प्रभातचा पहिला चित्रपट कोणत्या विषयावर असावा, याबाबत बरीच चर्चा झाली. स्वदेशातील संस्कृती आणि इतिहास परकीयांसह सर्वांना कळावा, अशी भावना सुरूवातीच्या काळात होती. त्यानुसार श्रीकृष्णांच्या बाललीलांवर आधारीत गोपालकृष्ण हा चित्रपट करण्याचे ठरले. त्या काळातील अन्यायी, अत्याचारी ब्रिटिश साम्राज्याला कंसाचे तर श्रीकृष्णाला लोकप्रतिनिधीचे रूपक देण्यात आले होते. महाराष्ट्र फिल्म कंपनीने याआधी केलेल्या सैरंध्री या चित्रपटाला सेन्सॉरचा त्रास झालेला होता त्यामुळे असा त्रास आपल्याला होऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली होती.
कथानक
चित्रपट गोकूळावर आधारीत होता. गोकूळच्या भूमीत सर्व गोप-गोपी सुखाने नांदत आहेत. परंतु अचानक इंद्राच्या कोपामुळे गोकूळात प्रलय येतो. गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्ण त्या संकटातून गोकूळवासियांना वाचवतो असे कथानक होते. करंगळीवर गोवर्धन उचलून श्रीकृष्ण गोकूळवासियांना वाचवतो हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता.
शांतारामबापूंची कल्पकता
एकदा बाह्यचित्रीकरण उरकून परतताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि वाटेतल्या ओढ्याला पूर आला. त्यावेळी इंद्राने पर्जन्यास्त्र सोडून गोकूळात पाणीच पाणी करून टाकतो आणि त्या प्रवाहात गोकूळवासी वाहून जात आहेत, या चित्रपटातील दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी या परिस्थितीचा वापर करण्याची कल्पना सुचली. गोकूळवासीयाची वेशभूषा केलेल्या एकेका व्यक्तीला शांतारामबापू ओढ्यात सोडत होते आणि पाण्यात वाहत जाणाऱ्या गोकूळवासीयांचे चित्रीकरण होत होते. ओढ्याच्या खालच्या बाजूला कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर दामले व धायबर एकेका गोकूळवासीयाला हात देऊन प्रवाहातून बाहेर काढत होते. जोखीम पत्करून केलेले हे दृश्य चित्तथरारक झाले होते. गोधनाची उपयुक्तता आणि धष्टपुष्टता दाखवण्यासाठी बैलांच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती यांचा समावेश करण्यात आला होता.
कलाकार
कोल्हापूरनजीकच्या सांगोला या खेड्यातील शहाबुद्दीन मणेर उर्फ सुरेशबाबू या मुलाला श्रीकृष्णाची भूमिका दिली होती. त्याला प्रभातच्या स्थिरचित्रण विभागामध्ये कायम नोकरी देण्यात आली. पुढे तो कसबी चित्रकार झाला. पंचाहत्तरी उलटल्यानंतरही तो हेच काम करत असे.
कोल्हापूरचे गाजलेले पैलवान ज्ञानोबा माने यांनी या चित्रपटात कंसाची भूमिका केली. प्रभातमध्ये ते नट म्हणून काम करीत होते. महाराष्ट्र फिल्म कंपनीची नायिका गुलाबबाई हीने यशोदेची भूमिका केली होती.
नायिकेची कहाणी
राधेच्या भूमिकेसाठी तमाशाच्या फडातली, नाकीडोळी सुंदर अशी एक मुलगी मिळाली. परंतु चित्रपटाच्या तालमी सुरू असताना ती कुणाच्या तरी सोबत पळून गेली. त्यानंतर विजया नावाची आणखी एक चांगली मुलगी मिळाली. ती मोलकरणीचे काम करून दरमहा पाच रूपये मिळवत होती. ती एका ड्रायव्हरच्या आश्रयास राहात होती. तिला दरमहा दहा रूपये मिळणार असल्याने ड्रायव्हरने तिला लगेच परवानगी दिली. विजया ही मुलगी वेशभूषा केल्यानंतर आकर्षक दिसू लागली. ते पाहून ड्रायव्हरला हाव सुटली. त्याने तिचा पगार वाढवून देण्याचा तगादा लावला.
बाबूरावांची शक्कल
ड्रायव्हरला वठणीवर आणण्यासाठी बाबूराव पेंढारकरांनी एक शक्कल लढवली. बाबूराव चार तगडे जवान आणि पोलिसांच्या वेशातले दोन-चार तरूण सोबत घेऊन त्या ड्रायव्हरकडे गेले. कराराप्रमाणे बाईला कामावर पाठवले नाहीस तर तू अडचणीत येशील, असा सज्जड दम त्याला दिला. पोलिस बघून ड्रायव्हर घाबरला आणि शक्कल उपयुक्त ठरली. पण पुन्हा असली झंझट नसो म्हणून बाबूरावांनी या नायिकेची स्टुडिओतच सोय केली.
फेमस पिक्चर्स महाराष्ट्र फिल्मस कंपनीचे वितरक म्हणून काम पाहत होते. त्या कंपनीचे भागीदार बाबूराव पै आणि दादासाहेब तोरणे यांचा प्रभातच्या टीमशी चांगला परिचय होता. त्यामुळे प्रभातने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. १४ डिसेंबर १९२९ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमागृहात गोपालकृष्ण प्रदर्शित झाला. प्रभातच्या टीमची कल्पनाशक्ती, कला आणि भव्यदिव्य सेटस यामुळे या चित्रपटाला लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.









![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








