महाराष्ट्राला सत्पुरूषांची महान परंपरा लाभली आहे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अमरावतीचे संत तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराज यांसारख्या संतांनी प्रबोधनातून समाजाला जागृत आणि सुसंस्कृत बनवण्याचं काम केलं. याच शृंखलेतील एक महत्वाचं नाव म्हणजे शंकर महाराज. शंकर महाराजांचं चरित्र आणि लीलांवर आधारित ‘जय शंकर’ या चित्रपटाचं शुटींग नुकतंच पूर्ण झालं. मराठीतला पहिला-वहिला थ्री-डी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य.

‘जय शंकर’ या चित्रपटात शरद पोंक्षे यांनी शंकर महाराजांची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी या चित्रपटाची संकल्पना मांडली असून पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांचंच आहे.ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी चित्रपटाचा बाज सांभाळणारं अत्यंत श्रवणीय संगीत दिलं आहे. या चित्रपटातील ‘थ्रीडी’ची किमया कॅमेऱ्याद्वारे साधण्याचं काम दिनेश कंदरकर यांनी केलं आहे.

शंकर महाराज हे अवलिया होते. त्यांच्या डोळ्यात एक वेडसरपणाची, रागीटपणाची झाक असायची. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केलेल्या लीलांच्या संदर्भात वेगवेगळा तपशील त्यांच्या भक्तगणांकडे आहे. त्यामुळे त्यातला नेमका कोणता तपशील खरा मानायचा हा सगळ्यात पहिला प्रश्न होता. मग महाराजांची उपलब्ध असलेली चरित्रं, त्यांचे भक्तगण, त्यांच्या मठातील सेवेकरी यांच्याशी चर्चा करून महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंग निश्चित केले आणि तेच अधिकाधिक उत्तम रितीने चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, असं दिग्दर्शक शेखर नाईक यांनी ‘फिल्लमबाजी.कॉम’शी बोलताना सांगितलं.

हा चित्रपट 2012च्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.