आक्रोश, विजेता, अर्धसत्य, आघात यांसारख्या एकापेक्षा एक सरस कलाकृती आणणारे गोविंद निहलानी यांचा पुढचा चित्रपट असणार आहे मराठी. विजय तेंडूलकर आणि सत्यदेव दुबे यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे असं सांगणाऱ्या निहलानींचा मराठी चित्रपट तेंडूलकरांच्याच नाटकावर बेतलेला आहे. शहरी भागांतल्या सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या या सामाजिक चित्रपटाचे नाव मात्र अजून ठरले नाही. 2004 मध्ये आलेला अमिताभ बच्चन आणि ओम पुरी यांच्या अभिनयाने सजलेला देव हा गोविंद निहलानींचा शेवटचा चित्रपट. सध्या निहलानी कमलू हॅप्पी हॅप्पी नावाचा एक अॅनिमेशनपट करण्यात गुंतले आहेत. त्या चित्रपटानंतर लगेच त्यांच्या मराठी चित्रपटाचे काम सुरू होईल. हा चित्रपटाची कथा कोणत्या नाटकावर बेतली आहे आणि यातली स्टारकास्ट कोण असेल याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे. पण या निमित्ताने मराठी रसिकांना एक दमदार चित्रपट पहायला मिळणार हे नक्की.