नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने झालेले असतानाच ते व्दिगुणीत करण्यासाठी नवनव्या विषयांना वाहिलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. अभिरुचीसंपन्न मराठी प्रेक्षकांच्या आवडी-निवडीचे भान ठेवणा-या आजच्या दिग्दर्शकांनी निवडलेले या चित्रपटांचे विषयही तितक्याच ताकदीचे आणि वैविध्यपूर्ण आहेत. त्यामुळे ठराविक पठडीतले चित्रपट पाहून कंटाळलेला मराठी प्रेक्षक नक्कीच ताजातवाना होईल. प्रेक्षकांना रिफ्रेश करायला ’अंबाजोगाई चित्र’ निर्मित ’ब्लफमास्टर’ हा धमाकेदार मनोरंजक चित्रपट  17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

’श्री संत कृपा प्रा.लि.’ (SSK) आणि ’पूजा फिल्मस प्रॉडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वैभव बढे, राजेश उत्तमचंदानी, नयना रानडे यांनी केली आहे. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या किशोर साव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी तिहेरी भूमिकांमध्ये झळकणार आहे.

’ब्लफमास्टर’ चित्रपटाची कथा आहे, निकी, दिपक आणि प्रकाश या तीन मित्रांच्या स्ट्रगलची. सिनेक्षेत्रात नाव कमविण्यासाठी संघर्ष करणा-या या मित्रांच्या आयुष्यात सानिकाचा (तेजस्विनी पंडीत) प्रवेश होतो. सानिकाचे अभिनेता होण्यासाठी धडपडणा-या निकीवर (अंकुश चौधरी) प्रेम आहे तर, दिग्दर्शक होऊ पाहणारा दिपकही (पुष्कर श्रोत्री) सानियावर प्रेम करतो आहे. त्यांच्या कुरघोडया आणि त्यातून घडणारे प्रसंग यात विनोदीशैलीत मांडण्यात आले आहेत. त्याचवेळी कथेत एका चित्रकाराचा झालेला प्रवेश या कथेला एका वेगळयाच वळणावर घेऊन जातो. चित्रकाराची अनोखी संकल्पना निकीला पुढे गोंधळात पाडते. त्याचवेळी अचानक आलेल्या सानिकाच्या मावशीसमोर खोटं लपविण्यासाठी चाललेली कसरत त्यांची त्रेधातिरपीट उडवते. शेवटी सानिका कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. चित्रपटातील विनोद, रहस्य आणि ऍक्शनची ही त्रिसुत्री नक्कीच खिळवून ठेवणारी आहे. अनिल दिक्षीत यांच्या कथेला राजेश कोलन यांची पटकथा तर संवाद विजय पटवर्धन व अनिल दिक्षीत यांनी लिहिले आहेत. चित्रपटातील नितीन वाशीकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रसाद – अव्दैत यांनी संगीतबध्द केलं असून वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, ऋषिकेश केळकर, पूजा यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहेत. अविनाश – विश्‍वजीत यांनी चित्रपटाला पार्श्‍वसंगीत दिले असून सुप्रसिध्द सिनेमॅटोग्राफर संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे.

धमाकेदार व्यक्तिरेखांचा ’ब्लफमास्टर’ 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांचे मनोरंजन करायला चित्रपटगृहात दाखल होत आहे.