’जिंदगी ना मिलेगी दोबारा या एस्टी महामंडळाच्या सिनेमात कतरीनानं पाण्याखाली स्टंट केले आणि अवघे निसर्गप्रेमी सुखावले.’ – आम्ही

आमचं हे विधान आम्ही स्वत:च उधृत करण्याचं कारण म्हणजे सध्या तशीच पद्धत आहे! या विधानात अनेक चुका असतीलही. कुणाला वाटेल की या सिनेमात कतरीनानं जे केलेत ते स्टंट नव्हतेच किंवा त्यामुळे निसर्गप्रेमी सुखावले नाहीत तर पाणी दूषित झाल्याची त्यांची तक्रार आहे (तसंही या निसर्गप्रेमींना माणसांविषयी तक्रारी करत बसण्याची हौसच असते म्हणा) वगैरे वगैरे.

 

पण एस्टी महामंडळाच्या या सिनेमात…आँ? काय म्हणता? हा सिनेमा एस्टी महामंडळाचा नव्हता? पण त्यात त्या तीनचार जणांसोबत आपणही रस्त्यावरून सारखेच इकडून तिकडे फिरतो आहोत असं वाटत होतं ना? म्हणजे आम्ही काही तो सिनेमा बघितलेला नाही पण असं आपण सारखंच कुठून कुठे फिरत असलो आणि खिडकीतून खाली उलट्या दिशेनं पळणारा रस्ता दिसत असला की आम्हाला एस्टीच्या सात दिवसात वाटेल तिथे प्रवास योजनेची हटकून आठवण होते. म्हणून वाटलं की तो महामंडळाचाच सिनेमा असेल. मागे नाही का बायको का नवरा दोघांपैकी कुणीतरी एक माझा नवसाचा असा सिनेमा महामंडळानं काढला होता? …अरेच्चा! काय सांगता? तो महामंडळाचा नव्हता तर महागुरूंचा होता म्हणता? असेल असेल. पण मुळात आमचा मुद्दा तो नव्हताच.

 

मुद्दा आहे कतरीनाच्या पाण्याखालच्या स्टंटचा. आणि तो यशस्वी झाला म्हणून आणखी एका सिनेमात तिला पुन्हा असेच पाण्याखालचे स्टंट करायची ऑफर आहे म्हणतात. या सिनेमावाल्यांना काय, एक यशस्वी झालं की लगेच त्याच्यासारखं दुसरं करायची खोडच असते. पाण्याखालची कतरीना लोकांना आवडते ना? मग बुडवा तिला पाण्यात! आता पुढची काही वर्ष आपल्याला कोरडी कतरीना दिसणं मुश्किल होतंय की नाही ते बघा.

पण मी म्हणतो मुळात पाण्याखाली जाऊन नको ते धंदे करायला सांगितलंय कुणी? काय करायचंय ते जमिनीवर करा ना. उड्या मारा, गा, प्रेमं करा, मारामा-या करा, कपडे काढा, घाला, घातलेले पुन्हा काढा…पण असं आचरटासारखं पाण्याखाली किंवा विमानातून हवेत उड्या मारण्याचे उद्योग करावेत कशाला म्हणतो मी? आणि हल्लीच्या सिनेमात हे का दाखावतात तर म्हणे लोकांनाच तसं आवडतं. आणि हे जर खरं असेल तर हल्ली समाजात असला आचरटपणा फारच वाढत चालल्याचं हे लक्षण आहे.
आपल्या आजूबाजूला बघा. जो उठतो तो आपला निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या गप्पा करतो. (कहर म्हणजे चक्क बिल्डर मंडळीसुद्धा निसर्गात रहायला जा वगैरे सल्ले देऊ लागले आहेत. आधी गावातली झाडं पाडून काँक्रीटची जंगलं बांधायची आणि जागा संपली की दोनशे किलोमीटर वर निसर्गसान्निध्यात सेकंड होमच्या जाहिराती करायच्या!) आणि निसर्गसानिध्यात जायचं म्हणजे काय काय? अरे आम्ही काय निसर्गाबाहेर रहातो का? तुम्ही घेता तो तेवढा ऑक्सिजन आणि आम्ही काय मोटारीच्या एक्झॉस्ट पाईपला नाकं लावून श्वास घेतो का?

सुटीच्या दिवशी चांगलं उशीरा उठावं, मस्त चहा पीत वर्तमानपत्रातल्या चुका काढत तास-दोनतास घालवावेत. मित्रांबरोबर टवाळ्या करत दुपारच्या जेवणाची वाट बघावी आणि संध्याकाळपर्यंत टांगा पलटी घोडा फरार झाल्यासारखं बिनधास्त झोपावं, ते सोडून ही स्टंटबाज निसर्गमित्र मंडळी वीकएंडला पहाटे उठून कुठेतरी जंगलाच्या दिशेनं जायला लागतात.पण कुणी बोलवलंय का तुम्हाला?

