१९३० च्या सुमारास बरेचसे स्टंटपट निघत होते कारण हे स्टंटपट आवडीने पाहणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग होता. प्रभातनेही एक स्टंटपट काढायचे ठरवले. परंतु त्या काळच्या चित्रपटांमधील अवास्तव व अशक्यप्राय गोष्टी त्यात नसाव्यात, याची काळजी प्रभातने घेतली.

कथानक

रतनपूर राज्यातील एका गावात डाकू जटाशंकर धाड टाकतो. तो गावातील बलदेव या तरूणाला ठार मारतो आणि त्याची देखणी मुलगी तारिणी हिला पळवून नेतो. राज्यातील नागरिक या कृत्याचा ठपका राजा आणि युवराजाच्या कारभारावर ठेवतात. त्यामुळे युवराज जटाशंकरचा बीमोड करून तारिणीची सुटका करण्याचा निर्धार करतो. युवराज आपल्या मित्रासह वेश पालटून जटाशंकरच्या गुहेचा शोध लावतो. जटाशंकरने हल्ला चढवल्यावर ते एका गुहेचा आश्रय घेतात. तेथे त्यांना तारिणी सापडते. हे तिघे जटाशंकरला चकवून राज्यात परत येतात. युवराज तारिणीला राजवाड्यात आश्रय देतो आणि तिच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त करतो. पण राजाचा त्याला विरोध असल्याने तो युवराजाला कैदेत टाकतो. त्यानंतर जटाशंकर राजवाड्यात शिरकाव करून पुन्हा तारिणीला पळवून नेतो. युवराजाचा मित्र ही बातमी युवराजाला सांगतो आणि युवराजाची कैदेतून मुक्तता करतो. ते दोघे जटाशंकरवर चालून जातात. जटाशंकरचा एक साथीदार युवराजावर कपटाने वार करणार तोच तारिणी त्याला ठार मारते. राजा तिच्या शौर्यावर प्रसन्न होऊन युवराजाशी लग्नाची परवानगी देतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

कलाकार

जटाशंकरची भूमिका पैलवान ज्ञानोबा माने यांनी केली आहे. युवराजाची भूमिका गणपत शिंदे यांनी तर तारिणीची भूमिका साक्रीबाई यांनी केली आहे. युवराज व तारिणी वाळवंटातून जात असताना जटाशंकर त्यांचा पाठलाग करीत असतो, असे एक दृश्य होते. जत संस्थानातील वाळूमय भागात चित्रीकरण चालू होते. हे दृश्य अगदी खरेखुरे वाटावे म्हणून नायक व नायिका अनवाणी पायांनी या वाळूतून पळत होते. हे दृश्य चित्रित करताना उन्हाने त्यांचे पाय पोळून निघाले परंतु त्यांनी त्याबाबत तक्रार केली नाही.

घोडदळ आणि उंट

सांगलीतील जत तालुका हे त्यावेळी जत संस्थान होते. तेथील राजेसाहेबांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घोडदळ व उंटांचा तांडा दिला होता. चित्रपटातील बहुतांश चित्रीकरण जत येथे केले होते. त्यावेळी अगदी कुटूंबासारखे वातावरण होते. मालक, कलाकार, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी हे सगळे एकत्र जेवायचे. एक्स्ट्रातल्या स्त्रियाच हा स्वयंपाक करायच्या.

सेन्सॉर

जटाशंकर तलवारीने तारिणीचे पातळ उभे फाडतो. त्यामुळे तारिणीचा पाय उघडा पडतो, असे एक दृश्य या चित्रपटात होते. या दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेतला. त्यातून स्त्री देहाचे प्रदर्शन होते, असे मत सेन्सॉरने नोंदवले होते. परंतु त्यावेळी चुंबनासारख्या दृश्यांना सेन्सॉरचा आक्षेप नव्हता ही बाब आश्चर्यकारक होती.

२९ मार्च १९३० रोजी हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. त्यालाही गोपालकृष्ण या पहिल्या चित्रपटासारखाच चांगला प्रतिसाद मिळाला.