‘गोळाबेरीज’ या पु. लं.च्या लेखनप्रतिभेचे वेगवेगळे पैलू दाखवणार्या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. ‘जिथं मराठी घर तिथं पु.लं.’ आहेत म्हणूनच आपल्या लाडक्या पु.लं.ना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत. या चित्रपटात पु. लं. बरोबरच्या सुनीताबाईंच्या भूमिकेबद्दलची चर्चा होत आहे. कारण त्यांची नात नेहा देशपांडे-कामत आपल्या आजीचा अर्थात सुनीताबाईंचा रोल करतेय.
यानिमित्त नेहाशी मारलेल्या गप्पा.
‘गोळाबेरीज’च्या निमित्तानं तू मराठी चित्रपटात पदार्पण करते आहेस. त्याबद्दल तुझं अभिनंदन. आपल्या आजीचा रोल कसा काय मिळाला?
मला अभिनयाची आवड होतीच. पण चित्रपटात काम करायचा विचार नव्हता. ‘गोळाबेरीज’ चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्तानं पत्रकार परिषदेला, पु.लं.च्या नातेवाईकांना बोलावलं होतं; म्हणून मी तिथे होते. कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होता. मी क्षितिजशी बोलत होते. तेव्हा मी त्यांना नाटकात काम केलं असल्याचं बोलले. आणि त्यांनी मला सुनीताबाईंच्या रोलबद्दल विचारलं. माझ्यासाठी तो धक्काच होता. पण मी नंतर विचार करून या रोलसाठी होकार दिला.
तू यापूर्वी नाटकात काम करत होतीस, त्याचा तुला ही भूमिका साकारताना कितपत फायदा झाला?
निश्चितच फायदा झाला. मी सुलभा देशपांडेबरोबर ‘आविष्कार’ या संस्थेतर्फे नाटकात काम केलं होतं त्यामुळे अभिनय हा प्रांत मला नवीन नव्हता. पण सात वर्षांनंतर अभिनय करत होते व माझ्या आजीची भूमिका करत असल्यानं खूप वेगळा अनुभव मिळाला.

या भूमिकेबद्दल काय सांगशील?
मी २६ वर्षांची असताना सुनीता आजी गेली. त्यामुळे तिचा खूप सहवास लाभला. एखाद्या व्यक्तीला इतक्या जवळून पाहिलेलं असल्यानं पडद्यावर ते साकारलं जाऊ शकतं असं वाटत नाही. आणि मला भावलेली आजी साकारायची नव्हती, तर ‘सुनीता देशपांडे’ म्हणून त्या व्यक्तिमत्त्वाला असलेला अॅटिट्यूड सांभाळून ती भूमिका साकारायला सांगितलं होतं. त्यामुळे चित्रपटातलं कुठलीही पात्रं ओरिजनल पात्रांची नक्कल नाहीये. परंतु जे पु.लं.नी आपल्या लिखाणातून मांडलं ते साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दिग्दर्शक क्षितिज झारपकरांनी माझं काम खूप सोप्पं केलं.
‘आहे मनोहर तरीही’मधून सुनीताबाईंचं व्यक्तिमत्त्व रसिकांपुढे आलं. त्यामुळे प्रेक्षकांना माहीत असलेल्या सुनीताबाईंना साकारणं आव्हानात्मक होतं का?
पु. लं.च्या लिखाणातून आणि सुनीता देशपांडेंच्या ‘आहे मनोहर तरीही’ मधून त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे प्रेक्षकांपुढे आलं ही गोष्ट नक्कीच खरी आहे. परंतु चित्रपटात पु.लं.चा आणि सुनीताबाईंचा फारसा पर्सनल ट्रॅक नाहीय. आणि जसं मी मघाशी सांगितलं की त्या जशा लोकांना माहीत आहेत, त्याची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न नव्हताच. शिवाय, चित्रपट मुळात पु. ल.मधल्या लेखकाचा प्रवास मांडणारा आहे, ते पु.लं.चं बायोपिक नाही; शिवाय तिथे सुनीताबाईंचा रोल वेगळा आहे.
पुन्हा चित्रपटात काम करायची संधी मिळाली तर काम करायला आवडेल का?
कधीही आवडेल! मला सर्व प्रकारचे रोल्स करायला आवडतील. ऑफर्स आल्या तर मी नक्कीच विचार करेन.
आम्हालाही तुला चित्रपटात बघायला नक्की आवडेल. ऑल द बेस्ट…



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








