
- पटकथा

- अभिनय

- दिगर्शन

- संगीत

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ‘पु.ल.देशपांडे’ यांच्या आयुष्याचा केलिडिओस्कोप म्हणजेच क्षितिज झारापकर दिग्दर्शित ‘गोळाबेरीज’ होय. आजवरच्या मराठी सिनेमांमध्ये न वापरलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण निवेदनाने (सर्व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत २ अंकी मराठी सिनेमा ‘गोळाबेरीज’) सुरवातीलाच इतर मराठी चित्रपटांपेक्षा हा सिनेमा वेगळा असल्याची जाणीव गोळाबेरीज करून देतो.
चित्रपट सुरु होतो तोच मुळी पु.लंच्या बालपणापासून. सदा इतिहासाचा सार्थ अभिमान असणाऱ्या ‘हरी तात्यांच्या’ (अविनाश नारकर) व्यक्तिमत्त्वाने या बालपणीच्या पुरुषोत्तमाची रसिक प्रेक्षकांना चांगली झलक पहावयास मिळते. पुढे ‘सोन्या, अंत्या’(प्रसाद ओक ,पुष्कर श्रोत्री) तसेच नंदिनी चौबळ (मुक्ता बर्वे) अशा मित्र-मैत्रिणींमुळे प्रेक्षकांना पौगंडावस्थेतील पुर्ष्या (निखिल रत्नपारखी) ही भेटतो. आणि नंतर तारुण्यात भेटलेला ‘नंदा प्रधान’ (सुबोध भावे). त्याच्या एकंदर गूढ वागण्याने स्तब्ध झालेले पु.ल. आणि याच नंदा आणि इंदू वेलणकर (भार्गवी चिरमुले) यांची प्रेम कहाणी उत्सुकतेने ऐकणारे पु.ल.ही आपल्याला दिसतात. तर पुढे पु.लंच्या चित्रपट कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळात त्यांना साथ करणारे ‘राम गबाले’(श्रीरंग देशमुख), ‘ग.दि.माडगुळकर’ (अभिजित चव्हाण) ही मंडळी आपणास पहावयास मिळतात. या सर्व व्यक्तिमत्त्वांची जोडणी करण्यात दिग्दर्शक थोड्या फार प्रमाणात का होईना यशस्वी झाला आहे.
पुढे याच जोडणीत स्वतः बांधत असलेल्या नवीन घराचे अफाट कौतुक असणारा ‘कुलकर्णी’ (प्रशांत दामले), गबालेंचा शर्ट त्यांच्याच समोर घालून येऊन तो अभिमानाने मिरवणारा ‘नाम्या परीट’ (शरद पोंक्षे), १०० % पेस्तनजी (सतीश शहा), बेळगावमध्ये वास्तव्यास असताना दर ३ मिनिटांनी हटकून एक शिवी देणारे ‘रावसाहेब’ (क्षितिज झारापकर) यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींची देखील भर पडते. पु.ल. म्हणले की ओघाने सुनीताबाई आल्याच. इंग्रजीचा तास शिकवताना योगायोगाने मिस. सुनिता ठाकूर (डॉ.नेहा देशपांडे-कामत) यांच्याशी झालेली ओळख नंतर त्यांना सौ. सुनिता पुरुषोत्तम देशपांडे अशी नवीन ओळख देते.
पु.ल.म्हणताच डोळ्यासमोर येते ते ‘व्यक्ती आणि वल्ली’!!!! त्यातील कायम गळक्या पाण्याच्या टाकीची उदाहरणे घालणारे ‘चितळे मास्तर’ (डॉ.मोहन आगाशे), दातांमध्ये छापखान्याचे खिळे बसवलेत की काय अशी शंका येण्यासारखे अतिशय जड मराठी बोलणारा भाबडा ‘सखाराम गटणे’ (दुष्यंत वाघ), “गांधी सर्व देशभर फिरला,पण आमच्या रत्नागिरीत नाही आला” असे सगळ्यांना मोठ्याने सांगणारा कोकणातला ‘अंतू बर्वा’ (दिलीप प्रभावळकर), लहानपणी मारवाड्याचा पोर म्हणून हिणवला जाणारा, पिक-पाकीट च्या लाइनमधे सुरवातीला जम बसवणारा आणि नंतर स्वतः सोवळा राहून हातभट्टीची दारू विकणारा ’बबडू’ (संजय नार्वेकर) आणि एखद्याला जशी दारू चढते त्याप्रमाणे लग्न चढल्यासारखा वागणारा सध्याच्या पिढीतला “इवेन्ट मॅनेजर” ‘नारायण’ (आनंद इंगळे) अश्या शोधूनही कुठे न सापडणाऱ्या ‘वल्ली’ पु.लंमुळे आपल्याला भेटतात.
