चित्रपट हे व्हिज्युअल्सचं माध्यम आहे. इथे जे काही सांगायचंय ते दृश्यांच्याच माध्यमातून सांगायचं हा आग्रह असला पाहिजे. आधी दृश्य आणि मग गरज असल्यास संवाद हे या माध्यमाचं प्राथमिक सूत्र. अतिशय ताकदीच्या संवादाचे चित्रपट अनेकदा आपण बघतो पण तिथेही दृश्यांची परिणामकारकता आवश्यक असतेच नाहीतर त्यात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटू लागतं. त्यामुळे ’बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ एवढीच गोष्ट खरी.  ’ग्लोरियस फिफ्टी’मध्ये अशाच दर्जेदार चित्रपटांची दखल आपण घेणार आहोत.

मात्र या पन्नास चित्रपटांमध्ये असाही एक चित्रपट आहे की ज्यानं ’चित्रपट’ माध्यमाच्या ताकदीकडे जरासा कानाडोळा करून, तंत्रशुद्धता आणि व्हिज्युअल रिचनेस या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, पटकथेत चक्क आपल्या सोयीनं शॉर्टकट मारून केवळ धमाल संवाद आणि दर्जेदार अभिनय या जोरावर प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही इतर सगळ्या गोष्टी विसरायला लावून प्रत्येक वेळी एकदम ’फ्रेश’ होण्याचा अनुभव दिलेला आहे. पुन्हा पुन्हा बघताना पूर्वी अनेकदा हसलेल्या आणि नंतर सगळं पाठ झालेल्या प्रसंगांना बघून फिरून एकदा मनमुराद हसण्याचा अनुभव देणारा हा चित्रपट होता ’अशीही बनवाबनवी.’

तो काळ होता ग्रामीण विनोदी किंवा सामाजिक चित्रपटांचा. एकीकडे दादा कोंडकेंचे चित्रपट धूम उडवत होते आणि दुसरीकडे तमाशापट पूर्वसूरींच्या पावलावर अडखळत का होईना पण पाऊल टाकत होते. सामाजिक विषयांवरचे गंभीर चित्रपटही आपली स्वतंत्र चाकोरी रेखत होते. असं असताना मराठी चित्रपटसृष्टीतल्या सचिन आणि महेश कोठारे या दोन दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्या काळच्या तरूणाईनं उचलून धरलं होतं. ’नवरी मिळे नव-याला’ आणि ’गंमत जंमत’ सारख्या चित्रपटांनी सचिन लोकप्रिय होताच. त्याचा कळस गाठला तो ’अशीही बनवाबनवी’ या चित्रपटानं. वसंत सबनीसांसारखा उमदा लेखक आणि अशोक सराफ, सचिन, लक्ष्मिकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांचा अफलातून अभिनय या दोन गोष्टींच्या जोरावर ’अशीही बनवाबनवी’ गाजला. नव्हे आजची पीढीही तो बघते आणि कलाकारांच्या अफलातून टायमिंगवर खोखो हसत सुटते.

बनवाबनवीची कथा सांगणं म्हणजे वाचकांना मूर्ख समजणं आहे. ती चूक करायचं मला कारण नाही. किंबहुना त्यातली कथा फारशी महत्वाची नाहीच. पुण्यात जागेच्या अडचणीमुळे चारपैकी दोन मित्र बायकांचा वेष घेऊन वावरतात आणि मग त्याअनुषंगानं बनवाबनवी केली जाते यात मुद्दा एकामागून एक येणा-या विनोदी दृष्यांचाच असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ती पात्रं कसल्याही लॉजिकशिवाय सीनमध्ये अवतरतात आणि प्रेक्षकही त्यावर फारसा विचार करत नाहीत!

उदाहरणार्थ, घर शोधायच्या नादात पाषाण रोडवरून एका बंगल्यातून बाहेर निघालेले धनंजय आणि शंतनू थेट बालगंधर्व रंगमंदिरालाच येतात आणि समोरून नेमके त्याच वेळी परशा आणि सुधीर येतात. त्याच वेळी त्यांना बालगंधर्वमध्ये जायची बुद्धी होते. या योगायोगाविषयी प्रेक्षक विचारत नाहीत कारण त्यांना स्त्रीवेषातल्या बालगंधर्वांचा फोटो बघून धनंजयला सुचलेली सुधीर आणि परशाला स्त्रीवेष द्यायची आयडिया बघायची आहे.

