‘देऊळ’च्या यशानंतर गिरीश आणि उमेश कुलकर्णी आता ‘मसाला’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक कुलकर्णी हे नाव या चमूत दाखल झाले आहे ते म्हणजे संदेश कुलकर्णी. ‘मसाला’ या चित्रपटाद्वारे संदेश मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतोय. एप्रिल मध्ये येऊ घातलेला हा चित्रपट महाराष्ट्रात घराघरात पोहोचावा म्हणून टीम मसाला सध्या एका अभिनव टूरवर आहे. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटातले काही सीन्स शूट करत आणि त्याचबरोबर तिथल्या लोकांशी संवाद साधत ही ‘मसाला’ टीमची बस परवा पुण्यात दाखल झाली. त्या निमित्ताने दिग्दर्शक संदेश कुलकर्णींशी मारलेल्या गप्पा -
अनेक नाटकांचं तू यशस्वी दिग्दर्शन केलं आहेस. तेव्हा चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करायला उशीर झाला असं वाटतं का?
उशीर असं नक्की म्हणता येणार नाही. कारण मी इंजिनीअरींग फील्ड मधून आलो आहे आणि आवड म्हणून नाट्य दिग्दर्शन करत होतो. त्यामुळे चित्रपट काढावा असं डोक्यात होतं पण तसा योग जुळून येत नव्हता एवढं मात्र खरं. माझ्या मित्रांमुळेच मला ही संधी मिळाली आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी ते आव्हान पेलू शकतोय.
‘मसाला’ या चित्रपटापासून सुरवात करावीशी का वाटली?
खरं म्हणजे मसालाची कथा लिहीत असताना मी गिरीशसोबतच होतो आणि मला कथा खूप आवडली होती. या पूर्ण प्रक्रियेत माझा सहभाग असल्याने जेव्हा त्याने ‘दिग्दर्शन करशील का?’ असं विचारलं तेव्हा मी पटकन हो म्हणालो.
‘मसाला’ या चित्रपटाची खासियत काय आहे?
‘मसाला’ हा एका दाम्पत्याचा प्रवास आहे. यशस्वी होण्याच्या त्यांच्या प्रवासात त्यांना जी अनेक माणसं भेटतात त्यांच्याकडून मिळालेले अनूभव, मूल्यं हे घेऊन ही दोघं पुढं जातात. ह्या चांगल्या वाईट अनूभवांतून शिकून पुढे जात असतांना दोघांनी एकमेकांना दिलेली साथ आणि त्या विश्वासातून मिळालेलं यश प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. नव्वद टक्के सामान्य माणसांचा आजच्या व्यवस्थेवरचा आणि समाज मूल्यांवरचा विश्वास कुठेतरी हरवताना दिसतोय त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी नक्कीच आश्वासक असेल. आमची टॅग-लाईनच आहे तशी – ‘आनंदासाठी नव्हे आनंदाने’. चित्रपट नर्म विनोदी आणि उत्साह देणारा आहे, त्यामुळे बाहेर पडताना प्रेक्षक नक्कीच रिफ्रेश होतील.
‘मसाला’ या नावाबद्दल काय सांगशील?
मसाला हे फक्त पदार्थाचं नाव असं म्हणून आम्ही वापरलं नाही. तर अनेक चवींचं मिश्रण करून आपण मसाला बनवतो तो पदार्थाची लज्जत आणि चव वाढवण्यासाठी. त्याचप्रमाणे हा आयुष्य म्हणजे आंबट, गोड, खारट, तूरट अशा अनुभवांचा मसाला, असा विचार डोक्यात ठेऊन आम्ही हे ‘मसाला’ हे नाव चित्रपटाला दिलंय.
‘मसाला’ नंतर पुढे काय प्लॅन्स आहेत?
सध्या तरी मी ‘मसाला’च्या कामातच पूर्णपणे बिझी आहे. बऱ्याच नवीन गोष्टी करायच्या आहेत पण ताबडतोब मात्र काहीच प्लान्स नाहीत…




![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)









Comments are closed.