निव्वळ मैत्रीची फक्कड गोष्ट सांगणारा ‘सुपरस्टार’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रंगा (सिद्धार्थ जाधव) आणि बजा (पंढरीनाथ कांबळे) हे मावसभाऊ असले तरी खरं म्हणजे ते लहानपणापासूनचे जिवलग मित्र आहेत. बतावणी आणि वग यामुळे त्यांची जोडी पारंबी गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. त्यांच्या मैत्रीची ही एक फक्कड कथा आहे.

बजा आणि रंगा ही दोघं तमासगीरांची पोरं. त्यामुळे आपल्या आयांच्या स्मृतिदिनी दरवर्षी एक नवा वग आणायचा, असा या दोघांचा शिरस्ता आहे. गावात शूटिंग करण्यासाठी आलेल्या लोकांसमोर बजा-रंगा यांची बतावणी चांगलीच रंगते. बजा-रंगाचा अभिनय आवडल्यामुळे सिनेमाची नायिका मेघा, दिग्दर्शक आणि निर्माता त्यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव मांडतात. बजा प्रस्ताव नाकारतो आणि आपण वगच करूया असे म्हणतो. त्यामुळे रंगा, सुरखी (योगिनी चौक), निल्या (नीलेश रोडे), भावडय़ा (नंदकुमार चौघुले), रोहित्या (रोहित चव्हाण), पंडित (प्रशांत तपस्वी) हे वगातले सारेच सहकारी नाराज होतात. म्हणून अखेर बजा चित्रपट करण्यास तयार होतो.

त्याने लिहिलेल्या वगावरून चित्रपटाची कथा तो लिहितो आणि दिग्दर्शकाकडे सुपूर्द करतो. रंगाला प्रमुख भूमिका मिळते, पण दिग्दर्शक बजा आणि त्याच्या सहकाऱ्यांना एक्स्ट्राच्या भूमिका करायला लावतो. तसेच पटकथा बजाने लिहिलेली असूनही स्वत:चे नाव लावतो. त्यामुळे बजा नाराज होतो. बजा हा मूळचा लेखक असल्यामुळे दिग्दर्शकाने केलेले बदल त्याला मान्य नसतात; परंतु श्रेय लाटण्यासाठी दिग्दर्शक किरण (निखिल रत्नपारखी) वारंवार बजाचा पाणउतारा करतो, दुसरीकडे सिनेमा करायला मिळतोय आणि नायिका मेघासुद्धा बरोबर आहे म्हटल्यावर रंगा संपूर्णपणे गुंतून जातो. याचा फायदा घेऊन दिग्दर्शक किरण बजा आणि रंगा यांच्यात गैरसमज निर्माण करतो. त्या दोघांचे भांडण होते आणि मैत्रीला सुरूंग लागतो.

दिग्दर्शक महेंद्र कदम यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. मैत्रीवरती हा चित्रपट असला तरी रंगाची चित्रपटात काम करण्याची आकांक्षा, नायिकेच्या प्रेमात पडणे, बजा आणि रंगा यांच्या अहंभावामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण होणे या सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे आणल्या आहेत. दिग्दर्शनाबरोबरच सचिन मोटे यांचे संवाद, दोन गाणी आणि चांगले छायालेखन ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत.

प्रथमच सिद्धार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळे हे दोन विनोदी नट या चित्रपटात एकत्र आले आहेत. पंढरीनाथ कांबळेने बजा ही भूमिका समरसून केली आहे. किंबहुना आपण गंभीर भूमिकाही चांगली करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. बजा हा रंगाचा जिवलग मित्र आहे, अगदी मोठय़ा भावासारखा आहे, हे व्यक्त करणारा अभिनय पॅडीने उत्तम केला आहे. सिद्धार्थ जाधवच्या व्यक्तिरेखेपेक्षा पॅडीची व्यक्तिरेखा भाव खाऊन जाते हे नक्की. नवोदित अभिनेत्री मेघा हिने साकारलेली चित्रपटसृष्टीतील एका प्रथितयश नायिकेची व्यक्तिरेखाही चांगली साकारली आहे.

लेखक-दिग्दर्शकाने ही व्यक्तिरेखा ग्लॅमरस दाखविण्याचे ठरविल्यानंतर तो ग्लॅमरसपणा अभिनयातून दाखविण्यात मेघा यशस्वी ठरली आहे. चित्रपटातील एक्स्ट्रा भूमिका साकारणाऱ्या कलावंतांना दिग्दर्शकाकडून कशी वागणूक मिळते हेही दिग्दर्शकाने अतिशय समर्पक पद्धतीने दाखविले आहे. चित्रपटातील दोन गाणी दाक्षिणात्य चित्रपटांतील गाण्यांच्या चालीसारखी आणि त्याचे चित्रीकरणही त्याच पद्धतीचे असल्यामुळे प्रेक्षकांना आवडू शकतील. छायालेखन हे तर चित्रपटाचे खरे बलस्थान आहे.

दिग्दर्शन आणि पटकथा-संवादलेखनाबरोरच राहुल जाधव यांनी केलेल्या उत्कृष्ट छायालेखनामुळे चित्रपट प्रेक्षणीय ठरतो. मुख्यत्वे ग्रामीण भागांतील प्रेक्षकांना समोर ठेवून केलेला हा चित्रपट शहरी प्रेक्षकांनीही एकदा पाहायला हरकत नाही असा आहे.