घ्या, आता तरी काही बोध घ्या! बायाबापड्यांनो, आयाबायांनो, गृहिणींनो, बायकांनो, होम मेकर्सनो आणि लग्नाळू तरूणींनो बोध घ्या, काही शिका. कारण घटनाच तशी घडलीये. नव-याला ब्रेकफास्ट ऊर्फ नाश्ता करून खायला घालणे हे खूप रोमँटिक वाटतं असं नन अदर दॅन नर्गिस फाक्री म्हणालीये! तेव्हा काही शिका तिच्याकडून. ताबडतोब (आपापल्या) नव-यासाठी कांदेपोहे करायला लागा आणि रोमँटिकपणाचा अनुभव घ्या.
पण तुम्हाला नर्गिस फाक्री कोण आहे ते माहिती आहे का? नाही? म्हणजे चक्क न ला काना ना आणि ह ला वेलांटी ही? कमालच झाली बुवा तुमच्या जनरल नॉलेजच्या ज्ञानाची! तुमचं म्हणजे काय तुम्हाला फार तर मान्यता दत्तची सासू म्हणून नर्गिस माहिती असणार! पण आता तो जमाना गेला. राज कपूर बरोबरची नर्गिसबिर्गिस आता विसरायची. शब्दांचे बदललेले अर्थ आता समजून घ्यायलाच हवेत. त्यामुळे सध्या नर्गिस म्हणजे नर्गिस फाक्री, महात्मा गांधी म्हणजे अण्णा हजारे आणि पुलं देशपांडे म्हणजे… असो.
तर पिनोलेप क्रूझ अधिक जेनिफर लोपेझ भागिले पावणेचार अशी नर्गिस फाक्री रॉकस्टारमधून स्टार झाल्यानंतर वदती जाहली की नव-याला ब्रेकफास्ट करून देणे यासारखा रोम्यांटिकनेसपणा दुसरा नाही. आम्ही ताबडतोब कल्पनेच्या वारूच्या कंबरड्यात लाथ घातली आणि डोळ्यांपुढच्या बातमीत डिझॉल्व आणून एक दृश्य बघू लागलो (नाहीतरी आम्हाला दुसरा उद्योग नसतोच म्हणा-) अहाहाहा! काय ते दृष्य…
…पहाटेची वेळ आहे. झुंजूमुंजू झालंय. फाक्रींची कन्या आणि कुणाचीतरी सून असलेली नर्गिस गोधडीची घडी करून बाजलं उभं करून ठेवते आहे… सडा सारवण आणि तुळशीसमोरची रांगोळी (पाच ठिपके बाय पाच ठिपके) घालून माकड छाप काळं दंत मंजन डाव्या पंजात घेऊन उजव्या बोटानं दात घासत कपाळावरची बट मनगटानं मागे करते आहे… नंतर घरात जाऊन चुलीवर चहाचं आधण ठेऊन डालडाच्या रिकाम्या डब्यातले पोहे ताटलीत काढून निवडावे की तसेच भिजत घालावे असा विचार करत रोम्यांटिक पोझमध्ये बसून बाहेरच्या नालीवर उकीडवं बसून झाल्यावर शर्ट वर धरून परत येणा-या शेजारच्या घरातल्या बबडूकडे बघते आहे… तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करून न निवडलेल्या पोह्यांमध्ये वाडगाभर पाणी ओतून पितळी चरवी घेऊन दूध काढायला भींतीबाहेरच्या बकरीच्या दिशेनं पळत जाते… आणि नंतर बाजेवर चट्ट्यापट्ट्यांचा पायजमा वर घेऊन झोपेतच गुढगा खाजवत अस्ताव्यस्त पहुडलेल्या आपल्या नव-याला ’अहो धनी… उठा ना, ब्रेकफाष्ट तयार झालाय कवाधरनं…नक्को ना, बघंल कुणीतरी, आधी तुमी उठा…नक्को, आधी ब्रेकफाष्ट करा ना, तेच जास्त रोम्यांटिक वाटतं बया मला…’ असं म्हणतेय… अहाहाहाहा!! (डिझॉल्व समाप्त.)
तर असा रोम्यांटिक ब्रेकफास्ट कुणा बरं नव-याला आवडणार नाही? शिवाय बायकांनाही तो आवडावा असं नर्गिसचं म्हणणं आहे. किमान तिला तरी हे आवडणार आहे. आता यावर स्त्रीमुक्तीवाल्यांचं काय म्हणणं आहे ते काही कळलेलं नाही. किंबहुना त्यांना हे महत्वाचे विषय चर्चेला घ्यावे असंच हल्ली वाटेनासं झालंय. एक साधा ब्रेकफास्ट तो काय, आणि तो नव-याला करून द्यायला एखाद्या बायकोला आवडत असेल तर काय बिघडलं? असंही काही सामान्य नवरे म्हणतील. (सामान्य नवरे यात खरं तर पुनरूक्ती आहे. नवरा म्हटला की त्यात सामान्यत्व आलंच. त्याशिवाय का त्यानं लग्न करायचा निर्णय घेतला?) शिवाय यात काय मोठंसं, नव-याला ब्रेकफास्ट करून देणे हे बायकोचं कर्तव्यच आहे, त्या नर्गिसनं काय वेगळं सांगितलं, असं काही सनातनी नवरेही म्हणतील. पण फक्त तेवढाच प्रश्न नाहीये. प्रश्न आहे तो रोम्यांटिकनेसपणाचा!
