नवीन वर्षाच्या सुरवातीलाच ‘मेनका‘च्या वाचकांच्या भेटीला आली आहे, दिलखुलास पल्लवी सुभाष. अनेकांना माहिती नसेल पण ‘ई टीव्ही मराठी‘वरच्या ‘एक होता राजा‘ या मालिकेतून ‘मराठी इंडस्ट्री‘ला ही गोड चेहर्याची हुशार अभिनेत्री मिळाली.
पुढे हाच चेहरा विविध हिंदी मालिका आणि जाहिरातींतूनही झळकला. पण पल्लवी खरी घराघरात पोचली, ती ‘गुंतता हृदय हे‘ या मालिकेतल्या ‘अनन्या‘च्या भूमिकेमुळे. पण इतके दिवस ती मराठी मालिका-चित्रपटांमधून गायब का होती, नव्या वर्षात तिनं काय प्लॅन्स आखलेत, आतापर्यंतचा तिचा अभिनयाचा प्रवास कसा होता आणि हो, तिचा खास मित्र अनिकेतविषयी तिला काय वाटतं, या सगळ्याविषयी पल्लवीने‘मेनका‘शी दिलखुलास गप्पा मारल्या.
हॅपी न्यू इयर!
सगळ्यात आधी ‘मेनका‘च्या सर्व वाचकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! आता नवीन वर्ष म्हटलं, की तुम्हाला लगेच माझे नवीन वर्षात काय प्लॅन आहेत, हे विचारायचं असेलच! तसे मी प्लॅन तर खूप करते, पण नवीन वर्षासाठी केलेले संकल्प प्रत्यक्षात अमलात आणणं काही मला जमतंच असं नाही. म्हणजे बरेचदा जमत नाहीच. पण असो, जसं आयुष्य येईल, तसं ते छानसं एन्जॉय करत जगायचं हा माझा आपला आयुष्याचा फंडा आहे. वाचकांनाही मी हेच सांगेन, नवीन वर्षात, निगेटिव्ह विचारांना मनामध्ये अजिबात थारा देऊ नका. सतत पॉझिटिव्ह विचार करा. मग बघा, यश तुमच्याकडे कसं धावत येतं ते! सो, नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! आणि आता थोडं माझ्याविषयी…
मी महाबळेश्वरची…
”मी मूळची महाबळेश्वरची.” पुढे शिकायला मुंबईत गेले आणि पाटकर कॉलेजला प्रवेश घेतला” असं म्हणत पल्लवीने तिच्या ‘महाबळेश्वर ते मुंबई‘ प्रवासाचं इनशॉर्ट वर्णन सांगितलं. मराठी बोलतानाच मध्येच इंग्लिश शब्द फाडण्यात पल्लवी वस्ताद आहे. मुंबईत राहिल्याचा हा परिणाम आहे, असं आपल्याला वाटतं पण पल्लवी सध्या मुंबईत जरी राहत असली तरी आजही तिनं महाबळेश्वरशी जिव्हाळ्याचं नातं टिकवून ठेवलंय. अर्थात महाबळेश्वर हे आपल्यापैकी अनेकांचं आवडतं डेस्टिनेशन आहेच. पल्लवीचं तर ते मूळ गाव. त्यामुळं महाबळेश्वरचं नाव घेतलं की पल्लवी आणखीनच खुलते.
‘जास्त करून मुंबईत एकटी असले की मला महाबळेश्वरची खूप आठवण येते. त्यामुळे शूटिंगमधून वेळ मिळाला की मी पहिलं महाबळेश्वर गाठते. महाबळेश्वरमध्ये फिरायला मला जाम आवडतं. मध्यंतरी हिंदी मालिकांमध्ये जास्त बिझी असल्यानं महाबळेश्वरला जास्त जाणं व्हायचं नाही, पण आता मात्र संधी मिळाली की अजिबात सोडत नाही‘, असं हसतहसत सांगणारी पल्लवी पाच मिनिटांत अख्ख्या महाबळेश्वरचाच जणू फेरफटका घडवते. माझ्या पहिल्या मालिकेविषयी…
‘एक होता राजा‘ ही ‘ई टीव्ही‘वरची मालिका माझ्यासाठी खूपच लकी ठरली. कारण या मालिकेनं माझ्यासाठी सिनेसृष्टीच्या या अनोख्या विश्वाची दारं खुली केली. कॅमेर्यासमोरचा पहिलाच अनुभव, पहिलीच मालिका,जोडीला श्रेयस तळपदे, गिरीश ओक यांच्यासारखे कसदार कलाकार असल्यानं या मालिकेतून मला खूप काही शिकायला मिळालं. श्रेयसने त्याआधी नाटक, मालिका केल्या असल्यानं त्याच्यासाठी ते फारसं नवीन नव्हतं.
