एका मध्यमवर्गीय नोकरदार माणसाने आपल्या मुलाला दाखवलेलं स्वप्नं, ते पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने केलेली जिवापाड मेहनत, ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्या माणसाने विविध मार्गाने केलेले प्रयत्न आणि या सगळ्यातून फुलत गेलेलं वडील-मुलाचं संवेदनशील नातं, याचं सुंदर चित्रण म्हणजेच “ताऱ्यांचे बेट”. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर झी मराठीवर रविवार, १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.०० वा. होत आहे.

किरण  यज्ञोपवीत  या  नवोदित  दिग्दर्शकाच्या  या  पहिल्याच  चित्रपटावर  प्रेक्षक  आणि  समीक्षक  या दोघांनीही कौतुकाची थाप दिली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील नोकरदार माणसाला रोजच्या जीवनात  भेडसावणाऱ्या  लहान मोठ्या समस्या, मर्यादित पैशात घर चालवण्यासाठी घरातील गृहिणीला करावी लागणारी कसरत अशा सर्व बारीक गोष्टींचं अत्यंत सुंदर चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. उत्तम पटकथा आणि मनाचा ठाव घेणारे संवाद यांच्या बरोबरीनेच खेडेगाव आणि मुंबईयांच्यातील  विरोधाभास  दाखवणारे  प्रभावी छायाचित्रण  आणि  सुंदर पार्श्वसंगीत यामुळे  हा सिनेमा  मनात घर करतो.

बालाजी  फिल्म्सची  निर्मिती  असलेल्या  ‘ताऱ्यांचे बेट’ या  चित्रपटामध्ये  सचिन  खेडेकर,  अश्विनी गिरी, शुभांगी जोशी, ईशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर  यांच्या  मुख्य  भूमिका  आहेत. त्याचप्रमाणेविनय आपटे आणि किशोर कदम यांनीदेखील लक्षणीय भूमिका केल्या आहेत.

या चित्रपटाचे  संगीत  नंदू  घाणेकर  यांनी  दिले  असून  पार्श्वसंगीत नरेंद्र  भिडे यांनी दिले  आहे.  या  चित्रपटाची  कथा  सौरभ  भावे  यांनी  लिहिली  असून किरण यज्ञोपवीत, शैलेश दुपारे आणि सौरभ भावे यांनी या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लिहिली  आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सुधीर पळसाने यांनी सांभाळली आहे.

पहायला विसरू नका..ताऱ्यांचे बेट – रविवार १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.०० वा. फक्त ‘झी मराठी’वर  !