पुढे घरमालकांना ओळख करून द्यायच्या निमित्तानं प्रेक्षकांना या दोघांचं स्त्रीरूप दिसतं. बनवाबनवीतल्या सचिनच्या स्त्रीरूपाबद्दल एव्हाना खूप बोलून झालंय आणि लक्षाच्या स्त्रीरूपाबद्दल बोलण्यासारखं काही नाही! शंतनूला धनंजय म्हणतो- ’तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे, मला या रानरेड्याबरोबर संसार करावा लागणार आहे..!’ प्रेक्षक लक्षाला याही रूपात सहन करतात कारण पुढे लक्षा त्याच्या अ‍ॅडिशन्समधून आणि संवादाच्या अचूक टायमिंगमुळे प्रेक्षकांना हसवणार असतो.

लीलाबाईंकडे हे चौघंही मित्र बनवाबनवी करून रहात असताना तिथे तिची भाची मनीषा आपल्या मिरजेच्या मैत्रिणीला मुंबईहून चारपाच महिन्यांसाठी रहायलाच घेऊन येते. ही मैत्रिण म्हणजे सुषमा. ही शंतनूची प्रेयसी आहे जी चित्रपटात मीरजेच्या स्टेशनवरच्या पहिल्या सीननंतर व्हाया मुंबई पुण्यात ’सहज’ मुक्कामालाच येते. असं का हा प्रश्न प्रेक्षक विचारत नाही कारण आता शंतनूची बनवाबनवी बघण्यात त्यांना रस आहे.

शंतनू सुषमाला सुधाला कॅन्सर असल्याची थाप मारतो. एखाद्या ब-या अ‍ॅक्टरनं हा सीन अधिक चांगला रंगवला असता. पण प्रेक्षक त्याहीकडे दुर्लक्ष करतात कारण हसून हसून थकल्यामुळे त्यांना हा सीन चालू असताना जरा दम खाता येतो!

सुधीरला गाण्याची कॅसेट काढायची ऑफर येते, अ‍ॅडव्हान्स मिळतो त्यात तो नवे कपडे घेतो आणि मनीषावर इंप्रेशन मारतो. इथे पुन्हा सुधाचा जुळा भाऊ, तिचं लग्न आवडलं नाही म्हणून तिचं तोंड बघायचं नाही वगैरे बनवाबनवी. तोपर्यंत शंतनूच्या अभिनयाचा ब-यापैकी उजेड पडलेला असतो त्यामुळे सुधीर झालेल्या सचिनचा ’त्या शंतनूला पाहून माझी तळपायाची आग मस्तकाला जाते’ हा डायलॉग दिग्दर्शक म्हणून खरा आहे की काय अशी शंका येते! (कारण इथे सचिनचा अभिनय अगदी नैसर्गिक झाला आहे!!)

छबूरावाचा तमाशा पुण्यात येतो तेव्हा पार्वतीच्या वेषातच परशा कमळीला भेटायला जातो. इथला ग्रामीण इनोद प्रेक्षक खपवून घेतो ते केवळ त्यांना लक्षाचा ’लोक मर्द म्हणतील का मला?’ एवढा डायलॉग ऐकायचा असतो.

पार्वतीच्या वेषातल्या परशाच्या अंगावर बळी हात टाकतो नेमका तिथेच धनंजय कसा काय येतो बुवा हा प्रश्न प्रेक्षकांच्या दृष्टीनं महत्वाचा नाही. कारण एका झाडावर पार्वतीला धरल्यावर ती तिथून निसटते, बळी पुन्हा तिला तिथे ओढून आणतो त्यावर पार्वती ’सारखं सारखं त्याच झाडावर काय?’ असं म्हणते आणि हसण्याच्या नादात आपण सगळं विसरतो!

फायलीतल्या झुरळामुळे मालकीण धनंजयला मीठी मारते अशासारख्या दृश्याची नव्हाळी प्रेक्षकांना कधीच नसते. त्यांना ऐकायचा असतो अशोक सराफच्या तोंडून पुढचा डायलॉग- ’पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धाऊन आला आमच्या मदतीला झुरळ आलं, काळाचा महिमा दुसरं काय?’ पडद्यावरच्या अशोक आणि अश्विनी भावेबरोबर पडद्याबाहेरचे प्रेक्षकही जरा श्वास घेतात आणि अशोकचा पुढचा संवाद ऐकायला सज्ज होतात- ’पण आपल्या ऑफिसमध्ये झुरळं जरा कमीच आहेत नाही?’

