‘म्हैस’ कथेच्या चित्रपट हक्कांचा वाद मागे टाकत, पुलंच्या लेखनावर आधारीत गोळाबेरीज उद्या अखेर चित्रपटगृहात दाखल होत आहे. ‘म्हैस’चे हक्क आपल्याकडे असल्यामुळे या चित्रपटामध्ये असलेले या कथेचे संदर्भ वगळावेत अशी मागणी शेखर नाईकांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. पण गोळाबेरीजच्या निर्मात्यांनी स्वतःच हे संदर्भ वगळून चित्रपट उद्या प्रदर्शित करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे पुलंच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार.

पु. ल. देशपांडे यांनी आपल्या व्यक्तिचित्रांवर अफाट प्रेम केले आणि त्यांना पुस्तकात बंदिस्त करुन न ठेवता एकपात्री प्रयोग, कथाकथन यांच्या रुपाने पुस्तकाबाहेर काढले व देश-विदेशात फिरवले. पुलंचे व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचताना या व्यक्तिरेखांबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, प्रेम, कौतुक जाणवतेच त्यांनी रेखाटलेली प्रत्येक व्यक्ती विनोदाच्या वस्त्रप्रावरणात लपेटण्याच्या प्रयत्नात हळूच नकळत त्यांच्या मनातला सल, दु:ख उघड करण्याची हातोटी पुलंना नेमकी जमली होती. जीवनात सुखाबरोबर दु:खाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्व रेखाटणा-या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा ‘डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्‌स प्रा. लि.’ संस्थेच्या ’गोळाबेरीज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित, क्षितीज झारापकर दिग्दर्शित ’गोळाबेरीज’ चित्रपटात सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. दिलीप प्रभावळकर (अंतू बर्वा), डॉ. मोहन आगाशे (चितळे मास्तर), सतीश शहा (पेस्तनकाका), प्रशांत दामले (कुलकर्णी), संजय नार्वेकर (बबडु), सुबोध भावे (नंदा प्रधान), अविनाश नारकर (हरी तात्या), मुक्ता बर्वे (नंदिनी), भार्गवी चिरमुले (इंदू वेलणकर), प्रसाद ओक (सोन्या बागलनकर), आनंद इंगळे (नारायण), पुष्कर श्रोत्री (अंत्या कुलकर्णी), शरद पोंक्षे (नामू परीट), विजय कदम (उस्मान), जयवंत वाडकर (धर्मा), दिगंबर नाईक (भागू नाना), सतीश पुळेकर (स्टेशन मास्तर), हेमांगी कवी (सुबक ठेंगणी), क्षितीज झारापकर (रावसाहेब),  नंदू चौघुले (हवालदार), दुष्यंत वाघ (सखाराम गटणे), संदीप पाठक (बेमंटया) या कलाकारांसोबत प्रदिप पटवर्धन, मनोज जोशी, कमलाकर सातपुते, विकास पाटील, मनोज ढेकणे, प्रणाली लोंढे यांच्या विविधरंगी भूमिका आहेत. निखिल रत्नपारखी यांनी पुलंची व्यक्तीरेखा साकारली असून मराठीतल्या या नामवंत कलाकारांसोबत पुलंची नात डॉ.नेहा देशपांडे कामत यांनी या चित्रपटात सुनीताबाईंची व्यक्तिरेखा वठवली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिजीत चव्हाण ग.दी.माडगूळकरांच्या व्यक्तिरेखेत दिसणार असून श्रीरंग देशमुख यांनी ख्यातनाम लेखक – दिग्दर्शक राम गबाळे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

‘गोळाबेरीज’ आणखी एक आकर्षण म्हणजे याचे संगीत. पुलंच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटातील त्यांनी संगीतबध्द केलेली ’इथेच टाका तंबू’ आणि ’इंद्रायणी काठी लागली समाधी’ ही दोन गीते रसिक प्रेक्षकांना ’गोळाबेरीज’ या चित्रपटात नव्या वाद्यवृंदात पहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. 1953 साली प्रदर्शित झालेल्या ’गुळाचा गणपती’ चित्रपटातील ’इथेच टाका तंबू’ हे गीत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत झालं होतं, हेच गीत येऊ घातलेल्या ’गोळाबेरीज’ चित्रपटात वसंतराव देशपांडे यांचा आवाज कायम ठेवून आशाताईंच्या जागी मधुरा दातार यांनी गायलं आहे. या गाण्यासाठी पुलंच्या चालीवर आजच्या वाद्यांचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच पं. भीमसेन जोशी यांच्या धीरगंभीर – भारदस्त आवाजातील ’इंद्रायणी काठी लागली समाधी’ हा अभंग पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य जयतीर्थ मेउंदी यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या अभंगासाठी व्हायोलीन, मृदुंग, तबला, पेटी या पारंपरिक वाद्यांचा वापर करुन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे.

पुलंच्या लेखणीतून जिवंत झालेल्या या व्यक्तिरेखा पडदयावर एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी ’गोळाबेरीज’ची पटकथा लिहिली असून छायाकंन विजय देशमुख यांनी केले आहे. स्वप्निल केणी यांनी चित्रपटाच्या कथानकाला अनुरुप कला दिग्दर्शन केले असून गीता गोडबोले यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. संकलन – फैसल महाडिक, नृत्य दिग्दर्शन – दिलीप मेस्त्री, सह निर्माता – मृणाल कपाडीया, कार्यकारी निर्माता – आशिष थरथरे अशी इतर श्रेयनामावली आहे.

आजच्या आयफोन, आयपॅडच्या युगातली टेक्नोसॅव्ही पिढी पुस्तकांच्या दुनियेत फारशी रमताना दिसत नाही, यासाठी नव्या तांत्रिक भाषेत नव्या पिढीशी बोलायला हवं. पुलं स्वत: सांगायचे, ’मला जात्यावरच्या ओव्या आवडतात पण म्हणून त्या गाण्याकरीता कुणी जात ओढत बसावं हे मला पटत नाही.’ आजच्या पिढीला मराठी साहित्य नव्या रुपात उपलब्ध व्हावं या विचारातून आणि पुलंच्या साहित्यातील अजरामर व्यक्तिरेखा चिरंतन काळाकरिता जपता याव्यात या निखळ हेतूने पुलंच्या प्रेमाखातर ’गोळाबेरीज’ हा चित्रपट तयार झाला आहे.

ही ‘गोळाबेरीज’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरावी एवढीच अपेक्षा…