पण इंडस्ट्रीत एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी तोही धडपडत होता. त्यामुळं आमच्या दोघांच्याही दृष्टीनं ‘एक होता राजा‘ महत्त्वाची मालिका होती. विशाल अहिरे, मंदार देवस्थळी यांच्याबरोबर काम करताना मला बरंच काही नवीन शिकायला मिळालं. तर गिरीश ओकांसारखे अनुभवी कलाकार समोर असल्याने त्यांचा अभिनय समोरासमोर अनुभवण्याची संधी मला मिळाली. एकूणच या मालिकेचा अनुभव माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरला.
अशी झाली अनिकेतशी ओळख!
‘एक होता राजा‘ याच मालिकेत माझा बॉयफ्रेंड अनिकेत अर्थात, अनिकेत विश्वासराव आणि माझी ओळख झाली. अनिकेतही या मालिकेत एका मस्त रोमँटिक रोलमध्ये होता. सुरवातीला आम्ही फारसे बोलत नसू. पण हळूहळू मैत्री वाढत गेली. आमचे स्वभाव जुळत गेले, आवडी-निवडी खूप सार्या एकच नसल्या तरी एकमेकांविषयी आवडी-निवडी जाणून घेण्याची उत्सुकता वाढू लागली.
मग काय, ‘एक होता राजा‘ संपली तरी आमचं एकमेकांशी बोलणं सुरूच राहिलं. मी नवीन काय करते किंवा तो नवीन काय करतोय हे आम्ही एकमेकांशी शेअर करायला लागलो. ‘नायक‘, ‘ऊनपाऊस‘ या मालिकेतल्या त्याच्या भूमिका मला खूप आवडू लागल्या आणि आमची मैत्री वाढत वाढत अगदी घट्ट मैत्रीत बदलली!
अस्सा आहे अनिकेत...
काय सांगू अनिकतबद्दल…त्याच्या चेहर्याकडे बघाल तर तो एकदम असा चिडखोर किंवा पटकन रिऍक्ट होणारा वाटतो, हो ना? पण तसं नाहीये, अनिकेत स्वभावानं खूप शांत आहे. मला तो खूप समजून घेतो. महत्त्वाचं म्हणजे तो माझ्यावर कधीही फारसा चिडत नाही. हायपर होत नाही. एक मित्र म्हणून तो मला नेहमीच समजून घेतो. शिवाय आम्ही एकमेकांच्या करिअरविषयीही आम्ही खूप आदरानं बोलतो. आणि हो, एक सांगू का,तशी ही अंदर की बात है पण सांगतेच. आमच्यात भांडणं होतातच, पण भांडणं झाली की आधी अनिकेतच ‘सॉरी‘ म्हणतो. तसा माझ्याशी तो कधीकधी जरा जास्तच भांडतो, ते मला नाही आवडत पण असो. पोरगा चांगला आहे! आम्ही दोघंही हल्ली शूटिंगमध्ये व्यग्र असतो. भेटायला वेळ तसा कमी मिळतो, पण जो वेळ मिळतो तो आम्ही एकमेकांसाठी नीट राखून ठेवतो. ‘क्वालिटी टाईम‘ म्हणा ना!
केदार शिंदेंची मी आभारी आहे...
