• कथा
  • अभिनय
  • दिग्दर्शन
  • संगीत

जसं शहर झपाट्याने वाढत तशी शहरांची संस्कृतीही बदलते. गजबजलेल्या चाळींची जागा उंच-उंच इमारती घेतात, पण चाळीत दिसणारा अस्सल बेरकीपणा, भोचक नजरा, खट्याळ पण मदतीला धावून येणारा शेजार हा फ्लेट संस्कृतीत अभावानेच दिसतो. मराठी मनांना जवळीक वाटणाऱ्या या चाळ संस्कृतीवर या पूर्वी अनेक नाटक, चित्रपट येऊन गेले आहेत. त्यात एक भर पडली ती नुकत्याच रिलीज झालेल्या ‘वन रूम किचन’ची.

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रवी (भरत जाधव) आणि सुमन (भार्गवी चिरमुले) या मध्यमवर्गीय जोडप्याच्या आयुष्यात घडणारी ही गोष्ट. एका कंपनीत प्रामाणिकपणे काम करणारा रवी आणि त्याला तितक्याच नेटाने साथ देणारी त्याची पत्नी सुमन. सचिन आणि सायली ही त्यांची दोन मुले, असं हे चौकोनी, सुखी कुटुंब रहात असतं पुण्यातल्या एका जुन्या चाळीत.

पण आपल्या वर्ग मैत्रिणीचा नेहाचा (किशोरी गोडबोले) आलिशान आणि प्रशस्त फ्लॅट बघून सुमनला नकळत १० बाय १० च्या चाळीतल्या खोल्या अपुऱ्या वाटायला लागतात आणि आपल्या ‘हक्काचा’ एक फ्लॅट असावा ही तीव्र इच्छा तिला स्वस्थ बसू देत नाही. ती अशा फ्लॅटसाठी रवीकडे रोज तगादा लावते. आपल्या पत्नीवर अपार प्रेम करण्या रविला तिचा हट्ट मोडवत नाही…शेवटी दोघेही त्यांच्या आवाक्यात असणारा एक वन रूम किचनचा फ्लॅट घ्यायचं ठरवतात. पण या सगळ्या काळात सुमन हळूहळू आपल्या भोचक शेजाऱ्यांशी थोडं अंतर ठेऊन वागू लागते, चाळीतल्या लोकांच्या वागण्याचा तिला त्रास वाटायला लागतो.

नवीन घर घेण्यासाठी त्या दोघांनी संसारात केलेली काटकसर, नोकरी गमावूनही खचून न जाता रवीने केलेला खडतर प्रवास आणि या सगळ्यात त्या चौघांचं एकमेकांवर असलेलं अपार प्रेम यामुळे चित्रपट मनाला भावतो.

त्यानंतर नेहाच्या आयुष्यात अकस्मात घडणाऱ्या काही घटनांनी मात्र सुमनला या चाळीतल्या लोकांमधला अपार शेजारधर्म, दुसऱ्याला मदत करण्याची तत्पर वृत्ती जाणवते आणि सुखाचा खरा अर्थ कळतो. आपण धावतो ते सुखाचं मृगजळ आहे आणि आपलं खरं सुख हे या चाळीतल्या या घरात आहे हे तिला जाणवतं.

अनेक छोट्या छोट्या प्रसंगांमधून दिग्दर्शकाने चाळीतला इरसालपणा, एकमेकांवर कुरघोडी करणारी पण तितकंच एकमेकांवर प्रेम करणारी चाळीतली सगळीच कुटुंबं सुंदर रितीने दाखवली आहेत.

विजय चव्हाण, किशोरी अम्बिये, स्मिता शेवाल, आशालता, विजू खोटे असे अनेक आघाडीच्या कलाकारांनी भूमिका अर्थातच उत्तम केल्या आहेत. हिंदी अभिनेत्री हेलन यांचा चित्रपटात एका पारसी महिलेचा छोटासा रोल आहे.
कथानकाला साजेशी अशी तीनच गाणी चित्रपटात आहेत, पण अशोक पत्कींचं संगीत आणि बेला शेंडे, शंकर महादेवन यांच्या आवाजातली ही गाणी कथेला पूरक आहेत.

भरत जाधवने कॉमेडीच्या साच्यातून बाहेर पडून गंभीर भूमिका करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. भार्गवीचा अभिनयही एका निम्न-मध्यमवर्गीय स्त्री न्याय देणारा आहे.

दिग्दर्शक महेश टिकेकर यांनी चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचा स्वतःचं घर मिळवण्यासाठीचा संघर्ष अत्यंत साधेपणाने हाताळला आहे. तो अधिक खुलवता आला असता असं वाटत राहतं. चित्रपटाच्या शेवटी अनेक मुख्य गोष्टी अनुत्तरीत राहतात.

आपल्या जीवाभावाचा विषय, सुटसुटीत मांडणी आणि उत्तम अभिनय या सगळ्यांमुळे हा चित्रपट कुटुंबासह बघायला हरकत नाही.