हुश्श..! चला. झालं एकदाचं सगळं. सर्व सुरळीत पार पडलं. काय असतं, जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत जरा टेन्शन असतं. मनाची सारखी घालमेल होत असते. पण ईश्वरकृपेनं सगळं व्यवस्थित झालं. काळजी मिटली. शेवटी कर्ता करविता तोच. आपण फक्त निमित्तमात्र.

कारण काय असतं, शेवटी डिलिव्हरी म्हटलं की टेन्शन हे असतंच. साध्या कुरिअरचा डिलिव्हरी बॉय जरी दारात दिसला तरी कुठलंतरी पेंडिंग बिल असावं अशी धडधड आमच्या मनात सुरू होते. त्या बंद पाकिटाची आपल्या हातात डिलिव्हरी मिळाली की आपण धडधडत्या हृदयानं ते उघडून बघतो आणि या महिन्यात क्रेडिट कार्डाचा कितीला बांबू बसला ते वाचण्यात आणि मनातल्या मनात क्रेडिट कार्डवाले सगळे कसे जुन्या काळाच्या वसूली पठाणांसारखे असतात ते पुटपुटतो. तर हे झालं आमचं साध्या डिलिव्हरीचं साधं टेन्शन.

(आमच्या क्रेडिट कार्डाचं बिल असून असून असणार किती रूपड्यांचं? असो बिचारं!) पण इथे प्रश्न वेगळ्या डिलिव्हरीचा होता. आणि ती डिलिव्हरी सुरळीत पार पडली. ज्युनियर बींनी ’इट्स अ गर्ल’ असं ट्विट केलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.

खरं तर सुटका बाळंतिणीची होत असते. पण इथे आम्हालाच सुटल्यासारखं झालं. (आम्ही काही बाळंत वगैरे झालो नाही, गैरसमज नसावा.) गेले अनेक दिवस चालू असलेली चर्चा थांबली. सट्टेबाजांना जास्तीचे पैसे लावायला दुसरा विषय मिळाला. च्यानलवाल्यांना पण सट्टेबाजांसारखा जास्तीचा टिआरपी मिळवायला दुसरा विषय शोधावा लागेल. चला, झालं ते चांगलं झालं. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत.

नाही, चुकलंच आमचं. बाळ-बाळंतीण कसंसंच वाटतं नाही? ऐश्वर्या बाळंत झाली असं म्हणणं म्हणजे कोहीनूरला अमेरिकन डायमंड म्हणण्यासारखं वाटतं. नकोच. त्यापेक्षा मग बेबी-बी आणि बीबी-बी सुखरूप आहेत असं म्हणतो. हे कसं हाय सोसायटी पण वाटतं, नाही?

यावेळी नाही म्हटलं तरी माध्यमांनी संयम पाळला म्हणतात. ब्रेकींग न्यूज द्यायची घाई केली नाही. सगळे कसे शहाण्या  बाळासारखे वागळे. सॉरी, चुकलंच. वागले असं म्हणायचं होतं आम्हाला. शिवाय माध्यमांना तुम्हाला वाटेल तेव्हा या डिलिव्हरीची न्यूज द्यायची घाई करू नका, अशा सूचनाही कुणीतरी दिल्या होत्या म्हणतात. (शहाण्यांची संख्या आपल्या देशात वाढायला लागली की काय? ही काय नस्ती थेरं?)

तेही बरोबरच आहे. मुळात डिलिव्हरीची जिथे साक्षात देवालाच घाई नसते, सगळं झाल्यावरदेखील नऊ महिने थांबावं लागतं आणि त्यातही पुन्हा नक्की काही नाहीच, तिथे माध्यमांनी घाई करून कसं चालेल? त्यामुळे यावेळी ब्रेकिंग न्यूजचं प्लॅनिंग करणं गरजेचं होतंच. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना डिलिव्हरीच्या न्यूजच्या डिलिव्हरीची घाई करू नका, जरा प्लॅनिंग करा अशी कुणीतरी तांबी (पुन्हा चुकलो, तंबी म्हणायचं होतं) देणं आवश्यकच होतं. या तंबीनं ब्रेकिंग न्यूजचा पाळणा लांबेल म्हणेस्तोवर बाळाच्या बाबांनाच धीर निघाला नाही. चला, हेही ठीक आहे. पुरूषाची अक्कल काम करेनाशी झाल्यावर तो लग्न करतो आणि पोर झाल्यावर आपल्याला अशी काही कला अवगत होती हे तो विसरतो हे रिवाजाला धरूनच झालं म्हणायचं.

शेवटी अपेक्षित डिलिव्हरी झाली. मुलगी झाली. लक्ष्मी सोनपावलांनी घरी आली…(हा पॅरेग्राफ लिहायला टाकलेला आहे. तो पूर्ण झाल्यावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.)