‘तू तू मैं मैं‘ या केदार शिंदे यांच्या पहिल्या नाटकात मला रंगभूमीवर काम करायची पहिली संधी मिळाली. त्याआधी व्यावसायिक नाटकात मी काम केलेलं नव्हतं, त्यामुळं पहिलं नाटक तेही केदार शिंदेंचं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची घटना होती. नाटकात काम करायचं हे मनात होतंच. पण पहिलंच नाटक असल्याने ‘नर्व्हसनेस‘ही होताच. पण या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास यायला लागला. पहिल्या प्रयोगाचं टेन्शन होतंच पण जसे प्रयोग वाढत गेले तसं मी हे नाटक एन्जॉय करू लागले. खरंच मजा आली ‘तू तू मैं मैं‘ करताना! एका नवख्या कलाकारावर विश्वास ठेवून त्याच्याकडून उत्तम काम करून घेण्याची केदार शिंदेंची हातोटी अफाट आहे. आता मध्यंतरी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो होतो. त्यांच्या ‘मधू इथे अन् चंद्र तिथे‘ या मालिकेसाठी आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर त्यांचा तोच उत्साह आणि तीच कामाची हातोटी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
गुंतता हृदय हे…
सुरुवातीला मराठी मालिका केल्यानंतर मी मराठी मालिकांपासून जरा दूर गेले होते. मी अशी अचानक गायब झाले, त्यामुळे माझ्याविषयीची बरीचशी चर्चाही माझ्या कानावर यायची. मात्र, माझं हिंदी मालिकांमध्ये काम सुरू होतं. असो. तर दरम्यानच्या काळात सतीश राजवाडे यांनी मला ‘गुंतता हृदय हे‘ या मालिकेसाठी विचारलं. ‘गुंतता‘मधील अनन्याचा रोल मला चॅलेंजिंग वाटला. मीही हिंदीच्या सेटवर मराठीला ‘मिस‘ करतच होते आणि सतीश राजवाडे यांची मालिका म्हणजे काहीतरी वेगळा लुक असणार याची मला खात्री होती. झालंही तसंच! ‘गुंतता हृदय हे‘मुळे मी पुन्हा एकदा घराघरांत पोचले. त्याहीपेक्षा आपल्या मराठीविश्वात पोचले याचा मला आनंद आहे. यात सागर तळाशीकर, संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी अशा आम्हा सगळ्यांचंच ट्युनिंग मस्त जमून आलं होतं. या मालिकेमुळे ‘फेसबुक‘वरही मला अनेक चाहते मिळाले आणि तसंच माझे जुने मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा संपर्कात आले. त्यामुळे थँक्स टू सतीश, त्याने या मालिकेत मला संधी दिली त्याबद्दल!
हिंदी मालिकांच्या विश्वात...
‘करम अपना अपना‘, ‘गोदभराई‘, ‘तुम्हारी दिशा‘ या हिंदी मालिकांमध्ये काम करायची मला संधी मिळाली. कुठल्याही मराठी कलाकाराला हिंदीत काम करायचं स्वप्न हे असतंच. माझंही स्वप्न होतं. त्यादृष्टीनं मी प्रयत्न करतच होते. योगायोगाने मला एकापाठोपाठ हिंदी मालिकाही मिळत गेल्या. पण पुढे या ‘डेलीसोप‘चा मला कंटाळा येऊ लागला. मराठी काय हिंदी काय, सेटवर वातावरण तसं सारखंच असतं. पण आपल्या मराठी सेटवरचं वातावरण मी खरंच ‘मिस‘ करत होते. तशा भविष्यात मला हिंदी मालिका करायच्या आहेतच पण ‘डेली सोप‘चा मला आता कंटाळा आलाय. पाहूया, नवीन काही वेगळा रोल करायला मिळाला तर बघूया! सध्या मात्र मी मराठी सेटवरची ‘कॉमेडी एक्स्प्रेस‘ एन्जॉय करतेय.
‘कॉमेडी एक्स्प्रेस‘ची धमाल..