ब्रेकफास्ट करणे हे कर्तव्य आहे, आनंद आहे की मजबूरीका नाम महात्मा गांधी आहे हा प्रश्न महत्वाचा नसून त्यात रोम्यांटिकनेसपणा आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि थोर विचारवंत नर्गिसजी फाक्री यांच्या मते तो आहे. आणि त्यांचं मत ग्राह्य धरणं हे तमाम पुरूषांना आवडणार आहेच पण बायकांनाही ते आवडून घेणं भाग आहे. याचं कारण ही नर्गिस पुरूषांनाच नाही तर महिलावर्गाला आवडते अशी एक बातमी आहे. (पुरूषांना काय हो, शेतावरच्या बुजगावण्याला साडी नेसवली तर तेही आवडेल!)
आणि शेवटी रोम्यांटिकनेसपणा काय, प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. साठीच्या पुढच्या लोकांना विचाराल तर हा सगळा गाढवपणा सिनेमाबिनेमात ठीक आहे (अहाहा, काय ती राज आणि नर्गिसची गाणी…) प्रत्यक्षात कशाला हवा असं त्यांचं मत असेल. ’तरीपण आजोबा, जीवनात थोडा रोमान्स हवा’ असं त्यांना म्हणून बघा म्हणजे लगेच ’कशाला? नाही, मी म्हणतो गरज काय? नस्ती थेरं आहेत ही. आम्ही काय संसार नाही केलेत? आम्हाला काय मुलं नाही झालीत?’ अशा प्रश्नांच्या फैरींना तोंड देण्याची वेळ तुमच्यावर येते की नाही ते बघा.
जुन्या पीढीची ही कथा तर नव्या पीढीला आपण प्रत्येक क्षण रोम्यांटिकलीच जगतो असं वाटत असतं. साधी कॉफी पिणं सुद्धा लोकांना रोम्यांटिक वाटतं. (अशा मुलींचं बहुतेक पुढे त्या कॉफी देणा-या वेटरशीच लग्न होतं आणि नंतर नुस्त्या कॉफीच्या वासानंसुद्धा त्यांना मळमळायला होतं!) कधी नव्हं ते प्राणीसंग्राहलयात गेलेल्या एका जोडप्याला म्हणे तिथले साप सुद्धा रोम्यांटिक वाटले. शहरात राहणा-या हायसोसायटी मुलांना गावाकडची डुकरं सुद्धा रोम्यांटिक वाटू शकतील. नाहीतरी मनाला वाट्टेल तसे व्यवहार उघड्यावर करायला मिळणे हा एकप्रकारचा रोमान्सचाच भाग आहे म्हणा! तरीपण ब्रेकफास्ट…एक मिनिट. डुकरांचा विषय झाल्यावर लगेच ब्रेकफास्ट नको. इथे पॅराग्राफ करावा.
हां, तर ब्रेकफास्ट हा रोमान्सचा विषय आहे हे नर्गिसबाईंचं मत कौतुकास्पद आहे. किंबहुना एखाद्या नटीनं मुळात मत देणं हीच कौतुकाची बाब असल्यामुळे नर्गिसबाईंचं कौतुक आमच्या डोळ्यात मावेनासं झालं. म्हणून मग आम्ही कौतुकानं नेटवरच्या तिच्या इमेजेस डाऊनलोड करायला सुरूवात केली आणि तो डेटा आमच्या हार्डडिस्कमध्ये मावेनासा झाला. शेवटी काहीच कशातच मावत नाही म्हटल्यावर आम्ही तो नाद सोडला.
तरीपण एक नटी कशाविषयीतरी काहीतरी म्हणते तेव्हा तिची दखल आपण घेणार की नाही? एका करीनानं नाडीच्या धोतरासारख्या दिसणा-या पायजम्यावर कपडा कमी पडल्यामुळे अर्धवट उंचीचे राहिलेले कुडते घालून जब वी मेट नावाचा हिंदी सिनेमा केला तर त्या फॅशनची लाट आली. माधुरीनं हम आपके है कौन या लग्नाच्या व्हिडीओत बॅकलेस का काय म्हणतात तो ड्रेस घातला तर तमाम मुलींच्या उघड्या पाठी बघण्याची वेळ (तरीपण अहाहाहा!) इतरांवर आली. त्याच धर्तीवर नर्गिसबाईंच्या या मतानं नव-यासाठी ब्रेकफास्ट करण्याची फॅशन यायला काय हरकत आहे?
त्यामुळे आपल्या आवडत्या नटीला फॉलो करणे ही काळाची गरज असल्यामुळे याही बाबतीत तसं घडेल आणि घरोघरच्या बायका ब्रेकफास्ट तयार करून रोम्यांटिकनेसपणाचा अनुभव घेतील आणि घरोघरचे नवरे त्या रोम्यांटिकनेसपणात (केलेला ब्रेकफास्ट खाऊन) सक्रीय सहभाग घेतील अशी आम्हाला आशा आहे.
तर अशाप्रकारे आम्ही ही आशा व्यक्त करून लेखन थांबवतो कारण आम्हाला कोप-यावरच्या टपरीवर वडापाव खायला जायचं आहे. (कोणत्याही नट्यांचं अंधानुकरण घरात झालेलं मुळीच चालणार नाही हा आमचा इशारा आमच्या ब्रेकफास्टच्या मुळावर उमटेल याची अजिबातच कल्पना नव्हती…)
प्रसाद नामजोशी
prasadnamjoshi@gmail.com



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