’व्हिनस कंपनीनं काढलेली माझी कॅसेट खूप खपली’ असं हातात एक कॅसेट घेऊन सांगण्याचा सीन हा खास मराठी सिनेमातला कद्रूपणा. पण आता या सिनेमातल्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं प्रेक्षकांनी ठरवलेलंच आहे. कारण आता प्रेक्षकांना सुधाच्या मरणासन्न अवस्थेतल्या सीनची वाट आहे. ’जाऊबाई…’ या सुधाच्या हाकेला पार्वतीचा ’नकाबाई इतक्यात जाऊ’ हा इन्स्टंट प्रतिसाद बघून त्यांना लक्षाची पाठ मनातल्या मनात पुन्हा एकदा थोपटायची आहे.

एखादा विनोदी सिनेमा हा बघताना केवळ हसू येतं म्हणून उत्तम म्हणवला जाऊ शकत नाही. त्या विनोदाला कारूण्याच्या झालरी लाऊन, सामाजिक टिप्पणीचं वेष्टण घालून किंवा मानवी मनातले पापुद्रे उकलण्याची लेबलं लाऊनही तो सर्वोत्तम होऊ शकत नाही. ज्या विनोदामध्ये सगळं माहित असूनसुद्धा पुन्हापुन्हा त्यात हसू येण्यासारखं काय आहे याचा शोध घेता येतो तो टिकतो. एरवी विनोदावर कारूण्य बेतणं, सामाजिक संदर्भ देणं वगैरे यशस्वी प्रयोग अनेक झालेले आहेत. ते हातखंडाही आहेत. पण विनोद प्रत्येकवेळी नवा लागत असतानासुद्धा तो पुन:प्रत्ययाचा आनंद देऊ शकतो तो विनोद काळाच्या ओघातही टिकतो. पाश्चात्यांमध्ये मार्क ट्वेन, वुडहाऊस किंवा आपल्याकडे पुलंचा विनोद असा पुन:प्रत्ययाचा आनंद देतो. ’अशीही बनवाबनवी’नं मराठी चित्रपटांमध्ये असा आनंद वारंवार दिलाय म्हणूनच तो आजही टिकून आहे.

सिनेमाचा शेवट सामान्य आहे. बळीच्या गुंडांशी (बहुतेक मराठी सिनेमांमध्ये दिसते तशी) विनोदी मारामारी होते आणि यांची बनवाबनवी उघड होते. पोलिस स्टेशनमध्ये लीलाबाई आणि चौघांचे इमोशनल डायलॉग वगैरे. मग चार नायक, त्यांच्या चार नायिका आणि मावशी यांना एकाच फ्रेममध्ये लायनीनं उभं करून काढलेल्या फोटोच्या, एखाद्या महाकाव्यातल्या ब्रह्मवाक्यासारख्या मराठी सिनेमातल्या’ब्रह्मफ्रेम’वर सिनेमा संपतो.

पण शेवटच्या या घडामोडींचं प्रेक्षकांना विशेष काही वाटत नाही. कारण सिनेमा संपताना ते आपण आत्तापर्यंत बघितलेल्या कोणत्या दृश्यावर सगळ्यात जास्त हसलो तेच आठवून पुन्हा एकदा हसण्याची संधी शोधतात. आणि त्यांना तात्काळ ते दृश्य आठवतं:

खत्रुड घरमालकापासून लपवून एकत्र रहाणा-या चौघांचीही सकाळ झालेली आहे. चौघं चहा पीत बसलेले असताना मालक घरात येतात. परशा मालकासाठी उघडलेल्या दारामागे लपतो आणि धनंजय, सुधीर हा शंतनूचा मित्र आहे अशी थाप मारतो. तेवढ्यात परशा दारातून बाहेर सटकायला आणि मालकानं वळून बघायला एकच गाठ पडते. अफलातून टायमिंग साधत परशा तात्काळ दाराच्या दिशेनं वळून दार ठोठावून विचारतो: ’धनंजय माने इथेच रहातात ना?’

’अशीही बनवाबनवी’त एवढा एकच सीन जरी असता तरी या सिनेमाची नोंद ’ग्लोरियस फिफ्टी’ला घ्यावी लागली असती.

प्रसाद नामजोशी
prasad.namjoshi@gmail.com

 

अशीही बनवाबनवी(१९८८)

दिग्दर्शन: सचिन

पटकथा, संवाद: वसंत सबनीस

सिनेमॅटोग्राफी: राम अल्लम

संगीत: अरूण पौडवाल

कलाकार:

धनंजय- अशोक सराफ

सुधीर- सचिन पिळगांवकर

परशुराम- लक्ष्मीकांत बेर्डे

शंतनू- सुशांत रे

विश्वास सरपोतदार- सुधीर जोशी

याशिवाय सुप्रिया, निवेदिता, प्रिया अरुण, अश्विनी भावे वगैरे.