काय तर म्हणे निसर्गाची हाक! निसर्गाच्या कुशीत जायचं, टिव्ही नाही, मोबाईलला रेंज नाही, वीज नाही…अहाहा…शांतपणे लुकलुकणा-या काजव्यांकडे बघत पडून रहायचं…वा! अरे मग आम्ही इथे दुसरं काय करतो? आमच्याकडेपण बहुतेक वेळा वीज नसतेच, त्यामुळे टिव्ही आपोआपच बंद होतो. आमच्या बीएसएनएल मोबाईलला घरात रेंज आली आणि हव्या त्या व्यक्तीला फोन लागला तर आम्ही देवापुढे दहा रूपयांचे पेढे ठेवतो! (खरं तर अकरा रूपयांचे ठेवायची पद्धत आहे पण फोन लागल्यामुळे एक रूपयाचा कॉल करावा लागतो, म्हणून मग दहाचेच ठेवतो.) तात्पर्य, आमच्याकडेही वीज नाही, टिव्ही नाही, मोबाईलला रेंज नाही आणि अशी अवस्था असल्यामुळे आपोआपच डोळ्यांपुढे काजवे चमकू लागतात…मग

त्यासाठी एवढा खर्च करून जंगलात कशाला जायचं?

आणि निसर्गवाल्यांमध्ये आणि आमच्यामध्ये मुख्य फरक हा की त्यांना झाडं आवडतात आणि आम्हाला माणसं. शेवटी माणसांना बघून डोळ्याला जे सुख मिळतं ते झाडांना बघून मिळत नाही हेच खरं. विश्वास बसत नाही? मग कुठल्याही संध्याकाळी पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर येऊन बघा आणि खात्री करून घ्या. (प्रांतिक अभिमानी मंडळींनी या वाक्यात ’पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर’ या शब्दाऐवजी दादरच्या शिवाजी पार्कवर, नाशिकच्या कॉलेज रोडवर किंवा नागपूरच्या डब्ल्यूएचसी रोडवर असा बदल करून घ्यावा आणि उरलेल्या गावातल्या लोकांनी जिभल्या चाटाव्या.) झाडांच्या खोडांच्या आकारात स्त्रीदेह शोधण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा काष्ठशिल्पवाल्यांनी फिल्मफेअरचा अंक विकत का घेऊ नये?
शिवाय बहुतेक वेळेला तुम्हाला माणसांशीच संबंध ठेवावा लागतो. तुमचा बॉस हा माणूस असतो शिवनेरी परिसरात दिसणारा कुठल्या तरी जातीचा करकोचा नसतो. तुमची बायको किंवा मैत्रिण हीसुद्धा (शक्यतो-बाई)माणूसच असते, कुठल्याश्या घाटात दिसणारी दुर्मिळ अशी बुरशी वगैरे नसते. मग असल्या गोष्टी बघत विनाकारण हिंडायचं कशाला? हां, आता तुम्हाला जर बदकाच्या हाताखाली काम करण्याचा प्रसंग येणार असेल किंवा गोगलगायीशीच लग्न करायची वेळ येणार असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे.

पण उद्या समजा तुम्हाला झाडांचाच सिनेमा दाखवला तर चालेल का? कतरीना ऐवजी एखादी सदाफुली बिकीनी घालून पाण्याखालचे स्टंट करतीये आणि काठावरचा झेंडू पाण्यात उडी मारायला घाबरतोय असं दाखवलं तर चालेल का?म्हणजे जाहीरपणे सौदर्याच्या व्याख्येत झाडाझुडूपांना बसवायचं आणि एकांतवासात मात्र ती व्याख्या सोयीनुसार बदलायची आणि जंगल पाहून कंटाळलेल्या डोळ्यांचा शीण घालवायला डिव्हीडीवर वेगळाच शीण बघायचा हे काही बरोबर नाही.

जी गोष्ट जंगलवाल्यांची तीच येताजाता गड-किल्यांवर चढ-उतार करणा-यांची. तरी बरं आपल्या धोरणी राज्यकर्त्यांनी पुढच्या पीढीची बघण्याची सोय व्हावी म्हणून काही भुईकोट किल्लेही बांधून ठेवलेत. आणि काय बघायचे ते एकदाच बघा की. कुणीतरी म्हणे सिंहगड हजारवेळा चढून गेलाय. कशाला? स्वत: तानाजीसुद्धा इतक्यांदा चढला नसेल. हे गडकरी घामाघूम होऊन वर पोचतात आणि वरचा वारा अंगाला लागला की दोन्ही हात पसरून जणू काही स्वत:च्या काकाचाच गड असल्यासारखा चेहरा करतात. त्यापेक्षा स्वत:च्या मालकीच्या फ्लॅटमध्ये स्वत: विकत घेतलेल्या (किंवा वास्तुशांतीला सास-यानं दिलेल्या) पंख्याचा वारा घेतलेला काय वाईट? तरी बरं असा वारा सुटला की दोन्ही हात पसरायची आयडिया माणसांच्या टायटॅनिक सिनेमानं देऊन ठेवलीये. हातासरशी केट ब्लँचेट नसेना का!

तर असल्या स्टंटबाज निसर्गप्रेमी मंडळींमुळे सिनेमावाल्यांचं फावलंय आणि त्यांना खूष करण्यासाठी आता कतरीनालाही असले स्टंट करावे लागतात. चांगले लग्नकार्य असणारे सिनेमे करावेत, चार गाणी म्हणावी, खानदानकी इज्जत वगैरे डायलॉग मारावेत, देवाचं एखादं भजन म्हणावं आणि शेवटी एखादा संदेश देऊन सिनेमा संपवावा तर नको तिथल्या अवघड अवघड ठिकाणी जाऊन केलेल्या निसर्ग वगैरे भलत्यासलत्या गोष्टी हिंदी सिनेमात दिसायला लागलेल्या आहेत. अरे काय चालवलंय काय? कुठे चाललाय हा समाज?
…हल्ली आम्हाला देशाची काळजी पूर्वीपेक्षा जास्त वाटायला लागली आहे.

प्रसादनामजोशी
prasadnamjoshi@gmail.com