• कथा
  • अभिनय
  • दिग्दर्शन
  • संगीत

उमेश आणि गिरीश कुलकर्णी या जोडीने मराठी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर मानवी भाव-भावनांची विविध घटनांद्वारे उत्तम मांडणी करण्यात त्यांनी चांगला हातखंडा मिळवला आहे. ‘विहीर’ आणि ‘वळू’नंतर ‘देऊळ’च्या रूपाने एक उत्तम मेजवानी दिली आहे.‘देऊळ’ची कथा मंगरूळ या गावातली आहे. गावात वीज, पाणी, रस्ते यापैकी काहीही नाही. या गावातल्या केशव म्हणजे केशा (गिरीश कुलकर्णी) सरपंचाच्या गायीला शोधत माळरानावर जातो. तिथे त्याला एका झाडाखाली दत्तगुरुंचा साक्षात्कार होतो. या साक्षात्काराबद्दल तो सगळ्या गावात सांगत सुटतो. बघता बघता ही गोष्ट सगळ्या गावाला कळते. गावातला राजकीय पुढारी भाऊ (नाना पाटेकर) हातात सत्तेच्या चाव्या असतात. महिला सरपंच (अतिषा नाईक) हीदेखील त्याच्या मुठीतच असते.

परंतु भाऊंचा पुतण्याही राजकीय महत्वाकांक्षा बाळगून असतो. दत्त प्रकटण्याच्या घटनेत ‘दम’ असल्याचा अंदाज आल्यावर ही बातमी महासंग्राम या वर्तमानपत्राचा पत्रकार किशोर कदम याच्यामार्फत छापून आणली जाते. ही बातमी आमदारांपर्यंत (डॉ. मोहन आगाशे) पोचल्यावर आमदार भाऊंना झापतात. या प्रकरणाचा जागीच बंदोबस्त करायची तंबी देतात. या शहाबद्दलच्या पार्टीत किशोर कदम दत्ताचं देऊळ बांधण्याची आयडिया देतो. त्यानुसार

भाऊंचा पुतण्या आपल्या समर्थकांसोबत भाऊ आणि गावातले एक सुशिक्षित ज्येष्ठ अण्णा (दिलीप प्रभावळकर) यांच्याकडे जातात. पण ते दोघेही देवळाला विरोध करून त्याऐवजी रुग्णालय बांधण्याचा सल्ला देतात.

झेंडावंदनाच्या दिवशी यालाही भाऊंचा पुतण्या काटशह देतो. महिला सरपंचाच्या हस्ते झेंडावंदन घडवून आणले जाते. त्यावेळीच ग्रामसभेची घोषणाही सरपंच करतात. या ग्रामसभेत भाऊ देवळाला विरोध करणारं भाषण करत असतानाच पुतण्या आमदारांना ‘मेसेज’ पाठवतो. आमदार लगेच फोन करून ‘लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करा’, अशी तंबी भाऊंना देतात आणि त्यानुसार भाऊ देवळाला पाठिंबा देतात.

इथून पुढे देऊळ आणि त्याभोवतीचा सगळा व्यावसायिक गोतावळा निर्माण होतो. गावात रस्ते होतात. पाणी येते. वीज येते. लोकांना रोजगार मिळतो. पण या सगळ्यात ‘देव’ हरवलाय अशी केशाची भावना होते. ही कोंडी फोडण्यासाठी केशा काय करतो? हे जाणण्यासाठी चित्रपट पहायला हवाच..
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे यांचा अभिनय सहजसुंदर आहे. मिश्कील भाऊंच्या मिश्कील पत्नीची भूमिका सोनाली कुलकर्णीने उत्तमपणे साकारली आहे. त्यासोबत किशोर कदम, शशांक शेंडे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, अतिषा नाईक यांचा अभिनयही सुंदर आहे. गिरीश कुलकर्णीने केशाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. पण त्याच्या अभिनयात तोचतोपणा दिसून येतो. ‘वळू’, ‘विहीर’ आणि ‘देऊळ’ या तिन्हीतल्या त्याच्या भूमिकेत एक साचलेपण आल्यासारखं वाटतं.

चित्रपटासाठीचं लोकेशन, गावातलं वातावरण, गावातली माणसं यांचं चित्रण अगदी अस्सलच वाटतं. कुठेही सरमिसळ जाणवत नाही. एका छोट्याशा गावात घडणाऱ्या या कथेत प्रत्येक प्रेक्षक समरस होऊन जातो इतकं हे वातावरण छान राखण्यात आलं आहे.

एकंदरीत चित्रपटाचं चित्रीकरणही उत्तम आहे. अनेक शॉट्स खूप काही सांगणारे आणि कलात्मक दृष्टीकोन जाणवणारे आहेत. परंतु या फ्रेम्स उमेशच्या नाहीत, असं किंचित कुठेतरी वाटून जातं. हे कदाचित त्याच्या आधीच्या चित्रपटांशी केलेल्या तुलनेमुळेही वाटत असेल. पण चित्रीकरण कुठेही अवास्तव, बटबटीत किंवा कथानकाला न साजेसं नाही एवढं मात्र नक्की.

मंगेश धाकडे याने संगीताची बाजू चांगली सांभाळली असली तरी दत्तावर ‘रॅप’ ही कल्पना धार्मिक लोकांना कितपत रुचेल, अशा शंकेची पाल मनात चुकचुकते. ‘स्मिता तांबे’वर चित्रित केलेलं आयटम साँग चांगलं आहे. त्याचं चित्रीकरणही उत्तम झालंय.

या चित्रपटात नसीरुद्दीन शाहने अगदी काही मिनिटांची भूमिका साकारली आहे. ही गोष्ट रसिकांना एक अनोखी मेजवानी आहे. परंतु नसीरुद्दीनचे मराठीतले संवाद त्यातल्या हिंदी उच्चारांमुळे खटकतात. त्याऐवजी त्याच्या तोंडी हिंदी संवाद घातले असते तरी चालण्यासारखं होतं.

केशाला होणारा दत्ताचा साक्षात्कार हे या चित्रपटाच्या कथेचं बीज आहे. परंतु काही संवाद आणि दत्तावरचं ‘रॅप’ यामुळे दत्त संप्रदायाची आणि दत्तभक्तांची अवहेलना तर होत नाही ना? असा प्रश्नही मनाला क्षणभर स्पर्शून जातो.

उमेश कुलकर्णीकडे गोष्ट सांगण्याचं कौशल्य आहे, त्यात त्याचा हातखंडा आहे, असंच म्हणावं लागेल. त्यासोबतच त्याचं आजूबाजूच्या गोष्टींबद्दलचं निरीक्षणही चांगलं आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातल्या अगदी बारीक-सारीक गोष्टींना स्पर्श करत तो नेमकेपणाने आपलं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो. ‘देऊळ’मध्येही त्याची ही सगळी वैशिष्ट्ये ठळकपणे दिसतात.

गावात देवळाच्या बांधकामाच्या निमित्ताने घडणाऱ्या सामाजिक राजकीय घटनांचं चित्रण खुसखुशीत ढंगात मांडणाऱ्या या ‘देवळा’च्या गाभाऱ्यात एकदा तरी नक्कीच जायला हवं.