्रपट पुढे नेत आहेत. हे सारे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असेच आहे. परंतु मराठी चित्रपटांची सुरूवात किती खडतर परिस्थितीत झाली, याची जाणीव कदाचित आपल्याला नसेल. मराठी चित्रपटांचा इतिहास फारच दैदिप्यमान, रंजक आणि तितकाच ह्रदयद्रावकही आहे. प्रभातने मराठी चित्रपट साम्राज्याचा पाया रचला यात शंकाच नाही.
दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा सर्वात पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित केला. त्यानंतर बाबूराव पेंटर यांनी १९१७ मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनी काढली. त्यात व्ही. शांताराम, केशवराव धायबर, विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल हे चौघेही काम करीत होते. या चौघांनीही १९२९ च्या सुमारास काही कारणामुळे पेंटरांची ही फिल्म कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दामले-फत्तेलाल आणि शांताराम धायबर हे स्वतंत्रपणे फिल्म कंपनी काढण्याच्या विचारात होते. दामल्यांचे कोल्हापूरातील एक सराफ मित्र सीताराम विष्णू कुलकर्णी यांनी अन्य सराफ मित्रांचा विरोध झुगारून दामल्यांना १५ हजार रूपयांचे भांडवल दिले.
इकडे शांताराम-धायबर या जोडीची भांडवलाची व्यवस्था होत नव्हती. त्यांचे मित्र श्रीपतराव काकडे यांनी त्यांना दामले-फत्तेलाल यांच्याच कंपनीत सहभागी होण्याची कल्पना सूचवली. त्यानुसार हे चौघे एकत्र आले. हे चौघे आणि सराफ सीताराम कुलकर्णी असे पाचजण कंपनीचे भागीदार झाले. स्टुडिओसाठी मंगळवार पेठेतील एक दलदलीची जागा महिना ७५ रूपये भाड्याने घेण्याचे ठरले. दामल्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या हस्ते १ जून १९२९ रोजी या जागेत मंगलकलश ठेवण्यात आला.
कामाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली – दिग्दर्शन व संकलन – व्ही. शांताराम, कलादिग्दर्शक – दामले व फत्तेलाल, छायालेखन – एस. फत्तेलाल, रसायनशाळा – केशवराव धायबर आणि व्यवहार – दामले, व्यवस्थापन – बाबूराव पेंढारकर.
या संस्थेला अद्याप नाव नव्हते. एके दिवशी बाबूराव पेंढारकरांनी प्रभात हे नाव सुचवले, ते सर्वांना पसंत पडले. त्यानंतर त्याला साजेसे बोधचिन्हही तयार करण्यात आले. अशा रितीने मराठी रसिकांच्या ह्रदयावर अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली आणि अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांच्या आविष्काराला सुरूवात झाली.
(एक होती प्रभातनगरी – बापू वाटवे)









![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








