• पटकथा
  • अभिनय
  • दिग्दर्शन
  • संगीत

एखद्या पदार्थात मसाला,मीठ,फोडणी कमी-अधिक प्रमाणात पडले तर त्या पदार्थाची भट्टीच बिघडते. तसेच काहीसे किशोर साव दिग्दर्शित “ब्लफमास्टर” या चित्रपटाचे झाले आहे. थोडी निखळ करमणूक, थोडी लव स्टोरी आणि थोडा टिपिकल फिल्मी मसाला यांची भट्टी जमवण्याच्या प्रयत्नात चित्रपट पूर्णतः फसला आहे.

सिनेमा सुरु होतो, तोच मुळी तीन मित्रांच्या कहाणीपासून – निकी (अंकुश चौधरी), प्रकाश(मंगेश देसाई) आणि दीपक पेटवे (पुष्कर श्रोत्री). नेहमीच्याच साच्याप्रमाणे यातील एकाला कलाकार, दुसऱ्याला लेखक तर तिसऱ्याला दिग्दर्शक व्हायचे असते. मग त्यासाठी करावा लागणारा स्ट्रगल दाखवून दिग्दर्शकाने एक-दोन प्रसंगांची लांबी वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे. चित्रपटात नायक म्हणाले की नायिका ही ओघाने आलीच! ”ब्लफमास्टर” मध्ये ही दिखाऊ बाहुली (सानिका) तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे. नायिकेच्या मावशीच्या भूमिकेत ज्येष्ठ विनोदी अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी काम केले आहे.

टिपिकल फिल्मी स्टाईलमध्ये हिरोने हिरोईनला गुलाब देऊन प्रेमाची कबुली देणे, स्ट्रगलर असल्यामुळे हिरो व त्याचा मित्र प्रकाश भाडेकरू म्हणून राहणे, घरमालक टिंगरे अण्णा (विजय कदम) यांनी भाडे वसुलीसाठी त्यांच्या मागे लागणे, हिरोईन सानिकाच्या मागे हिरो आणि त्याच्या मित्र दीपक यांनी एकाचवेळी लागणे, हिरोईन पटताच तिच्या मावशीचा होकार मिळवण्यासाठी हिरो स्वतः निकी, त्याचे वडील आणि सदाफुली आत्या या तिन्ही व्यक्तिरेखा साकारणे आणि हीरोचे भांड फोडण्यासाठी मित्र दीपकची तडफड, दरम्यान नायिकेची मावशी स्वतः नायकाच्या वडिलांच्या प्रेमात पडणे, तसेच टिंगरे अण्णा आधी मावशी नंतर आत्या च्या प्रेमात पडणे, आत्या,वडील आणि खुद्द निकी या तीन व्यक्ती साकारताना निकीची झालेली त्रेधातिरपिट आणि अखेर सिनेमाच्या शेवटी नायकाच्या खऱ्या वडिलांचे आगमन…असा कुणीही अंदाज लावू शकेल असा घीसापीटा  टिपिकल मसाला चित्रपटात भरला आहे. ही साठा उत्तराची कहाणी जेव्हा संपूर्ण होते तेव्हा प्रेक्षक वर्ग सुटकेचा निश्वास टाकतो.

या संपूर्ण चित्रपटात जमेची बाजू एकच – अंकुशचा अभिनय. त्याने वठविलेल्या तिन्ही व्यक्तिरेखा उत्तम. ‘मी सिंधुताई सपकाळ’ सारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर तेजस्विनी पंडित हिने या चित्रपटात का काम केले असावे? हा एक यक्ष प्रश्नच आहे. चित्रपटाचे प्रसाद-अद्वैत यांचे संगीतही निराशाजनकच…चित्रपटातील एकही गाणे गुणगुणावे एवढेही लक्षात राहत नाही. चित्रपटाला वेगळी अशी ना कथा आहे ना एखादे नाविन्य त्यात  दिसून येते की ज्यामुळे प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरेल!

“ब्लफमास्टर” चा निखळ मनोरंजनाचा अनेक हिंदी-मराठी सिनेमांची मिसळ करून दाखवण्याचा प्रयत्न इतका फसला आहे की हा चित्रपट एकदाही नाही पहिला तरी काहीच बिघडणार नाही. सो रसिक प्रेक्षकहो, ”ब्लफमास्टर” साठी  थिएटरमध्ये पैसे खर्च करून, खास तिकीट काढून न जाणे उत्तम ठरेल.