‘ई टीव्ही‘वरच्या ‘कॉमेडी एक्स्प्रेस‘ची मजा काही औरच आहे. ‘कॉमेडी एक्स्प्रेस‘चं सध्या मी अँकरिंग करतेय. जबरदस्त पोट धरून हसायला लावणारा हा शो आहे. प्रेक्षक तर ही धमाल कित्येक दिवस एन्जॉय करतच आहेत. पण आम्ही कलाकारही सेटवरची धमाल अगदी मनापासून एंजॉय करतो. एरवी मालिकांच्या सेटवर काही वेळा बोअर होतं, ‘कॉमेडी‘च्या या सेटवर मात्र तुम्हाला एकहीजण बोअर होताना दिसणार नाही. याचं श्रेय म्हणाल तर दिग्दर्शक ज्ञानेश भालेकरला आणि अर्थातच सगळ्या टीमला! मी यात नवीन आहे, मात्र या संपूर्ण टीमचं एकमेकांशी एवढं घट्ट टायमिंग जुळलंय की बस्स! हिंदीच्या सेटवर रडणारे शॉट ‘ओके‘ करताना खरंच अक्षरशः रडायची वेळ यायची. इथे मात्र काम करताना इतकं पोट धरून हसू येतं की अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं.
जाहिरातीचं विश्वचं अफाट…
मालिका, नाटकांमध्ये काम करता करता मला अचानक जाहिरातींच्या ऑफरही येऊ लागल्या. कॅडबरी, पीएनजी, विक्रम चहा (‘गुंतता हृदय हे‘ मधल्या विक्रमशी या चहाचा काही संबंध नाही बरं!) अशा काही जाहिरातींची ऑफर आली. जाहिरातींचं विश्वच खूप वेगळं आहे. अवघ्या काही सेकंदात खूप काही प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं असतं. पण जाहिरातीचं स्क्रीप्ट, हावभाव या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करावा लागतो. जाहिरात क्षेत्रातले लोक खरंच खूप अभ्यासू असतात आणि ते तसेच असावेही लागतात, याचा मला यानिमित्तानं अनुभव आला!
शूटिंग नसतं तेव्हा?
शूटिंग नसलं की मी जिमला जाणं पसंत करते. बाकी मग थिएटरला जाऊन मस्त सिनेमा पाहण्याचा प्रोग्रॅम आम्ही मैत्रिणी आखतो. मला मैत्रिणीही खूप छान मिळाल्या आहेत. आमच्यापैकी कुणीही कॉल करो, केवळ एका फोनवर आम्ही एकत्र जमतो. मजा येते सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या की! कुणा एखाद्या मैत्रिणीचं लग्न असेल तर मग तर विचारूच नका. आम्ही अक्षरशः धमाल करतो. बाकी घरी असले की आईशी भरपूर गप्पा मारते. माझी आई माझी एकदम खास मैत्रीण, मार्गदर्शक सगळं काही आहे. माझ्या करिअरला आईचा नेहमीच खूप सपोर्ट मिळालाय. करिअरमागे धावताना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपण गमावून बसतो. आई हा आनंद माझ्यासाठी कायम घेऊन येते. खूप काळजी घेते माझी! आईचा हा सपोर्ट आहे म्हणूनच तर मी या क्षेत्रात करिअर करू शकलेय!
पल्लवी सुभाष हे नाव कसं आलं?
माझं नाव पल्लवी शिर्के. पण पल्लवी सुभाष या नावाची खरी कल्पना होती दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची! पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करत असताना त्यांनी या नावाची कल्पना मांडली. तू एक कलाकार आहेस आणि तुला हे नाव फिट ठरेल, असं त्यांचं म्हणणं. मलाही हे जरा हटके नाव वाटलं, म्हणून पुरुषोत्तम बेर्डे यांच्या त्या प्रोजेक्टनंतर मी पल्लवी सुभाष नावानंच ओळखले जाऊ लागले.
सो, मित्र-मैत्रिणींनो, ‘गुंतता हृदय हे‘ आणि ‘कॉमेडी एक्स्प्रेस‘च्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या मराठी मालिकांच्या विश्वात आलीय. सो, तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर कायम असू द्या! पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप सार्या शुभेच्छा… मस्त रहा, मजेत रहा!
['मेनका' जानेवारी 2012 मधून साभार]






![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