पु. ल. देशपांडे हे एक असे अवलिया ,बिल्लंदर लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्व आहे की जे सिनेमाच्या माध्यमातून केवळ ३ तासात नाही मांडता येऊ शकत. दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांनी ते सादर करण्याचा प्रयत्न केलाय खरा. पण तो म्हणावा तितका यशस्वी नाही होऊ शकला. एकाच वेळी जवळजवळ १८ पात्रांची ओळख ३ तासात देण्याच्या आट्टाहासामुळे की काय झारापकर कोणत्याच पात्राला पुरेसा न्याय देऊ शकलेले नाहीत. तसेच चित्रपटात पु.लंच्या सिनेमांची पोस्टर्स दाखवताना दिग्दर्शक गुळाचा गणपती, देव-बाप्पा यांसारख्या महत्वपूर्ण सिनेमांची पोस्टर्स न दाखवण्याची चूक कशी काय करून शकतो ! चित्रपटात १९५० ते १९७० असा काळ दाखवत असताना पु.लंचे प्रसिद्ध गीत “इथेच टाका तंबू” हे २१ व्या शतकातील आयटम गर्ल वर चित्रित करावे असे दिग्दर्शकाला का बरे वाटले असावे!
या काही चुकांकडे दुर्लक्ष केल्यास चित्रपटात, बाबा आमटे-पु.ल. यांचा छोटा प्रसंग ,तमासगीर बाईकडे कार्यक्रम झाल्यावर केवळ बायकोचे आठ दिवस चांगले जातील या निर्मळ हेतूने न विसरता फुलांचा गुच्छ घेऊन जाणारे पु.ल. , मास्तरची बायको असल्याने कधी गळ्यात नाही पण डोळ्यात मोती पडले अशी बायकोला मोतीबिंदू झाल्याची खंत व्यक्त करणारे चितळे मास्तर, जेलमध्ये ५ वर्षात कोणी भेटायला आले नाहीत पण साला घोसावळे मास्तर डोक्यावर हात ठेवून गुड बॉय म्हणले असे सांगणारा बबडूचा प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतात. तसेच मधुरा दातार या तरुण पिढीच्या गायिकेच्या आवाजातील पु.ल.फेम ‘नाच रे मोरा,इथेच टाका तंबू’ ही गीते तसेच जाळीमंदी पिकली करवंदं, इंद्रायणी काठी ही गीते देखील केवळ श्रवणीय. तसेच पु.ल.-सुनीताबाई यांच्यावर चित्रित केलेले खास कोंकणी बाजातील गीत देखील उत्तम जमून आले आहे. जुन्या संगीताला कोणताही धक्का न लावता अतिशय उत्कृष्ट अशी संगीत -पार्श्वसंगीताची बाजू लीलया पेलल्याबद्दल मिलिंद जोशी यांचे विशेष कौतुक. या सर्व प्रमुख पात्रांसोबतच मनोज जोशी विकास पाटील,विजय पाटकर,प्रदीप पटवर्धन,हेमांगी कवी,मंजुषा गोडसे या कलाकारांनी देखील त्यांची छोटी भूमिका छान सादर केली आहे.
संपूर्ण चित्रपटाचे श्रेय हे चित्रपटातील काळ,पात्रांच्या वेशभूषेपासून त्यांच्या रंगभूशेपर्यंत यशस्वीरीत्या पेलणाऱ्या गीता गोडबोले यांचे. चित्रपटात पु.लंच्या वेळचा काळ त्यांनी अप्रतिम साकारला आहे. भूमिकांमध्ये, खुद्द पु.ल.साकारणाऱ्या निखिल रत्नपारखी व खऱ्या आयुष्यात पु.लंची नात असणाऱ्या डॉ.नेहा देशपांडे यांनी साकारलेल्या सुनीताबाई या दोघांचे खरोखरच कौतुक. नेहा देशपांडे यांच्या चित्रपटातील सहज वावरामुळे त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे हे खरेच वाटत नाही. या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत लक्षात राहतो तो म्हणजे वरून कितीही डॅशिंग दाखवणारा आणि आतून हळवा असणारा संजय नार्वेकरचा बबडू. आणि शेवटपर्यंत चेहऱ्यावर एकप्रकारचा गूढ भाव असणारा सुबोधने साकारलेले नंदा प्रधान.
गोळाबेरीज पु.ल प्रेमींसाठी वाचन, मालिका यानंतर आता सिनेमा रुपात पुन्हा पुलकित होण्याची एक संधी देतो. पु.ल.प्रेमींनी पुन्हा पु.लं.ची खास शैली अनुभवण्यासाठी,व इतरांनी पु.ल.हे नक्की काय रसायन आहे याची थोडक्यात ओळख करून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहण्यास काहीच कारकत नाही. फक्त भट्टी नीट जमली असती तर आणखी मजा आली असती हे ही खरे…



![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-180x110.jpg)







![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