आता आमच्या मुलीला नाव सुचवा हो अशी जाहीर दवंडी (चावडीवरची ती दवंडी. ट्विटरवरच्या दवंडीला ट्विवंडीच म्हणायला हवं!) पिटल्यामुळं ’वन हंड्रेड बेबीज्‍ नेम्स’ वगैरे पुस्तकांचा खप प्रचंड वाढला म्हणतात. त्या पुस्तकांचे मराठी हक्क मेहतांनी (हे काय सांगायला हवं?) विकत घेऊन तात्काळ मराठी भाषांतराची भट्टी लावली असून कुठल्यातरी दिवशी अक्षरधाराच्या कट्ट्यावर त्याचं प्रकाशन होणार असल्याचं कळतंय. संबंधित पुस्तकांमधली नावं वाचून ’अशी नावं असतात का कधी जगात? शी!!’ असं म्हणून एक दोघा अनुवादिकांनी कामही नाकारलं म्हणतात. पण मेहतांकडे अनुवादिकांची कमतरता नसल्यामुळे वाचकांनी काळजी करू नये. आपली प्रत बुक करावी. (त्वरा करा, मोजक्याच प्रति शिल्लक. कारण मोजक्याच काढल्या आहेत!)

बाळ बाळंतीण – चुकलं, बेबी अधिक बीबी कंसाबाहेर बी घरी आल्यावर बाबा आणि आजोवांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्यात लोक खूप नावं सुचवताहेत वगैरे नातीच कौतिक आजोबांनी सांगितलं. (’आजोबा म्हटल्यावर काय नातीच्या टिंबटिंबचंही कौतुक!’ असं आमची आज्जी म्हणायची.) या लोकांचीही कमाल आहे बुवा. नावं सुचवा म्हटलं आणि सुचवली लगेच नावं!

हे म्हणजे आमच्या एका मित्राच्या आजोबांसारखं झालं. नव्यानं ओळख झालेल्या कुणी त्यांना ’या एकदा आमच्या घरी चहाला’ असं म्हटलं की ते दुस-या दिवशी खरंच जायचे! जनरीत म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात वगैरे त्यांच्या गावीच नव्हतं. इथं नावं सुचवा म्हणलं तर लोक नावं सुचवताहेत आपले. सुचवो बापडे. या लोकांनी सुचवलेली ही सगळी नावं एकत्र करून त्याचा कोष करण्याची आयडिया कशी आहे? कुणीतरी हे करावं म्हणजे अमेय प्रकाशनातर्फे त्याचं एक पुस्तकही काढता येईल. (बरं सुचलं- अमेय हे नावं कसं वाटतं? ’अ’वरूनच आहे. सुचवू का?)

तर आम्ही एरवी कुणालाही नावं सुचवायच्या भानगडीत पडत नाही. कुणाला नावं सुचवण्यापेक्षा ती ठेवण्याकडेच आमचा ओढा अधिक. आणि ओढा कसला, नदीच म्हणालात तरी चालेल. कारण हे काम आम्ही न चुकता करत असतो. अजून काही बेबी बीचे फोटो आम्हाला बघायला मिळाले नाहीत. (तुला नक्की पाठवते हो असं जयाआंटी म्हणाल्या होत्या, पण अजून मेल नाही. या जुन्या लोकांचा अटॅचमेंट वगैरेंचा फारच घोळ असतो बुवा!) तर ते फोटो मिळाल्यावर ती कुणासारखी दिसते वगैरे मौलिक चिंतन आम्ही करू. शिवाय मोठी झाल्यावर तिच्या सिनेमावरही (तोपर्यंत जगलो वाचलो तर) टीका करू. त्यामुळे सध्या चालू असलेल्या नावं ठेवण्याच्या धामधुमीत आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही.

शिवाय तिचे फोटो जेव्हा प्रकाशित व्हायचेत तेव्हाच आम्ही बघू. नाही दिसले तरी चालतील. त्यासाठी खटपट करायला आम्ही म्हणजे काही अमेरिकन टॅबलॉईड नाही! मुळात आम्हाला कशाचीच घाई नसल्यामुळे असा संयम ठेवणं शक्य आहे. ज्यांना नेहमीच घाईची लागलेली असते त्या मंडळींना संयम ठेवा वगैरे सांगणे म्हणजे प्रसाद ओकला नीट कटिंग कर म्हणून सांगण्यासारखं आहे.

पण डिलिव्हरी नीट पार पडली यात मात्र आम्हाला समाधान आहे. आम्ही काही ’पिझ्झा हट’चे तीस मिनिटांच्या गॅरेंटीवाले डिलिव्हरी बॉय नसलो तरी ती वेळच्या वेळी झालेली बरी असते यावर आमची श्रद्धा आहे. शिवाय एक डिलिव्हरी नीट झाली की बाकी बातम्यांकडे लक्ष देता येणं सोयीचं होतं. गेला महिनाभर आम्हाला या वेळी तरी डिलिव्हरीवर लिहा असा आग्रह होतो आहे. पब्लिकची तशी मांगच होती म्हणाना. (शिवाय पब्लिककी मांग म्हटल्यावर त्या मांगेला पुराव्याचा सिंदूर लागत नाही. कसं?) पण पंतप्रधानांनी अण्णा हजारेंच्या आरोपांकडे दुर्लक्ष करावं तसं आम्ही या आग्रहाकडे दुर्लक्ष करत होतो. कारण शेवटी डिलिव्हरीलाही एक प्लॅनिंग लागतं. ते पूर्ण झाल्यावर आज आमच्या लेखाचीही डिलिव्हरी झाली. हुश्श..!

आता फक्त मानधनाच्या चेकच्या डिलिव्हरीकडे डोळे लावून आम्ही बसलो आहोत.

-प्रसाद नामजोशी

prasadnamjoshi@gmail.com