भूमिका लहान असो वा मोठी, आपल्या फक्त अभिनयानेच नव्हे तर ती भूमिका मनापासून जगण्याने जे रसिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवतात अशा काही निवडक कलाकारांमध्ले एक म्हणजे दिलीप प्रभावळकर. दिग्दर्शकाची मागणी असेल तर त्या व्यक्तिरेखेला साजेसा लूक ते वेळोवेळी धारण करतात हे त्यांच्या तात्या विंचू, गंगाधर टिपरे, किंवा अगदी अलीकड्ल्याच मुन्नाभाईमधल्या गांधींच्या लुकवरून लक्षात येतच.

आगामी मसाला चित्रपटात ते एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत आणि तेही पर्यावरण प्रेमी शास्त्रज्ञ. साहजिकच सायकल शिवाय दुसंर कुठलही वाहन न वापरणारे, प्रयोगात तासंतास रममाण असणारे, केस वाढवलेले आणि विशेष म्हणजे खास इको फ्रेंडली लोगोचे टी-शर्टस घालणारे असे प्रभावळकर आपल्याला दिसतील.

गिरीश-उमेश कुलकर्ण्यांच्या या चित्रपटात नायकाला सकारात्मक दृष्टीकोन देणारे, थोडेसे तऱ्हेवाईक, पण आनंदासाठी नव्हे आनंदाने जगणारे प्रभावळकर त्यांच्या लूक बरोबरच सरस अभिनयाने आपल्या नक्कीच लक्षात राहतील.

त्यासाठी थांबावं मात्र लागेल ‘मसाला’ चित्रपटासाठी…