• कथा
  • अभिनय
  • दिग्दर्शन
  • संगीत

आजच्या करिअर फास्टच्या जमान्यात दिवसेंदिवस कुटुंबाचा आकार लहान होतोय. या सो कॉल्ड विभक्त कुटुंबांमध्ये घरातल्या लोकांचा संवाद कुठेतरी हरवतोय. दिवसभर कामासाठी घराबाहेर असलेले आई-बाबा आपल्या मुलांचं संगोपन करताना कमी पडताहेत का असा प्रश्न मनात पडल्यावाचून राहत नाही. नेमक्या याच विचारावर खुमासदार विनोदी शैलीत प्रकाश टाकलाय मकरंद अनासपुरे दिग्दर्शित ‘डॅंबीस’ चित्रपटात.

नीलिमा (डॉ. प्रज्ञा शास्त्री) आणि सिद्धांत (लोकेश गुप्ते) हे एक करिअरच्या मागे धावणारं जोडपं; आपल्या बिझी व्यापातून आपल्या मुलाकडे पार्थकडे ते पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. सिद्धांत आई-वडील एका अपघातात वारले असतात, तर नीलिमा ने परिवाराच्या मनाविरुद्ध जावून लग्न केल्यामुळे तिच्या आई-बाबा नि सुद्धा तिच्याशी संबंध तोडलेले असतात. ‘ग्रॅंड पॅरेंटस् डे’च्या निमित्ताने पार्थ आपल्या आजोबाना भेटण्यासाठी आणखीनच हट्ट करतो आणि इथून एन्ट्री होते ती एका धडपडणारा अभिनेता दत्तूची. सिद्धांत, दत्तूला काही पैसे देवून, खोटा आजोबा म्हणून घरी आणतो. पार्थला भेटल्यावर दत्तूचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमध्ये खूप कमी दिवसात एक घट्ट नातं तयार होतं आणि हे सगळं अतिशय हळुवारपणे चित्रपटात दिग्दर्शकाने मांडलंय.

आजोबा नातवाला देतो ती सगळी सुखं दत्तू पार्थला देतो, त्याच्याकडे हेळसांड केल्याबद्दल त्याच्या आईबाबांनाही चांगलाच दटावतो आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे दोषही त्या दोघांच्या निदर्शनास आणतो. पण त्याची सांगण्याची पद्धत मात्र उपदेश करण्याची नसून हलक्या फुलक्या विनोदाची आहे. लहान मुलाला या बाहेरच्या माणसाचा एवढा लळा लागलेला बघून नीलिमा-सिद्धांतला आपली चूक लक्षात येते.आणि सिनेमाचा गोड शेवट होतो.

सिद्धार्थ मुव्हीज निर्मित ‘डॅंबीस’ हा प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता त्यांच्या डोळ्यात उपदेशाचं अंजनही घालतो. चित्रपटात गाण्यांचा भडीमार न करता निखळ मनोरंजन करण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय.

चित्रपटाची कथा-संकल्पना मकरंद अनासपुरेंची असून पटकथा, संवाद व गीते अरविंद जगताप यांनी लिहिली आहेत. आनंद मोडक यांनी संगीत दिलंय तर अनुभवी सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे.

मकरंद अनासपुरेंनी या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात दमदार पदार्पण केलंय. याशिवाय मकरंदने चित्रपटात अभिनेता होण्याचं स्वप्न मनात असणाऱ्या, धडपडणाऱ्या दत्तूच्या व्यक्तिरेखेलाही चांगला न्याय दिलाय. शुभंकर अत्रे याने केलेला हट्टी, खोडकर आणि निरागस पार्थ खरोखर वाखाणण्याजोगा आहे. नीलिमा आणि सिद्धांत च्या भूमिकेत लोकेश गुप्ते आणि डॉ प्रज्ञा शास्त्री प्रेक्षकांना भावतात.

एक उत्तम कौटुंबिक करमणूक म्हणून सर्वांनी एकदा तरी बघण्यासारखा हा ‘डॅंबीस’ चित्रपट आहे.

दिग्दर्शक: मकरंद अनासपुरे
निर्माते: सयाजी शिंदे, वाल्मिक मुरकुटे आणि मकरंद अनासपुरे
कलाकार: मकरंद अनासपुरे, लोकेश गुप्ते, प्रज्ञा शास्त्री, बालकलाकार शुभंकर अत्रे, अनिल अवचट(पाहुण्या भूमिकेत)